Nepal India Relation pudhari
संपादकीय

India Nepal Relations | सहकार्याची नवी सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांची दोन दिवसांची भारतभेट हा केवळ एक राजनैतिक दौरा नव्हता, तर भारत-नेपाळ सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणारी भेट होती. नेपाळमध्ये मार्च महिन्यात जेन-झीने मोठे आंदोलन उभे केले आणि त्यातून सत्तांतर झाले. बालेंद्र शाह यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. पंतप्रधान झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भारतभेट. बालेंद्र शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील थेट चर्चेत दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला. भारताने नेपाळला पंधरा हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले. अयोध्या-जनकपूर थेट रेल्वेसेवेला सुरुवात झाली, तर ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठीही सामंजस्य करार झाले. मोदी आणि बालेंद्र चर्चेमुळे नवी दिल्ली आणि काठमांडू यांच्यात मध्यंतरी निर्माण झालेला दुरावा कमी होण्यास मदत होईल. दोन्ही देशांतील गैरसमज दूर होऊन परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची प्रक्रिया या भेटीने सुरू झाली आहे. त्यामुळे ही भेट दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. मध्यंतरी भारत-नेपाळ संबंधांत अंतर निर्माण झाले होते. नेपाळने चीनबरोबरचे संबंध आणि आर्थिक देवघेव वाढवली होती. त्यामुळे भारताच्या दृष्टीने काहीशी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या भेटीमुळे हे मळभ दूर होण्यास निश्चितच मदत होऊ शकते. परराष्ट्र धोरण राबवताना दोन देशांच्या परस्पर अपेक्षा वाढतात, कधी अपेक्षाभंग होतो, तर कधी मतभेदही निर्माण होतात. मात्र, अशा वेळी संवादाचे दरवाजे खुले ठेवणे महत्त्वाचे असते. मोदी-बालेंद्र भेटीनंतर ‘देर आए, दुरुस्त आए’ असे म्हणता येईल.

नेपाळच्या चीनशी असलेल्या संबंधांबाबत भारताने कधीही आक्षेपार्ह भूमिका घेतली नाही किंवा नेपाळशी असलेले संबंध मर्यादित करण्याचा प्रयत्न केला नाही. भारताने नेपाळबरोबर चर्चेचे आणि व्यापाराचे दरवाजे नेहमीच खुले ठेवले. संकट काळातही भारताने नेपाळला मदतीचा हात दिला आहे. ही मदत केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून नव्हे, तर शेजारी राष्ट्र म्हणून असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यातून केली आहे. भारत आणि नेपाळचे संबंध केवळ राजनैतिक पातळीपुरते मर्यादित नाहीत. या नात्याला ऐतिहासिक, भावनिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभले आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामाता हे दोन्ही देशांतील जनतेचे श्रद्धास्थान आहे. दोन्ही देशांतील लाखो नागरिकांचे परस्परांशी कौटुंबिक आणि सामाजिक संबंध आहेत. व्यापार-व्यवसायातूनही दोन्ही देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे भारत-नेपाळचे नाते हे परंपरेने जपलेले आपलेपणाचे नाते आहे. या भेटीमुळे हे नाते अधिक दृढ होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी विवाहसंबंधांतून दोन्ही देशांतील नाती अधिक घट्ट होत होती. आता रेल्वे आणि हवाई मार्गांच्या माध्यमातून व्यापार, पर्यटन आणि विकासाला चालना दिली जात आहे. मोदी आणि शाह यांची भेट दोन्ही देशांमधील विश्वासाचे नाते पुन्हा प्रस्थापित करण्याबरोबरच सहकार्याच्या नव्या संधी शोधण्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. बालेंद्र शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. जयशंकर यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

बालेंद्र हे नेपाळमधील नव्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करतात. पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास हा त्यांच्या राजकीय अजेंड्याचा प्रमुख भाग आहे. या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळला जाहीर केलेले पंधरा हजार कोटी रुपयांचे (नेपाळी चलनात सुमारे २४ हजार कोटी रुपये) आर्थिक सहाय्य ही या भेटीतील महत्त्वाची घोषणा ठरली. पूरग्रस्त भागांचे पुनर्वसन, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी या मदतीचा उपयोग होणार आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नेपाळचे मोठे नुकसान झाले होते. या आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली होती. त्यामुळे भारताची ही मदत नेपाळसाठी मोलाची ठरणार आहे. नेपाळमध्ये जलविद्युत निर्मितीची प्रचंड क्षमता आहे, तर भारत ही मोठी ऊर्जा बाजारपेठ आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्र हे दोन्ही देशांमधील सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते. नेपाळमधून भारताला होणारा वीजपुरवठा वाढवणे आणि ऊर्जा व्यापाराचा विस्तार करणे, हे बालेंद्र शाह यांच्या भारतभेटीचे महत्त्वाचे फलित ठरू शकते. अशा भागीदारीमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.

रक्सौल-काठमांडू रेल्वेमार्ग विद्युतीकरणासह ब्रॉडगेज करण्यासाठीच्या सर्वेक्षण प्रक्रियेलाही आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. काठमांडू-भैरहवा-लखनौ हा हवाई मार्ग दोन्ही बाजूंनी सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल. धारचुला-दर्चुला पुलाचे उद्‌घाटनही करण्यात आले. तसेच गुजरातमधील कांडला (दीनदयाळ) बंदराचा वापर करण्यासाठी नेपाळला नवा मार्ग उपलब्ध करून देण्याची तयारी भारताने दर्शवली. या सर्व उपाययोजनांमुळे नेपाळच्या दळणवळण आणि व्यापारविषयक संधी वाढण्यास मदत होईल. बालेंद्र शाह यांच्या भारतभेटीत जवळपास आठ सामंजस्य करार झाले. संरक्षण आणि पोलिस क्षेत्रातील सहकार्य, आरोग्य व वैद्यकीय सेवा, तसेच पशुधन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सहकार्यालाही यांमुळे चालना मिळणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘विकसित भारत आणि समुन्नत नेपाळ’ ही नवी संकल्पना दोन्ही देशांनी भागीदारीसाठी स्वीकारली आहे.

आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी, अवकाश संशोधन, डिजिटल सेवा, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान, ऊर्जा व जलसंपदा, रेल्वे-रस्ते आणि डिजिटल संपर्क व्यवस्था, व्यापार व गुंतवणूक तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य करण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे. नेपाळ हा भारताचा शेजारी देश असल्यामुळे भौगोलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्याचे विशेष महत्त्व आहे. भारत आणि चीन या दोन मोठ्या देशांच्या मध्ये नेपाळचे स्थान आहे. नेपाळमधील रस्ते, पूल, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रांत चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणात नेपाळला महत्त्वाचे स्थान आहे. एका बाजूला नेपाळमध्ये चीनची गुंतवणूक वाढत असताना दुसऱ्या बाजूला भारताशी चांगले संबंध टिकवून ठेवणे, हे बालेंद्र शाह यांच्यासमोरील आव्हान आहे. दोन्ही देशात किमान चार ठिकाणी सीमावादाचे प्रश्न आहेत. परस्पर विश्वास, सहकार्य आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मोदी-बालेंद्र शाह भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. या भेटीतील घोषणा आणि सामंजस्य करार प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवले जातात, यावर भविष्यातील संबंधांची दिशा अवलंबून असेल. मात्र, या भेटीने भारत-नेपाळ संबंधांमध्ये नव्या संवादाची आणि सहकार्याची दारे खुली केली आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT