कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सर्वात जास्त घुसमट कुणाची होत असेल, तर ती निष्ठावंत कार्यकर्त्याची. कार्यकर्ता लहान असो की मोठा असो, त्याला आज ना उद्या वरचे पद हवे असते. वरचे पद मिळवण्याची संधी त्याला निवडणुकांमध्ये मिळत असते. अनेक पक्षांमध्ये ती मिळते तर अनेक पक्षांमध्ये मिळत नाही. गेली वर्षांनुवर्षे कार्यकर्ता पक्षासाठी दिवसरात्र झटत असतो. राज्य पातळीवरचे नेते आले की, तो सतरंज्या टाकण्यापासून ते बॅनर लावण्यापर्यंत सगळी कामे करत असतो. सातत्याने वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागत असते.
दरम्यान, आपल्या घराच्या बैठकीमध्ये सर्वोच्च नेत्याच्या कानात बोलतानाचा एक फोटो पण त्याने लावलेला असतो. आपण जे काही पुण्य संचित करत आहोत, त्याचा उपयोग आपल्याला पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी निश्चित होईल, याची त्याला हमखास खात्री असते. प्रत्यक्ष तिकीट वाटपाच्या वेळी मागे राहून काम करणार्या कार्यकर्त्याला तिकीट न मिळता, कुठलेही काम न करता नेत्यांच्या पुढे पुढे करणार्या कार्यकर्त्याला तिकीट मिळते आणि मग या कार्यकर्त्याचा हिरमोड होतो.
आपण इतकी वर्षे या पक्षात का वाया घालवली, असा प्रश्न त्याला पडायला लागतो. दरम्यान, अशावेळी तो बंडखोरीचे निशाण उभे करून अपक्ष उमेदवारी जाहीर करतो आणि मग सुरू होतो त्याला समजावण्याचा प्रकार. त्याला समजावून सांगण्यासाठी क्वचित प्रसंगी राज्यपातळीवरील नेत्यांचे फोन पण येतात. त्याचा मुलगा तरुण असेल, तर त्याला समजावून सांगून याला अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली जाते.
तिकीट वाटप सुरू असताना जो महत्त्वाचा प्रकार सुरू असतो, त्याला तिकीट कापाकापी असे म्हणतात. अशाच एका कार्यकर्त्याचे तिकीट कापले गेले तेव्हा त्याने पक्षाच्या कार्यालयासमोर भले मोठे बॅनर लावले. त्या बॅनरवर लिहिले होते, ‘माझे तिकीट कापणार्यांचे शतशः आभार.’ या पाठोपाठ त्याने आपण आजवर केलेल्या कामाची यादी दिली आहे आणि पक्षाला स्पष्ट असा इशारा दिलेला आहे.
अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची महाराष्ट्रात काही कमी नाही. बरेचदा त्यांना बंडखोरी करण्यासाठी उद्युक्त केले जाते, हेही ढळढळीत वास्तव आहे. कार्यकर्ते मंडळींचा असा प्रवास कायमच सुरूच असतो. त्यातले अनेकजण नेहमी सतरंजी उचलत राहतात, तर अनेकजण हुशारीने पक्ष आणि नेतेही बदलत राहतात. आणि या बदलाबदलीमध्ये स्वतःच्या पदरात बरेच काही पाडून घेत असतात. एकंदरीत कार्यकर्त्याचा नेता होणे, हे देखील योग्य वेळी योग्य व्यक्तीसोबत असण्यावरच अवलंबून असते.