मुरलीधर कुलकणी
लंडनच्या प्रसिद्ध बेकर स्ट्रीटवर वसलेले मादाम तुसाद संग्रहालय हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, राजकारणी आणि जागतिक स्तरावरील सेलिब्रिटींच्या मेणाच्या प्रतिकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या या संग्रहालयाची सध्या तेथे सुरू असलेल्या ‘आयकॉन्स ऑफ इंडिया’ या प्रदर्शनामुळे जगभरात चर्चा सुरू आहे. मे आणि जून 2026 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी 1 मेपासून सुरू झालेल्या या विशेष प्रदर्शनात भारतीय चित्रपट आणि क्रीडा विश्वातील 13 दिग्गजांचे मेणाचे पुतळे आहेत. यामुळे लंडनच्या वातावरणात भारतीयत्वाचा एक अनोखा उत्साह दिसून येत आहे. प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात समाविष्ट सेलिब्रिटींची व्यापकता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, दीपिका पदुकोन, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, रणवीर सिंग, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन आणि काजल अग्रवाल यांच्यासोबतच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन केवळ पुतळ्यांचे प्रदर्शन नसून, भारतीय ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक मानले जात आहे.
या प्रदर्शनाच्या आयोजनामागील रंजक बाजू म्हणजे या पुतळ्यांच्या जगप्रवासाचा इतिहास. हे सर्व पुतळे एकाच ठिकाणी नेहमी उपलब्ध नसतात, तर ते जगातील विविध शहरांमध्ये असलेल्या मादाम तुसादच्या शाखांमधून खास या प्रदर्शनासाठी लंडनला आणले आहेत. विराट कोहलीचा पुतळा बँकॉकहून, तर ऐश्वर्या रायचा पुतळा न्यूयॉर्कमधील संग्रहालयातून हवाई मार्गाने लंडनला आणला आहे. यासाठी प्रचंड मोठी लॉजिस्टिक व्यवस्था आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. मेणाच्या पुतळ्यांची निर्मिती ही एक अत्यंत सूक्ष्म आणि किचकट प्रक्रिया असते. यासाठी शेकडो मोजमापे घेतली जातात आणि प्रत्येक पुतळ्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मानवी केसांचा वापर, त्वचेचा पोत आणि हुबेहूब लूक देण्यासाठी लागणारी कारागिरी ही कौतुकास्पदच आहे. लंडनमधील भारतीय समुदाय किंवा तिथले स्थानिक पर्यटक या पुतळ्यांसमोर उभे राहतात, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष सेलिब्रिटींसोबत असल्याचे भासते. विशेषतः सचिन आणि विराटच्या पुतळ्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
हे प्रदर्शन लंडन आणि भारताच्या सांस्कृतिक संबंधांचा एक नवीन अध्याय आहे. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे नागरिक स्थायिक आहेत, त्यांच्यासाठी आपल्या देशाची संस्कृती आणि आपले आवडते कलाकार परदेशात पाहणे हा एक वेगळाच भावनिक अनुभव आहे. या प्रदर्शनामुळे लंडनच्या पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळत असून, जगभरातील भारतीय पर्यटकांचा ओघ सध्या लंडनकडे वाढला आहे. चित्रपटांमधून आपण ज्यांना पडद्यावर पाहतो, त्या कलाकारांच्या या प्रतिकृती खर्याअर्थाने कलात्मकतेची एक उत्तम साक्ष देतात. केवळ मनोरंजनच नव्हे, तर भारतीय जीवनशैलीचे दर्शन घडवणारा हा सोहळा 30 जूनपर्यंत पर्यटकांसाठी खुला राहणार आहे. या प्रदर्शनामुळे भविष्यात भारतीय कलाकारांच्या पुतळ्यांचे प्रमाण जागतिक संग्रहालयांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, हे प्रदर्शन भारतीय चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरले आहे.