Randhir Singh | दिग्गज नेमबाज आणि क्रीडा प्रशासक 
संपादकीय

Randhir Singh | दिग्गज नेमबाज आणि क्रीडा प्रशासक

पुढारी वृत्तसेवा

संजीव खाडे

खेळाडू म्हणून योगदान दिल्यानंतर क्रीडा संघटक, प्रशासक म्हणून काम करणे सर्वच खेळाडूंना जमतेच असे नाही. मात्र हे कठीण पण अवघड नसलेले कार्य ऑलिम्पिकवीर नेमबाज राजा रणधीर सिंग यांनी केले. तब्बल पाचवेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना रणधीर सिंग यांनी जागतिक पातळीवर क्रीडा प्रशासक म्हणून दबदबा निर्माण केला. त्यांच्या निधनाने भारताने केवळ दिग्गज नेमबाजच नव्हे तर मार्गदर्शक आणि क्रीडा प्रशासक गमावला आहे.

रणधीर सिंग यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९४६ रोजी पंजाबमधील पतियाळा येथील राजघराण्यात झाला. त्यांचे वडील भालिंद्र सिंग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्य होते. रणधीर सिंग यांचे काका पतियाळाचे शेवटचे महाराज यादविंद्र सिंग यांनी १९५१ मध्ये दिल्लीत झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धा आयोजनात योगदान दिले होते. अशी परंपरा असणाऱ्या रणधीर सिंग यांचा खेळाकडे ओढा एव्हाना ओघानेच आला. कॉलेजच्या दिवसांत ते एक उत्तम क्रिकेटपटू देखील होते. पण त्यांनी काकीच्या आग्रहास्तव नेमबाजीकडे आपला मोर्चा वळवला. विशेष म्हणजे १९६४ मध्ये अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप शूटिंगमध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर नेमबाजीतील त्यांचा लक्ष्यवेध सुरूच राहिला. १९६८ ते १९८४ या काळात सलग पाच ऑलिम्पिकमध्ये मिक्सड ट्रॅप प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले.

१९७८ च्या बँकॉक आशियाई खेळांमध्ये ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून ते आशियाई खेळांत सुवर्ण जिंकणारे पहिले भारतीय नेमबाज ठरले. त्यानंतर १९८२ च्या दिल्ली आशियाई खेळांत त्यांनी रौप्य पदकही जिंकले. १९९४ च्या हिरोशिमा आशियाई खेळांनंतर त्यांनी सक्रिय नेमबाजीमधून संन्यास घेतला. विशेष म्हणजे, यावेळी ते ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे सरचिटणीस होते. क्रीडा संघटनेचे पदाधिकारी असताना आशियाई खेळांमध्ये स्पर्धा करणारे ते पहिले व्यक्ती ठरले. शूटिंग रेंजवर नेमबाज म्हणून लक्ष्यवेध करत असताना रणधीर सिंग यांनी १९८४ मध्ये भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) मध्ये संयुक्त सचिव म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्याकडे तब्बल २५ वर्षे आयओसीचे सरचिटणीसपद होते. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन करण्यात रणधीर सिंग यांचा सिंहाचा वाटा होता.

संपूर्ण आयोजन समिती भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडली असताना, समितीचे उपाध्‍यक्ष असणारे रणधीर सिंग हे एकमेव होते की, त्‍यांची प्रतिमा पूर्णपणे स्वच्छ राहिली. २००१ मध्ये ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य बनले. २०१४ पासून ते आयओसीचे मानद सदस्य होते. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (ओसीए) या आशियाई संघटनेचेही ते सरचिटणीस होते. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांची ओसीएचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांची ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (ओसीए) च्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. रणधीर सिंग यांना महिमा, सुनैना आणि राजेश्वरी अशा तीन मुली आहेत. त्यांची मुलगी राजेश्वरी कुमारी ही देखील ऑलिम्पिकवीर नेमबाज आहे. रणधीर सिंग यांना अर्जुन पुरस्कारासह अनेक पुरस्कार लाभले. खेळाडू आणि प्रशासक अशा दोन्ही भूमिका चोख बजावत रणधीर सिंग यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राला जागतिक नकाशावर एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे योगदान भारतासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT