महासंगणक बुद्धिप्रामाण्याचा Pudhari File Photo
संपादकीय

महासंगणक बुद्धिप्रामाण्याचा

स्वदेशी बनावटीच्या तीन ‘परमरुद्र’ या महासंगणकांचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

अत्याधुनिक संशोधनासाठी आवश्यक असलेल्या 130 कोटी रुपयांच्या स्वदेशी बनावटीच्या तीन ‘परमरुद्र’ या महासंगणकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून, देश संघटित क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीत एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी हे महासंगणक विकसित करण्यात आले आहेत. त्यातील दोन महासंगणक पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजी (आयआयटीएम) या संस्थांमध्ये बसवण्यात आले आहेत. नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनअंतर्गत पुण्यातील सीडॅक आणि बंगळुरू येथील आयआयएससी या संस्थांच्या समन्वयातून देशभरातील संशोधन शैक्षणिक संस्था आणि उद्योगांसाठी महासंगणक विकसित करण्यात येत आहेत. शिक्षण, विज्ञान आणि उद्योग यांच्यातील हे सहकार्य कौतुकास्पद आहे. जीएमआरटी येथे एक पेटाफ्लॉप क्षमतेचा, दिल्ली येथील इंटर युनिव्हर्सिटी अ‍ॅक्सिलरेटर सेंटर येथे तीन पेटाफ्लॉप, तर कोलकाता येथील एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस येथे 838 टेराफ्लॉप क्षमतेचा परमरुद्र सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आला आहे. परमरुद्र हे आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्णपणे देशांतर्गतरीत्या विकसित करण्यात आलेले पहिले महासंगणक आहेत. एनएसएम (नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन) अंतर्गत पाच वर्षांत एकूण 32 पेटाफ्लॉप क्षमतेचे महासंगणक बसवण्यात आले आहेत.

अनेक वर्षांच्या परिश्रमांचे हे फलित आहे, असेच म्हणावे लागेल. भारतात प्रगत माहिती, तंत्रज्ञान व संगणकीय विकासाला गती देण्याच्या द़ृष्टीने 1988 मध्ये राजीव गांधी सरकारने दूरसंचार व माहिती, तंत्रज्ञान मंत्रालय आणि माहिती, तंत्रज्ञान विभाग यांच्या माध्यमातून सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग म्हणजे ‘सीडॅक’ या संशोधन संस्थेची स्थापना केली. पुढे बंगळुरू, पुणे, मोहाली, दिल्ली, हैदराबाद अशा शहरांमध्ये सीडॅकचा विस्तार करण्यात आला. भारतात 21व्या शतकाला साजेसे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्दिष्टाने सीडॅकची स्थापना हे क्रांतिकारक पाऊल ठरले. अमेरिकेने भारताला महासंगणक देण्याचे नाकारल्यामुळे स्थापनेनंतर अवघ्या तीन वर्षांच्या काळातच डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली सीडॅकने 1991 मध्ये परम-8000 हा महासंगणक विकसित करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर सुमारे दशकभराच्या काळात सीडॅकने परम-8600, परम-9000, परम 10000, परमपद्म या श्रेणीतील महासंगणक विकसित केले. महासंगणकनिर्मितीच्या तंत्रज्ञानांबरोबरच सीडॅकच्या संगणकतज्ज्ञांनी ई-गव्हर्नन्ससाठी उपयुक्त अशा संगणकीय प्रणाली विकसित केल्या. त्याचप्रमाणे आरोग्य देखभाल, भांडवल बाजार, वित्तीय संस्था आदी क्षेत्रांसाठी माहिती-तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीही तयार केल्या. भारतातील प्रमुख भाषांमध्ये वापरता येतील, अशा संगणकीय प्रणालींचा विकास ही सीडॅकची आणखी एक महत्त्वाची उपलब्धी ठरली. सीडॅकने प्रगत संगणकीय तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी पुणे, दिल्ली, हैदराबाद व बंगळूर येथे प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली. त्यामुळे देशाला कुशल संगणकतज्ज्ञ उपलब्ध होऊ लागले. आता या प्रगतीचा नवीन टप्पा गाठण्यात आला आहे.

जीएमआरटीमधील महासंगणकाचा वापर जलद रेडिओ स्फोटांच्या नोंदी आणि पल्सारच्या अभ्यासासाठी केला जाईल. एकाएकी उत्पन्न होणार्‍या रेडिओ स्फोटांची नोंद घेऊन, त्यांचा संभाव्य उगम शोधण्याचाही प्रयत्न करण्यात येईल. तसेच स्थानिक पातळीवरील हवामान अंदाज अचूक वर्तवणार्‍या मॉडेलसाठी पुण्यातील ‘आयआयटीएम’मध्ये 11.77 पेटाफ्लॉप क्षमतेची आणि देशातील दुसर्‍या क्रमांकाची ‘अर्क’ ही हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. नोएडा येथील नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग येथील 8.24 पेटाफ्लॉप क्षमतेच्या ‘अरुणिका’ हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटर (एचपीसी) यंत्रणेचेही उद्घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संस्थांमधील या यंत्रणासाठी सुमारे 850 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे; परंतु या खर्चाचा उपयोगदेखील आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे आता 22 पेटाफ्लॉपची संगणक क्षमता असून, प्रचंड नोंदी आणि एआयचा वापर करून येत्या काळात एक किलोमीटर क्षेत्रापर्यंत अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे. भारतात आजही हवामान विषयक भाकिते अनेकदा चुकीची ठरतात आणि त्याचा शेतकर्‍यांना फटका बसतो.

हवामान बदलाच्या संकटामुळे मुळातच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या द़ृष्टीने ही सुधारणा बहुमोल आहे, असेच म्हटले पाहिजे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगच्या प्रगतीसाठी हे महासंगणक उपयुक्त ठरणार आहेत. संगणकीय क्रांतीत आपल्या देशाचे योगदान बिट-बाईटमध्ये नसून, टेराबाईटस् आणि पेटाबाईटस्मध्ये असले पाहिजे. त्यामुळे आपण योग्य दिशेने व योग्य गतीने वाटचाल करत आहोत, हे पंतप्रधानांचे उद्गार सार्थच म्हणावे लागतील. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने विज्ञान संशोधनावर भर दिला असून, संशोधन निधीसाठी 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तर एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारताने वैज्ञानिक शोधांत जागतिक स्तरावर आघाडी घेतली पाहिजे आणि अंतराळ क्षेत्र हे त्याचे प्रमुख अंग असावे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत मिशन मंगल असो किंवा चांद्रयान मोहिमा असो, त्यासाठी भारत सरकार निर्धारपूर्वक पावले टाकत आहे. आता आरोग्य, अवकाश आणि आरोग्य या क्षेत्रांसाठीदेखील महासंगणकांचा उपयोग होणार आहे. शिवाय कृषी आणि आपत्ती निवारणाकरिताही त्याचा उपयोग आहेच. एवढेच नव्हे, तर एकूणच अर्थव्यवस्था, व्यवसायसुलभता आणि सुकर जीवनशैलीसाठी परमरुद्र महासंगणक हा बहुमोल ठरणार आहे. याखेरीज, सेमीकंडक्टर इकोसिस्टीममध्ये भारत स्वयंपूर्ण होईल आणि त्या द़ृष्टीनेही महासंगणक उपयुक्त ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT