डॉ. ऋतू सारस्वत, समाजशास्त्र अभ्यासक
युद्ध केवळ सीमांवर लढले जात नाही; त्याचे सर्वात खोल घाव सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर उमटतात. विशेषतः स्त्रिया आणि मुली युद्ध, विस्थापन, लैंगिक हिंसा आणि आर्थिक असुरक्षिततेच्या दुहेरी संकटाला सामोरे जातात.
पश्चिम आशियातील इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्धाने संपूर्ण क्षेत्राची भू-राजकीय स्थिती अस्थिर केली. समाजात युद्ध आणि लष्करी वर्चस्वाचे उदात्तीकरण करण्यासाठी युद्धवीरांच्या संचलनासारख्या आणि स्मारकांसारख्या परंपरा विकसित केल्या गेल्या आहेत. परंतु, आधुनिक युद्धांमध्ये सैनिकांपेक्षाही सामान्य नागरिकांची सर्वाधिक हानी होते, या तथ्याकडे फार कमी लोकांनी लक्ष वेधले आहे. त्यातही स्त्रिया आणि मुली मोठ्या संख्येने युद्धामुळे प्रभावित होतात, हे वास्तव स्वीकारणारे तर त्याहूनही कमी आहेत.
संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्तांच्या जून 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल ट्रेंडस् : फोर्स्ड डिस्प्लेसमेंट इन 2024’ या अहवालानुसार, समकालीन विश्वात युद्ध आणि हिंसाचार हे केवळ सीमांचे प्रश्न राहिलेले नसून, त्यांनी एका सखोल मानवी संकटाचे रूप धारण केले आहे. हा अहवाल सांगतो की, एप्रिल 2025 पर्यंत जगात 12.2 कोटी लोक युद्ध, हिंसाचार, छळ आणि मानवाधिकार उल्लंघनामुळे विस्थापित झाले होते. चिंतेची बाब म्हणजे या निर्वासितांमध्ये निम्मी संख्या स्त्रिया आणि मुलींची आहे, तर सुमारे 40 टक्के मुले आहेत.
सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांनी जारी केलेल्या ‘वूमेन, पीस अँड सिक्युरिटी अजेंडा’मध्ये असा इशारा दिला आहे की, जगभरातील सुमारे 67.6 कोटी स्त्रिया अशा भागात राहात आहेत, जे संघर्ष क्षेत्रापासून 50 किलोमीटरच्या परिघात आहेत. या अहवालानुसार 1946 नंतर जग आज सर्वाधिक सक्रिय सशस्त्र संघर्षांना तोंड देत असून, हे स्त्रिया आणि मुलींसाठी गंभीर धोका आणि अभूतपूर्व वेदनांचे कारण ठरत आहे. ही परिस्थिती गेल्या दोन दशकांत महिला अधिकारांच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीला कमकुवत करू शकते.
अमेरिकन स्त्रीवादी कार्यकर्त्या सुसान ब—ाऊनमिलर त्यांच्या ‘अगेंस्ट अवर विल : मेन, वीमेन अँड रेप’ या पुस्तकात लिहितात की, बलात्कार ही भीती निर्माण करण्याची एक जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे, ज्याद्वारे स्त्रियांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या छायेत ठेवले जाते. तसेच 2004 मध्ये प्रकाशित झालेल्या वेनोना जाईल्स आणि जेनिफर हाइंडमॅन यांच्या ‘साइटस् ऑफ व्हायोलन्स : जेंडर अँड कॉन्फ्लिक्ट झोन्स’ या पुस्तकात इराक, सुदान आणि पूर्व युगोस्लाव्हियासारख्या संघर्षग्रस्त भागांची उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे की, आधुनिक युद्धांचा हिंसाचार केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित राहात नाही, तर तो नागरी जीवनात स्त्रिया आणि मुलांना अत्यंत कठीण परिस्थितीशी झुंजायला भाग पाडतो.
अशा प्रकारे युद्ध हे केवळ लष्करी किंवा राजकीय संकट उरत नाही, तर ते समाजात आधीच अस्तित्वात असलेल्या लैंगिक विषमतेला अधिक गडद करते. परिणामी, स्त्रियांनाच मानवी मदतीची सर्वाधिक गरज असते. पण मदत आणि पुनर्वसनापर्यंत त्यांची पोहोच सर्वात जास्त बाधित झालेली असते, ही बाब खेदजनक आहे. युद्ध संपल्यानंतरही स्त्रिया अनेकदा धोक्याच्या स्थितीतच राहतात. लैंगिक हिंसाचार अनेकदा संघर्षाच्या समाप्तीनंतरही बराच काळ सुरू राहतो. संघर्षाच्या वेळी सुरक्षेचे धोके किंवा आर्थिक अडचणींमुळे मुलींचे शिक्षण थांबवले जाते, ज्यामुळे कमी वयात विवाहाची शक्यता वाढते. युद्धाच्या परिस्थितीत मानवी मदतही मुलींना समान प्रमाणात उपलब्ध होत नाही. लैंगिक हिंसेशी जोडलेला सामाजिक कलंक या संकटाला अधिक तीव्र करतो.
अशा परिस्थितीत पीडित स्त्रिया अनेकदा गप्प राहण्यास विवश होतात. त्या ना हिंसेची तक्रार नोंदवू शकतात, ना आवश्यक ती मदत मिळवू शकतात. आर्थिक असमानताही या शोकांतिकेला अधिक तीव्र करते. संघर्षादरम्यान अनेक स्त्रिया कुटुंबातील अशा सदस्यांना गमावतात, ज्यांच्या उत्पन्नावर त्यांचे जीवन अवलंबून होते आणि अचानक त्यांना कुटुंबाच्या जबाबदारीसह खोल आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. युद्धाच्या या भीषणतेमध्ये असहाय स्त्रिया आणि मुले जगण्यासाठी संघर्ष करतात ही बाब समाजाच्या नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते.