गोव्यात वर्षभर अनेक महोत्सव होत असतात. नोव्हेंबरमध्ये होणार्या ‘इफ्फी’ची चित्रपट रसिक, आस्वादक आणि विश्लेषक वाट पाहत असतात. आज गुरुवारी ‘इफ्फी’चा पडदा उघडणार आहे.
मयुरेश वाटवे
सनबर्न हा संगीतनृत्य महोत्सव गोव्याबाहेर गेला असला, तरी गोव्यात वर्षभर पाहण्यासारखे आणि पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक महोत्सव होतच असतात. पुढील महिन्यात होणारा सेरेंडिपिटी महोत्सव हे जसे आकर्षण असते, तसेच नोव्हेंबरमध्ये होणार्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचीही (इफ्फी) चित्रपट रसिक, आस्वादक आणि विश्लेषक वाट पाहत असतात. आज गुरुवारी ‘इफ्फी’चा पडदा उघडेल तेव्हा चित्रपट रसिकांसाठी 84 देशांमधून निवडले गेलेले 270 हून अधिक चित्रपट पुढील नऊ दिवसांत दाखवले जाणार आहेत. कंट्री फोकस म्हणून यंदा जपान हा देश निवडला गेला आहे.
2004 मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नाने ‘इफ्फी’ गोव्यात आला आणि त्याच वर्षी त्याची कायमस्वरूपी केंद्र म्हणून घोषणाही झाली. दक्षिणेतील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यातील अनेकांना तो महोत्सव दक्षिणेत व्हावा, असे वाटत होते. तो पूर्वीसारखाच फिरता असावा इथपासून ते गोव्यात त्याचे कायम केंद्र नको अशा मागण्या झाल्या; मात्र गेली 21 वर्षे अखंडितपणे तो गोव्यात होत आहे. गोव्यातील ‘इफ्फी’चे सुरुवातीचे स्वरूप थोडे उत्सवी होते. आता उत्सवीपणा कमी होऊन फक्त सिनेमाकडेच गंभीरपणे पाहण्याकडे कल आहे. ‘इफ्फी’ने गोव्याला पुन्हा एकदा जागतिक (चित्रपट) नकाशावर आणले; मात्र ‘इफ्फी’पुढील आव्हाने कायम आहेत. दोन दशकांनंतरही चित्रपट संस्कृती रुजवण्यात आलेले अपयश आणि त्यामुळे स्थानिक मराठी/ कोकणी चित्रपट निर्मितीतील यश सलणारे आहे.
गोवा पर्यटनाला ‘इफ्फी’मुळे चालना मिळाली. महोत्सवात चित्रपट निर्माते, उद्योग, व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमी आकर्षित झाले, हॉटेल्स भरली आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळाली; मात्र या महोत्सवाचा गाभा चित्रपट हा आहे. एकाक्षणी तोच हरवून जाईल की काय, अशी भीतीही व्यक्त होते. गेल्या काही वर्षांत चित्रपट निवडीवरून आयोजकांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात ज्या दर्जाचे चित्रपट निवडले जात होते, तो दर्जा राहिलेला नाही, अशी नाराजीही व्यक्त होत असते. स्थानिक चित्रपट निर्मात्यांची तक्रार आहे की, जागतिक महोत्सव असूनही गोव्याला, गोव्याच्या मराठी/कोकणी चित्रपटाला त्याचा फायदा झालेला नाही. सरकारने सुरू केलेली चित्रपट अनुदान योजना बंद आहे. त्यामुळे स्थानिक चित्रपट तयार होत नाहीत. यंदा कसेबसे दोनच कोकणी चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. चित्रपट संस्कृती रुजायला जे प्रयत्न व्हायला हवे होते, ते झाले नसल्याने स्थानिक पातळीवर पुरेशी प्रतिभा विकसित झाली नाही, अशी नाराजी नामवंत चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी व्यक्त केली. शेटगावकर यांचे अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवांत दाखवले गेलेत. त्यामुळे त्यांचे मत दुर्लक्षून चालणार नाही.
या महोत्सवाने स्थानिक चित्रपट निर्मात्यांना नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून दिल्या. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फिल्म बाजारसारख्या उपक्रमांनी तरुण प्रतिभेला आकर्षित केले; मात्र स्थानिक चित्रपटांना प्रोत्साहनच न मिळाल्यास त्याचा कितपत लाभ होईल, हे पाहिले पाहिजे. पणजीपलीकडे ग्रामीण भागात स्थानिक चित्रपटांसाठी पायाभूत सुविधा आणि पाठिंब्याचा अभाव आहे. गोवा मनोरंजन संस्थेने वर्षभर चित्रपटांशी निगडीत उपक्रम राबवले पाहिजेत. विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी शॉर्ट फिल्म स्पर्धा, त्यातील बक्षीसप्राप्त फिल्मना मोठे व्यासपीठ प्राप्त करून देणे आवश्यक आहे. चित्रपट अनुदान योजना सुरू व्हायला हवी. राज्य चित्रपट महोत्सव नियमित व्हायला हवा. त्यासाठी सरकारकडून लागेल ती मदत देणे गरजेचे आहे. खासगी संस्थेतर्फे आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. अर्थात, टीका, तक्रारी होत राहतील, तरीही पुढील नऊ दिवस रसिक ‘इफ्फी’ला प्रतिसाद देणारच आहेत.