जन्म झाल्यानंतर या विश्वात सर्वात काही शाश्वत असेल, तर ते म्हणजे मरण असते. जन्मलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस या पृथ्वीतलावरून एक्झिट घेत असतो. एखादी सेलेब्रिटी व्यक्ती समजा 80 पेक्षा जास्त वयाची असेल आणि काही एक आजारपणामुळे दवाखान्यात अॅडमिट असेल, तर बरेचदा त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या अफवा पसरत असतात. आजकाल प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीची घाई झाल्यामुळे आणि व्हाटस्अॅप नावाचे प्रकरण आयुष्यात आल्यामुळे कधी एकदा आपल्याला पहिल्यांदा माहीत झालेली बातमी प्रसारित करतो, असे लोकांना झाले आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझीये मरण पाहिले म्या डोळा, तुका म्हणे मज काय जीविताचा गोडवा’ अशी अनेक लोकांची अवस्था झालेली पाहायला मिळते. गंभीर आजारी असलेली व्यक्ती असंख्य चाहते असणारी असेल, तर काहीही कारण नसताना त्याच्या मरणाची अफवा पसरते आणि अवघ्या काही तासांत ती देशभर सर्वांना माहीत होते, असे घडताना आपण नेहमी पाहत आहोत.
दणकट शरीरयष्टीचे एक अभिनेते नुकतेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू होते. उपचारांना ते प्रतिसादही देत होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे शेवटचा दिस गोड व्हावा, अशी काही त्यांची वेळ आली नव्हती; परंतु अचानकच त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली आणि शोकाकुल चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजलीपण अर्पण करून टाकली. अवघ्या दोन दिवसांत बरे होऊन सदर अभिनेते परत स्वतःच्या घरीसुद्धा गेले. त्यांच्या न झालेल्या मृत्यूवरून झालेले कवित्व अद्यापही गाजत आहे. हा अभिनेता दवाखान्यातील आपल्या पलंगावर बसून टीव्हीवर आपल्याच मृत्यूची बातमी पाहत आहे, अशाप्रकारचे मिम्स पाहण्यात आले आणि खरोखरच जगाच्या वागण्याचे कुतूहल वाटले. किती ती घाई? किती तो उतावीळपणा ? या गोष्टींना काहीही मर्यादा राहिलेली नाही. कुठल्याही बातमीची खातरजमा न करता ती बातमी जमेल तशी पसरून टाकणे याला कारणीभूत सोशल मीडिया आहे. वर्तमानपत्रांनीसुद्धा खरोखरच सदरील व्यक्ती एक-दोन दिवसांत मरण पावली, तर लिहावयाचे अग्रलेखही लिहून ठेवले असतील. या ठिकाणी आपल्या पत्रकारितेचे कौतुक करावे लागेल. कारण, त्यांच्या मरणाची बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात छापून आली नाही.
सोशल मीडियामुळे अबालवृद्धांना म्हणजेच बालकापासून ते वृद्ध व्यक्तींर्यंत सर्वांना आपण काही ना काहीतरी पोस्ट करावे असे वाटत असते. या सर्वव्यापी पसरत गेलेल्या अगोचरपणामुळे अशा बातम्या नेहमी ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळतात. ज्या व्यक्तीच्या मृत्यूची चुकीची बातमी व्हायरल होते त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते असे म्हणतात. या अभिनेत्याला शतकोत्तर वाटचाल करण्यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा!