‘इलना’ : भाषिक पत्रकारितेची रक्षक File Photo
संपादकीय

‘इलना’ : भाषिक पत्रकारितेची रक्षक

ILNA

पुढारी वृत्तसेवा

अर्जुन चोप्रा

संचालक, दैनिक ‘पंजाब केसरी’ तथा उपाध्यक्ष, ‘इलना’ माध्यम उद्योग डिजिटल परिवर्तन, वाढता खर्च आणि ग्राहकांच्या बदलत्या वर्तणुकीसारख्या नवीन आव्हानांचा सामना करत आहे. अशावेळी ‘इलना’ संघटनेची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.

प्रादेशिक वृत्तपत्रांच्या आवाजांना एकत्र आणणे आणि त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करणे या उद्देशाने इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशनची (भारतीय भाषिक वृत्तपत्र संघटना -‘इलना’) स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1941 मध्ये करण्यात आली. भारतीय भाषिक वृत्तपत्र संघटनेचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिला आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशात ‘इलना’ केवळ प्रतिनिधी संस्था म्हणून उदयास आलेली नाही, तर भाषाआधारित पत्रकारितेच्या सामर्थ्याचे प्रतीकही ठरली आहे. प्रादेशिक आणि स्थानिक वृत्तपत्रे बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात ‘इलना’ची जेव्हा स्थापना झाली तेव्हा भारतात पत्रकारितेचा झपाट्याने विस्तार होत होता. इंग्रजी माध्यमांना सरकारी जाहिराती, संसाधने आणि धोरणात्मक लाभांमध्ये विशेष प्राधान्य होते, तर प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. ‘इलना’ने अगदी सुरुवातीपासूनच हे सुनिश्चित केले की, हिंदी, पंजाबी, बंगाली, तामीळ, मल्याळम, मराठी, गुजराती, तेलुगू आणि इतर सर्वच भाषांमधील वृत्तपत्रांचा आवाज राष्ट्रीय स्तरावर ऐकला जाईल.

भारतातील बहुसंख्य लोक त्यांच्या मातृभाषेत बातम्या वाचतात. प्रादेशिक वृत्तपत्रे गाव-खेड्यापर्यंत पोहोचतात आणि सामान्य लोकांचा आवाज बनतात. निवडणूक काळात केवळ स्थानिक भाषिक वर्तमान पत्राचाच आधार उमेदवार घेतात. त्याचमुळे भाषिक पत्रकारिता अधिकाधिक बळकट करण्यासाठी ‘इलना’चे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. प्रादेशिक प्रसारमाध्यमांचा आवाज धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवणे हा ‘इलना’चा मोठा उद्देश आहे. सरकारी जाहिरातींचे न्याय्य वितरण, वृत्तपत्रांची उपलब्धता, छोट्या मध्यम प्रकाशनांना न्याय्य संधी आणि नियम व मानकांवरील मार्गदर्शन यासारख्या भाषिक वृत्तपत्रांच्या हितसंबंधांचे समर्थन सरकार, जाहिरात संस्था आणि माध्यम धोरणकर्त्यांसमोर ‘इलना’ने दीर्घकाळ केले आहे. त्याच धर्तीवर ‘इलना’ प्रभावीपणे प्रादेशिक प्रसारमाध्यमांचे हक्क आणि गरजांचे प्रतिनिधित्व करते.

भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेमध्ये भारताची ताकद आहे. विविध प्रदेश आणि भाषांमधील आवाज राष्ट्रीय चर्चेत समानतेने सहभागी होतील, याची खात्री करून ‘इलना’ ही विविधता जपून ठेवते. यामुळे लोकशाही अधिक समावेशक आणि मजबूत होते; मात्र याकरिता लघू आणि मध्यम प्रकाशनांचे सहकार्यही आवश्यक आहे. देशातील अनेक भाषांतील वृत्तपत्रे जिल्हा स्तरावर किंवा छोट्या शहरांमधून प्रकाशित केली जातात, हे सर्वश्रृत आहे. संसाधनांच्या मर्यादा असूनही ही वर्तमानपत्रे स्थानिक पत्रकारितेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ‘इलना’ या प्रकाशनांना प्रशिक्षण, तांत्रिक माहिती, मुद्रण आणि वृत्तपत्रपूर्व सुधारणा आणि व्यावसायिक मार्गदर्शनाद्वारे प्रगती करण्यासाठी मदत करते.

विविध राज्ये आणि भाषांमधील प्रकाशकांना ‘इलना’ हे एक समान व्यासपीठ पुरवते. ज्यावर ते खर्च, जाहिरात, वितरण, डिजिटल संक्रमण यासारख्या उद्योगातील आव्हानांवर चर्चा करू शकतात आणि सामूहिक उपाय शोधू शकतात. अशाप्रकारे ही संघटना संपूर्ण उद्योगाला बळकट करण्यासाठी काम करते. ‘इलना’चे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी मला दिलेल्या जबाबदारीखाली मी प्रसारमाध्यमांच्या उन्नतीसाठी वचनबद्ध आहे. ‘इलना’ने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक माध्यमांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लोकशाहीच्या ताकदीसाठी भाषिक वृत्तपत्रे मजबूत आणि स्वतंत्र असणे खूप महत्त्वाचे आहे आणि ‘इलना’ या उद्देशाचा पाठपुरावा करत आहे. आज माध्यम उद्योग डिजिटल परिवर्तन, वाढता खर्च आणि ग्राहकांच्या बदलत्या वर्तणुकीसारख्या नवीन आव्हानांचा सामना करत आहे. अशावेळी ‘इलना’ची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे. ही संघटना केवळ भाषिक प्रसारमाध्यमांची परंपरा जतन करत नाही, तर त्यांना भविष्यासाठीही तयार करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT