लहान मुलांचे मैदानावरचे वावरणे कमी झाले आहे. सांघिक आणि मैदानी खेळापासून दूर राहणारी लहान मुले वास्तविक जीवनातील अडचणींचा सामना करताना तुलनेने लवकर खचतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
सतीश शिंगाडे, शारीरिक शिक्षण शिक्षक
कधीकाळी शहरांतील, गावांतील गल्लीबोळांत लहान मुलांचा कल्ला, गोंगाट असायचा. अंगणात, शाळेच्या मैदानात, गल्लीतील रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेवर सायंकाळी लहान मुलांची खेळण्यासाठी गर्दी व्हायची. पालक मुलांना मैदानावरून ओढत घरी आणायचे; पण आता परिस्थिती बदलली. सुट्टीच्या दिवशी दिवसभर मैदानात खेळणारी मुले आता कमी झाली. आता डिजिटल वेडामुळे मैदानापासून बालपण दुरावले.
परिणामी, मैदानी खेळण्याचे कमी होणारे प्रमाण मुलांच्या मानसिक आणि सामाजिक जीवनावर सखोल परिणाम करत आहे.
जागतिक आरोग्य संघटना अणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संयुक्त अहवालात या गंभीर स्थितीवर प्रकाश टाकला आहे. एका अभ्यासात 16 देशांतील 89 हजार मुलांचा समावेश करण्यात आला. यातील निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. सांघिक आणि मैदानी खेळापासून दूर राहणारी लहान मुले वास्तविक जीवनातील अडचणींचा सामना करताना तुलनेने लवकर खचतात, असे म्हटले आहे. नियमित खेळणाऱ्या मुलांच्या अंगी सामाजिक परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता 37 टक्के अधिक दिसून आली. या अहवालानुसार, दररोज तीन तासांहून अधिक काळ मोबाईलवर व्यतित केल्यास लहान मुलांत नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण दुपटीने वाढलेले दिसून येते.
12 ते 17 वयोगटातील मुलांत सामाजिक एकाकीपणाची समस्या 41 टक्क्यांनी अधिक दिसून आली. मैदानी खेळापासून दूर असणाऱ्या मुलांचे बीएमआय (वजन आणि उंची) नियमित मैदानावर असणाऱ्या मुलांच्या तुलनेत सरासरी 2.1 ने अधिक आढळून आले. संशोधकांच्या मते, मैदानी खेळातून मुले जय-पराजय मान्य करणे आणि अपयशातून बाहेर पडण्याचे धडे घेतात. मैदानातील निकाल त्यांना वास्तवातही जीवनातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करतात. याउलट मैदानापासून लांब असणारी मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात आणि प्रत्यक्ष आव्हानांना सामोरे जाताना त्यांची कोंडी होते. ‘युनेस्को’च्या मते, दोन दशकांत गरीब आणि विकसनशील देशांत शाळांतील क्रीडा तासांचे प्रमाण सरासरी 40 टक्क्यांनी कमी झाले.
शहर नियोजनामध्ये प्रत्येक वसाहतीत खेळाची मैदाने, उद्याने आणि राखून ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. शासनाने ‘अर्बन प्ले झोन’सारख्या धोरणात्मक उपक्रमांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे, ज्यात मुलांसाठी निश्चित वेळेत रस्ते किंवा सोसायटी परिसर खुला ठेवण्याची संकल्पना अंमलात आणता येईल. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे डिजिटल खेळ आणि ई-स्पोर्टस्चा उदय झाला. स्क्रीनसमोर खेळणाऱ्या मुलांची प्रतिसादक्षमता वाढत असली, तरी संवादकौशल्य आणि भावनिक बुद्धिमत्ता घटते आहे, हे विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर नियंत्रित ठेवून ‘डिजिटल डिटॉक्स’चे संस्कार बालपणीपासूनच जोपासले गेले पाहिजेत. दर आठवड्याला ‘नो स्क्रीन डे’ आयोजित करणे, पालकांनी आठवड्याच्या शेवटी मुलांसोबत प्रत्यक्ष खेळात सहभागी होणे, अशा उपक्रमांद्वारे समाजात खेळाचे महत्त्व पुन्हा जागवता येईल. मैदानी खेळ ही मुलांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. भारतीय पारंपरिक खेळांना शालेय अभ्यासक्रमात पुनर्प्रतिष्ठा देणे, स्थानिकस्तरावर खेळ महोत्सव आयोजित करणे आणि लहान मुलांना पुन्हा त्या खेळांशी जोडणे, हे भावी पिढीसाठी अमूल्य ठरेल. कारण, खेळ म्हणजे केवळ शारीरिक हालचाल नव्हे, तर ते म्हणजे जीवन जगण्याची एक कलाच आहे.