संपादकीय

पहिला चहा | बळीराजाचं राज्य येऊ दे!

पुढारी वृत्तसेवा

ढगांनी भरलेले आभाळ मातीला प्रश्न विचारते! आणि मातीची करुण कथा आभाळाला भिडते! यंदा मान्सून अरबी समुद्रात अडकला तर पिकं कशी डोलणार माय? माती गहिवरली आणि म्हणाली, इथे घाम गाळणारा शेतकरी बांधावर बसून रडेल आणि तेवढं पाणी पिकांसाठी पुरेसं आहे. तू नको काळजी करू. राहा तू पाण्याने भरगच्च समुद्रावर टेहळण्या करत, मान्सून बागडतोय त्या दूरच्या अरबी पाण्यावर, तोवर घे निद्रा हवी तेवढी तूही, नकोस ढगाळू इतक्यात, नकोस झाकू सूर्यास, आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या चातकास नकोस हुल देऊ, शेतकरी स्वप्नं तुडवून पिकांसाठी काळीज (जमिनीचा तुकडा) गहाण ठेवून कोरभर भाकरीचा चंद्र उशाशी घेऊन निजलाय, उद्यासाठी राहील का थोडी शिल्लक म्हणून भाकरीकडे पाहत बसलाय.

विदर्भातला रांगडा पाऊस, कोकणातला तालेवार पाऊस, खान्देशातला, माणदेशीत वेशीवर थुईथुई नाचणारा मानाचा पाऊस, सगळे पावसाळे महाराष्ट्राच्या मातीत एकवटून फेर धरणार कधी, त्या अवखळ सरींना मातीशी सांगड घालून देणार कधी, पक्षी, पिकं, फळं, फुलं, शेतकरी त्या सरींत चिंब भिजणार कधी? वेलींना आधार देणारे वृक्ष बहरणार कधी? सांग सांग भोलानाथ म्हणत मुलं आभाळा तुझ्याकडे बघत फेर धरून नाचत आहेत. इवल्याशा बागडणाऱ्या पायांना सरींचा स्पर्श होणार कधी? पायांना बोचणारा मातीचा कडक ढेकुळ मऊशार होऊन पुन्हा मृत्तिका होणार कधी?

शेतातल्या खोप्यातून पिकं न्हाताना दिसणार कधी? घरटे बघ मैनेचे ओस पडले, त्या वृक्षाला घरट्यासाठी बळ दे तरी. विळखा सर्प न सोडी जरी, त्या कल्पतरूस साथ दे वादळाची. फणा काढून असंख्य नाग डोलतील अवतीभवती बळीराजाच्या ते प्रश्न आणि त्यांचे फास नकोत गळ्याभोवती मात्र. ही युद्धाची मरूभूमी भासते ओसाड उगाच बहरलेली, ना मोलभाव साजेसा, ठेकेदारांच्या पाशात चुकले गणित सारे. गाव उजाड झाले एकेक, शेतकरी हताश होऊन, बाहुची करून उशी घेई आभाळ ओढून कोरडे. रीत्या जमिनीशी रीते नाते, आता माय लेकरं आणि म्हातारीही झाली मायेकडून रीती, अन्‍नास परकी, आभाळा घे जरा गिरकी. नुसतेच नको चौकशीसाठी येऊ अंगणात, वाटीतला घास ताटात सांडू दे जरा, उपाशी लेकरांना घास भरवू दे जरा. बळीराजाचं राज्य येऊ दे पुन्हा.

आभाळ गरजू लागले. धाय मोकलून रडू लागले. बळीराजाच्या गालावरून सुखाचे अश्रू ओघळले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT