Weather news India | मान्सूनचे शुभवर्तमान pudhari photo
संपादकीय

Weather news India | मान्सूनचे शुभवर्तमान

पुढारी वृत्तसेवा

तापमानाचा पारा अर्धशतक झळकावण्याच्या दिशेने चाललेला असताना, उष्णतेच्या लाटांनी सर्वदूर होरपळ होत असताना भारतीय हवामान खात्याने दिलेली मान्सूनच्या आगमनाची सुवार्ता दिलासादायक आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अत्यंत पोषक स्थिती तयार झाली असून, 16 मे च्या सुमारास बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होऊ शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले समुद्रावरील वार्‍यांची दिशा, आर्द्रता आणि वातावरणीय दाबाचे घटक सध्या अनुकूल आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची पावले वेगाने भारताच्या दिशेने पडू लागली आहेत. मान्सूनचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहिल्यास केरळ आणि महाराष्ट्रातही पाऊस वेळेपूर्वी धडकू शकतो. मान्सूनचे आगमन नेमके झाले आहे का, मान्सूनपूर्व पाऊस आहे की अवकाळी ही चर्चा दरवर्षी रंगते. हवामान खात्याच्या संकेतांनुसार मान्सूनच्या अधिकृत आगमनासाठी केवळ पाऊस पुरेसा नसून तीन अटी पूर्ण होणे आवश्यक असते. एक म्हणजे केरळमधील 14 ठरावीक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस 2.5 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद होणे. दुसरी म्हणजे वातावरणातील वार्‍याचा वेग ठरावीक उंचीवर ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असणे आणि तिसरी म्हणजे उपग्रहाद्वारे मोजल्या जाणार्‍या उष्णतेच्या लहरींचे प्रमाण विशिष्ट मर्यादेच्या खाली असणे. या तिन्ही गोष्टींची पूर्तता झाल्यावरच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. मान्सूनच्या आगमनाच्या तारखेत दरवर्षी तफावत आढळते. तरीही साधारणपणे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. गतवर्षी मात्र तो 24 मे रोजी तर 2024 मध्ये 30 मे रोजी पोहोचला होता. गेल्या पाच वर्षांत मे महिन्याच्या मध्यानंतर दक्षिण भारतात आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. भारतातील एकूण पावसाच्या 70 टक्क्यांहून अधिक पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडतो. मान्सूनचे लवकर किंवा उशिरा येणे याचा परिणाम विविध क्षेत्रांवर होतो. खरीप हंगामातील पेरण्यांचे संपूर्ण नियोजन मान्सूनच्या आगमनावर अवलंबून असते. मान्सून वेळेवर आला, तर जमिनीतील ओलावा पेरणीसाठी अनुकूल बनतो. यामुळे उत्पादनात वाढ होते. याउलट मान्सून लांबणीवर पडल्यास पिकांचे चक्र विस्कळीत होते आणि त्याचा फटका अन्नधान्य उत्पादनाला बसतो. प्रमुख धरणे आणि नद्यांमधील पाणीसाठा मान्सूनवरच अवलंबून असतो. मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास जलविद्युत प्रकल्पांची कार्यक्षमता टिकून राहते आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा ताण कमी होण्यास मदत होते. मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे शेती उत्पादनात घट झाल्यास अन्नधान्याचे भाव वाढूत त्याचा फटका सर्वसामान्यांना आणि विकास दराला बसतो. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील पृष्ठभागाचे वाढते तापमान मान्सूनच्या आगमनावर परिणाम करत आहे. हवामान बदलामुळे मान्सून आगमनाची तारीख आणि पावसाचे वितरण यात मोठी अनिश्चितता निर्माण झालीय. आगमनाइतकेच मान्सूनचे वितरणही महत्त्वाचे आहे. वेळेवर दाखल होऊन नंतर खंड पडल्यास शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट येते. गेल्या काही वर्षांत कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वी पावसाळ्यात 100 दिवस पाऊस पडायचा. आता एखाद्या वर्षी तो 80 तास पडतो, तर एखाद्या वर्षी अतिवृष्टी होऊन ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण होते. यंदा अल निनो सक्रिय झाल्यामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकरी, सामान्य जनता आणि शासन-प्रशासन सारेजण त्यामुळे काहीसे चिंतेत आहेत. मे महिन्याच्या उत्तरार्धातील स्थिती महत्त्वाची आहे. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात या काळात निर्माण होणारी चक्रीवादळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम करतात. हे चक्रीवादळ ओमान किंवा पाकिस्तानच्या दिशेने सरकले, तर ते मान्सूनसाठी आवश्यक असलेली आर्द्रता सोबत घेऊन जाते. यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि केरळमध्ये पावसाचे आगमन लांबणीवर पडते. यंदा अशी शक्यता दिसत नाही, हीदेखील आनंदाची बाब आहे.

अल निनो सक्रिय असतानाच्या काही वर्षांमध्ये भारतीय उपखंडात पर्जन्यमान चांगले राहिल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात. 1951 ते 2023 या कालावधीतील सुमारे 15 अल निनो वर्षांपैकी साधारण 6 वर्षांमध्ये भारतात सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यामागे ‘इंडियन ओशन डायपोल’ हा घटक अत्यंत प्रभावी ठरतो. हिंदी महासागराचा पश्चिम भाग पूर्वेकडील भागापेक्षा जास्त उबदार असतो, तेव्हा त्याला ‘पॉझिटिव्ह आयओडी’ म्हटले जाते. हा घटक प्रशांत महासागरातील अल निनोच्या नकारात्मक प्रभावाला निष्प्रभ करतो. 1997 मध्ये शतकातील सर्वात शक्तिशाली अल निनो सक्रिय असूनही भारताने सामान्यपेक्षा जास्त म्हणजे 102 टक्के पाऊस अनुभवला होता. त्यामुळे अल निनो, भीषण दुष्काळ असे म्हणत भुई थोपटण्यापूर्वी मान्सूनला अनुकूल अन्य घटकांमधील बदलांकडे लक्ष ठेवणे आवश्यक ठरते. पाऊस किती पडतो यापेक्षाही आपण तो साठवतो किती, जमिनीमध्ये किती जिरवतो हे अधिक महत्त्वाचे आहे. आजवर आलेल्या दुष्काळांनी प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागले. तरीही जल संवर्धन, पाणीवापर याबाबत समाजात पुरेशी जागरुकता नाही. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील किती तरी गावांची पाणीटंचाई दूर होऊन तेथील भूजलपातळी उंचावली. नाला खोलीकरण, रुंदीकरण, सिमेंट साखळी बंधारे यांचा समावेश असणारा हा उपक्रम महाराष्ट्राला पाणीदार करणारा आहे. या मोहिमेमुळे राज्यात सुमारे 25 लाख टीसीएमहून अधिक पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. यंदा मान्सून काळात जास्तीत जास्त जलसंवर्धन झाल्यास पावसात पडणार्‍या खंडामुळे निर्माण होणारा ताण जाणवणार नाही. जागतिक संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करताना इंधनाचा काटकसरीने वापर करण्याबाबत समाज जागृत होत आहे. तीच जागरुकता पाणीवापराबाबतही दिसायला हवी. कारण जीवाश्म इंधनाला पर्याय आहेत; पाण्याला नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT