जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास पाठिंबा देताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावुक झाले. त्यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव घेतले आणि मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे भावपूर्ण उद्गारही काढले. मार्चमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके)बाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. पीओकेला भारतात विलीन केले की, काश्मीरबाबतचे सर्व प्रश्न संपुष्टात येतील, असे मत त्यांनी सडेतोडपणे व्यक्त केले होते. त्यावर कारगिल युद्ध झाले, तेव्हाच पीओके ताब्यात घेण्याची चांगली संधी भारताकडे आली होती.
आजही केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर जरूर ताब्यात घ्यावे, अशी स्पष्टोक्ती ओमर यांनी केली आहे. भारताकडून हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली असून, पीओकेमध्ये आपत्तीकालसद़ृश वातावरण आहे. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा हा दृश्य परिणाम. राजनैतिक पातळीवर कठोर पावले उचलत भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाण्याचा प्रवाह रोखला. इतकेच नाही तर तुमच्या लायकीप्रमाणे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले.
तत्पूर्वी आर्थिक कोंडी करत आयात-निर्यात बंद केली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी पाकिस्तानी जहाजांना भारतीय हद्दीत येण्यास मज्जाव करण्यात आला. परिस्थिती आणखी बिकट झाल्यास अधिकृतपणे आणीबाणी जारी केली जाऊ शकते, असे संकेत पीओकेचे पंतप्रधान अन्वर उल हक यांनी दिले आहेत. तेथे पर्यटकांना येण्यास बंदी घातली असून एक हजारहून अधिक मदरसे रिकामे केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायदळ, नौदल आणि हवाई दलाच्या तिन्ही प्रमुखांना पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
उद्या भारताने अचानक हल्ला केल्यास पूर्वतयारी म्हणून पीओकेतील शाळांमध्ये मुलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच हॉटेल्स, विवाह सोहळ्यांचे हॉल आणि शाळा येथे सैनिकांची राहण्याची व्यवस्था केली जात आहे. पीओकेतील 1000 पेक्षा अधिक मदरसे बंद करण्यात आले असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील परिसरात दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य साठवून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातून पाकचे धाबे दणाणले आहे, हेच दिसून येते. भारताने लष्करी कारवाई केल्यास तेथील सरकारविरोधात नाराज जनतेच्या असंतोषात भरच पडेल. पीओकेतील अनेक लोकांना खरे तर भारतातच सामील व्हायचे आहे!
दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी अनेक केंद्रे तिथे असून, 150 ते 200 प्रशिक्षित दहशतवादीही आहेत. लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जैश- ए-मोहम्मद अशा अनेक संघटनांना तेथे पाकिस्तानी लष्कराचे पाठबळ आहे. भारताने हल्ला केल्यास अणुहल्ला करू, अशी धमकी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली होती. पण अनेक वर्षे अशा पोकळ धमक्या दिल्या जात असून भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अण्वस्त्रसाठा आहे. आता भारताने सिंधू पाणीवाटप कराराचे उल्लंघन केले, तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल, अशी नवी धमकी आसिफ यांनी दिली आहे. पण प्रत्यक्षात पाकिस्तानचे अवघे सरकारच घाबरून गेले आहे.
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते आणि आता मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशाचे आणखी तुकडे होतील, या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आहे! पहलगाम घटनेशी काहीच संबंध नाही, असा आव पाकिस्तानने आणला असला, तरीही भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा यंत्रणेने (एनआयए) हल्ल्यासंबंधी महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्यावरून हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय पहलगाम कांडामागे पाकिस्तानचा हात असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उघडपणे अमेरिकेचे संरक्षणमंत्री पिट हेगसेथ यांना दूरध्वनी संभाषणावेळी सांगितले आहे. शिवाय 26/11 चा मुंबईवरील हल्ला पाकिस्ताननेच केल्याची कबुली माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिली होती.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही ‘आम्ही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतो’ असे म्हटले होते आणि आता दहशतवादी संघटनांना पाठबळ दिल्याचा इतिहास पाकिस्तानला असल्याचे उघड गुपित आहे. त्यामुळे देशाला त्रास झाला आहे, अशी कबुली पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनीही दिली आहे. तरीही अफगाणिस्तान, इराकसारख्या देशांतील विशिष्ट राजकीय परिस्थितीच्या संदर्भात, अमेरिकेने पाकिस्तानचा गरजेनुसार वापर करून घेतला आणि त्याच्या भारतविरोधी दहशतवादाकडे दुर्लक्ष केले. पण 9/11 चा हल्ला झाल्यापासून अमेरिकेचा द़ृष्टिकोन बदलला आहे.
आता भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला आणि दहशतवादाविरोधी लढाईला अमेरिकेचा पाठिंबा असल्याची ग्वाही अमेरिकेचे संरक्षण सचिव हेगसेथ यांनी दिली आहे. मात्र पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्याचे रूपांतर व्यापक प्रादेशिक समस्येत होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केली आहे. त्याचवेळी पाकच्या भूमीवरून आगळीक करणार्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास पाकिस्तान भारताला सहकार्य करील, अशी अपेक्षाही व्हान्स यांनी व्यक्त केली आहे! वास्तविक तशी शक्यता बिलकुल नाही.
याबाबतीत अमेरिकेनेच वजन खर्च करून पाकिस्तानवर दबाव आणला पाहिजे. भारताच्या विरोधातील हिंसक कारवाया न थांबवल्यास कोणतीही आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत करणार नाही, असे अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावले पाहिजे. प्रत्यक्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेपुढेच आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशावेळी भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास त्याचा भारतासोबतच्या व्यापारास फटका बसेल, ही अमेरिकेसमोरची खरी भीती आहे. एकीकडे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय रसद कमी करणे आणि भारताच्या कोणत्याही कारवाईस नि:संदिग्ध पाठिंबा देणे, हीच आज अमेरिकेकडून अपेक्षा आहे. बदलत्या परिस्थितीत पाकिस्तानवरील दबाव वाढतो आहे. दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांचा बंदोबस्त करण्याची हीच योग्य वेळ आहे.