भारत - पाकिस्तानमध्ये आशिया चषक 20-ट्वेंटी स्पर्धेत गट टप्प्यात आणि सुपर फोरमध्ये मिळून दोन सामने खेळवले. दोन्ही वेळेस भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. त्यानंतर कुलदीप यादवच्या भेदक फिरकी मार्यानंतर तिलक वर्माने साकारलेल्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात 5 गडी राखून पुन्हा धूळ चारत आशिया चषक 20-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेवर नाव कोरले आणि त्यांचे नाक कापले.
बक्षीस वितरण सोहळ्यात भारतीय संघाने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा कायम ठेवला. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे आहेत आणि विशेष म्हणजे ते देशाचे गृहमंत्रीही आहेत. ते सतत भारतविरोधी गरळ ओकत असतात. त्यामुळे भारतीय संघाने करंडक स्वीकारण्यास नकार दिला. ज्यांचे हात पहलगाममधील निष्पाप भारतीयांच्या रक्ताने माखले आहेत, त्यांच्या हातून चषक घेण्याचे भारतीय संघाने टाळले, हे निश्चितच अभिनंदनीय आहे. शिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने संपूर्ण स्पर्धेत मिळालेले सामना शुल्क भारतीय लष्कराला समर्पित केले हे कौतुकास्पद मानावे लागेल. गेल्या वर्षीही 20-ट्वेंटी विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाने आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशियातील वर्चस्व सिद्ध केले. संघाचे आशिया चषकातील हे नववे आणि 20-ट्वेंटीमधील दुसरे जेतेपद ठरले. स्पर्धेतील यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांवेळी मोठे वाद झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला; तर त्यांच्या खेळाडूंनी दुसर्या सामन्यात काहीही कारण नसताना भारतीय खेळाडूंशी वाद घातला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’संबंधित तणावात्मक स्थितीतील काही घटनांना अनुलक्षून आक्षेपार्ह हातवारे केले.
गेल्यावेळच्या दोन सामन्यांतील विजयसुद्धा सूर्यकुमारने पहलगाम हल्ल्यातील मृत व्यक्तींच्या कुटुंबांना आणि लष्कराला समर्पित केला होता. त्याच्या या वक्तव्यास आक्षेप घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे तक्रार केली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तान आता आपल्या द़ृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही, असा शेरा सूर्यकुमारने मारला होता. आशिया कपमध्ये दोन्ही संघ 21 वेळा एकमेकांसमोर आले. त्यापैकी 12 वेळा भारताने विजय मिळवला, तर पाकने सहावेळा. तीन सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे पाकिस्तान बरोबरीच करू शकत नाही, असे सूर्यकुमार बोलला आणि त्याप्रमाणे अंतिम सामन्यात तसे घडलेही! दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र बिनबाद 84 अशा चांगल्या सुरुवातीनंतर पाकिस्तानचा डाव कुलदीप, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी त्रिकुटासमोर गडगडला.
अवघ्या 19.1 षटकांत 146 धावांमध्ये पाकच्या संघाचा खुर्दा उडाला. जखमी अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत अंतिम लढतीत दुबेला ‘पॉवर प्ले’मध्ये गोलंदाजी करावी लागली. सुरुवातीच्या षटकात दुबे - जसप्रीत बुमराहविरुद्ध पाकचे सलामीवीर साहिबझादा फरहान आणि फखर झमानने तडाखेबंद फलंदाजी केली. या दोघांनी 9.4 षटकांतच 84 धावा काढल्या. पण चक्रवर्तीने चतुराईने फरहानला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली आणि इथूनच भारतीय गोलंदाजीने कमाल दाखवली. भारतीय फिरकीपटूंनी पाकच्या फलंदाजांची त्रेधा उडवली. कुलदीपने तर एका षटकात तीन गडी बाद केले. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा, शाहीन शाह आफ्रिदी आणि फहीम अश्रम यांना बाद करून पाकचे मानसिक खच्चीकरण केले. बुमराहनेही 2/25 असा प्रभावी मारा केला. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात निराशाजनकच ठरली. भारताने 20 धावांतच 3 गडी गमावले. लयीत असलेला अभिषेक शर्मा (5), कर्णधार सूर्यकुमार (1) आणि शुभमन गिल (12) यांना झटपट गमावले. मात्र तिलक आणि सॅमसनने चौथ्या गड्यासाठी 50 चेंडूंत 57 धावांची भागीदारी करत संघाला विजयी मार्गावर नेले. तिलकने 41 चेंडूंत अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. त्याला प्रथम सॅमसन आणि मग शिवम दुबेची साथ लाभल्यामुळे भारताला जेतेपद मिळवता आले.
