बंडू : (दारूच्या अड्ड्यावर बसून समोर दुसर्या अड्ड्याकडे पाहत) पांडू, ती गर्दी बघ रे. पार्लर बाजूला आहे आणि दारूचा अड्डा त्या शेजारी. म्हणून त्या अड्ड्यावर गर्दी जास्त आहे बहुतेक. पिचक धुम साले. लोक आणि तकलादूपणा जाम फोफावतोय अशा ठिकाणी...
पांडू : ओ बंडोपंत! शुद्धीवर या. तुम्ही पण त्यांचे सख्खेच आहात. (ग्लास उंचावत) तुमचं लक्ष अड्ड्यावर कमी आणि त्या पार्लरवर जास्त आहे.
बंडू : इथं कशी काय गर्दी नाही पण? इथं तिथल्यापेक्षा सोयी जास्त. तरी तिकडे रस्त्यापर्यंत गर्दी? काय नेमके? चल बघूया.
पांडू : बस रे, आता कुठं पहिल्या ग्लासाने चाहूल द्यायला चालू केलीय.
बंडू : तुमच्यासारख्या पेदाडांमुळे दारूचे अड्डे सुखावलेत. वेटर... वेटअर्र..!
वेटर : बोला साहेब काय हवं? कोल्ड वॉटर की साधं? सोडा की कोल्ड्रिंक?
बंडू : ती समोरच्या दारूच्या दुकानावर येवढी गर्दी का? हितं का नाही?
वेटर : सायेब, त्यो समोरचा बार ग्रामपंचायत हद्दीत येतो. तिथं फी कमी, म्हणून दरही कमी. आमचा बार कॉर्पोरेशनच्या हद्दीत म्हणून मग आमचे दर महाग. पण आमच्या इथं बसायला प्रशस्त जागा, वॉशरूम आणि स्वच्छता जास्त आहे. तिथे थोडेच लोक आतमध्ये बसतात. बाकी सगळे पार्सलवाले.
पांडू : अरे पण, कोणाला हौस आहे इथे बसायची. तुमचा आग्रह आणि सेवा दोन्ही लेट. वर आणि बिल वाढीव. जीएसटी वेगळा. आधी बघितलं असतं तिकडं तर इकडं आलोच नसतो.
बंडू : मी तेच सांगत होतो तुला.
वेटर : अहो, त्या दुकानामुळे आमच्या मालकावर अन्याय होतोय. आता हे परमिट रूम, बीअर बार आणि हॉटेल एकत्र आहे तरी लोक साधे स्नॅक्सही मागवत नाहीत. आता दारू पण मागवत नाहीत. गर्दी बघतात आणि तिकडे पळतात. माझा पगारबी तटलाय त्यामुळं.
पांडू : तूपण जा ना तिकडे नोकरीला. शेजारी-शेजारी दुकानांना परवाने देतात कसे. शासनाला लोकांची गय नाही. रद्द करावे असे परवाने.
बंडू : चल. तो राहूदे. आपण जाऊ. हे घे रे. (पैसे देत उठतात.) जा चैनी कर.
वेटर : थँकू साहेब टिप दिल्याबद्दल. मी पण बघतो जरा तिकडं नोकरीचं. हीही..