रौफने गट साखळी सामन्यात भारतीय प्रेक्षकांना डिवचताना पाक लष्कराने भारताचे कथित विमान पाडल्याचे हातवारे केले होते. यावर भारताने आक्षेप घेतल्यानंतर त्याला सामना मानधनाच्या 30 टक्के दंड ठोठावला. अंतिम सामन्यात बुमराहने 18व्या षटकात याच रौफला त्रिफळाचीत केले. त्यानेही हातवार्यांतून रौफला सणसणीत प्रत्युत्तर दिले.
खरे तर आशिया चषक स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यापूर्वी रंगवलेल्या माघार नाट्यादरम्यान पीसीबीने विविध नियमांचे उल्लंघन केल्याचे आयसीसीचे मत आहे. मागच्या वेळी नाणेफेकीवेळी सूर्यकुमार आणि पाकचा कर्णधार सलमान अली आगाला हस्तांदोलन न करण्याच्या सूचना अँडी पायक्रॉफ्ट यांनी दिल्या होत्या, असा पीसीबीचा दावा होता. त्यांना आशिया चषकातून न हटवल्यास स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा हट्ट पीसीबीने धरला होता. एका सामन्यापूर्वी पाकचे प्रशिक्षक माईक हेसन, सलमान आगा आणि पायक्रॉफ्टमध्ये संवाद झाला.
पाकिस्तान संघाचे माध्यम व्यवस्थापक नईम गिलानी यांनी या संवादाची चित्रफीत तयार करून ती व्हायरल केली. खरे तर सामन्यापूर्वी खेळाडू व सामना अधिकार्यांसाठीच राखीव असलेल्या ठिकाणी जाण्याची परवानगी संघाच्या माध्यम व्यवस्थापकांना नसते. याची माहिती देऊनही गिलानीने तेथे जात चित्रफीत बनवली. आयसीसीने याबाबत रास्त आक्षेप घेतला होता. दुसरीकडे, मैदानावर पाकिस्तानच्या तुलनेत भारताने सातत्याने सरस कामगिरी केली. आपल्या संघाने यंदाच्या आशिया चषकातील एकही पराभव न स्वीकारता आधीचे सहाही सामने जिंकले; तर पाकिस्तानला सहापैकी चारच सामने जिंकता आले.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध आणखीनच बिघडले असून त्याचे पडसाद मैदानावरही उमटलेत. गेल्या सामन्यात आक्षेपार्ह कृती केल्याबद्दल पाकचा वेगवान गोलंदाज रौफवर दंडात्मक कारवाई झाली. मात्र सूर्यकुमारने राजकीय शेरेबाजी केली म्हणून त्यास दंड ठोठावला. अर्थात त्याच्याबाबतच्या या निर्णयाविरोधात भारताने अपील केले. भारताच्या 7 लढाऊ विमानांचे नुकसान केल्याचा बोगस दावा करणारे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना संयुक्त राष्ट्रांत भारताच्या कायमस्वरूपी राजदूत पेटल गहलोत यांनी नुकतेच फटकारले. रणभूमीप्रमाणेच आता मैदानातही भारताने पाकिस्तानचा पुन्हा मुखभंग केला.