Engineering Education | अभियांत्रिकीची नवी झेप 
संपादकीय

Engineering Education | अभियांत्रिकीची नवी झेप

पुढारी वृत्तसेवा

डॉ. दीपक शिकारपूर

विश्वेश्वरय्या यांच्या दूरदृष्टीपासून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि शाश्वत तंत्रज्ञानापर्यंत भारतीय अभियांत्रिकीचा प्रवास हा बदलत्या काळासोबत बदलण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. आज अभियंता दिन. त्यानिमित्त...

१९२५ पासून भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी १५ सप्टेंबरला अभियंता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. सर विश्वेश्वरय्या हे आधुनिक भारताच्या औद्योगिक व पायाभूत विकासातील प्रमुख शिल्पकार मानले जातात. आज अभियांत्रिकी क्षेत्राचे स्वरूप सतत बदलत आहे. मागच्या शतकात अभियांत्रिकीने मोठी क्रांती घडवून आणली. सुरुवातीला, हेन्री फोर्डच्या असेम्बली लाईनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झाले. यामुळे गाड्या आणि इतर वस्तू स्वस्त झाल्या. यानंतर, नागरी अभियांत्रिकीने मोठे पूल, धरणे आणि गगनचुंबी इमारती बांधल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधनाला गती मिळाली. मानवाला चंद्रावर पाठवणे हे मोठे यश होते. शतकाच्या उत्तरार्धात, ट्रान्झिस्टर आणि मायक्रोप्रोसेसरच्या शोधाने डिजिटल युगाचा पाया रचला.

२००० च्या दशकात, भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक नवीन युग सुरू झाले. माहिती तंत्रज्ञान आणि संगणक अभियांत्रिकीच्या आगमनाने या क्षेत्राला नवीन दिशा मिळाली. भारताने सॉफ्टवेअर विकास, आऊटसोर्सिंग आणि माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. आयटी क्षेत्रात प्रचंड रोजगार संधी निर्माण झाल्या, आणि इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या नवीन शाखांचा विकास झाला. पारंपरिक अभियांत्रिकी शाखांमध्येही आधुनिकीकरण आणि ऑटोमेशनचा वापर वाढला, ज्यामुळे कामाची गती आणि गुणवत्ता सुधारली. या काळात, भारताने अनेक प्रकल्पांमध्ये (उदा. मेट्रो रेल्वे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ) आपली तांत्रिक क्षमता दर्शविली.

सध्या, अभियांत्रिकी क्षेत्र अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतर-विषयक दृष्टिकोन घेऊन विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ड्रोन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या नवीन शाखांचा उदय झाला आहे. यामुळे केवळ पारंपरिक उद्योगांमध्येच नव्हे, तर आरोग्यसेवा, वित्त, मनोरंजन आणि कृषी क्षेत्रात देखील अभियंत्यांची मागणी वाढली आहे. पारंपरिक अभियांत्रिकीच्या कल्पनाही बदलत आहेत. उत्पादन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे स्मार्ट कारखाने स्वायत्त रोबोटस्‌, डेटा ॲनालिटिक्स आणि रिअल-टाईम मॉनिटरिंगसह सुसज्ज झाले आहेत. या घडामोडींमुळे केवळ उत्पादकता वाढली नाही तर मानवी चुका कमी झाल्या आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारली.

डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या अभिनव उपक्रमांमुळे अभियंत्यांना उद्योजक बनण्याची संधी मिळाली. शिक्षण संस्थांनीही अभ्यासक्रमांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. सध्या स्वयंचलित वाहने, स्मार्ट सिटी आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. भविष्यात, अभियांत्रिकी क्षेत्र अधिक वैयक्तिकृत आणि शाश्वत बनणार आहे. क्वांटम कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानामुळे डेटा विश्लेषण आणि गणना अधिक वेगाने शक्य होईल. बायोइंजिनिअरिंग आणि नॅनो टेक्नॉलॉजी या शाखांचा प्रभावी वापर मानवी आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केला जाईल. २०४० पर्यंत, रोबोटिक्स आणि ॲटोमेशन अनेक उद्योगांमध्ये मानवी श्रमाची जागा घेतील, ज्यामुळे अभियंत्यांचे काम अधिक संशोधनात्मक आणि धोरणात्मक बनेल.

अभियांत्रिकी म्हणजे थोडक्यात ‘समस्येची सोडवणूक.’ ही एक मनोवृत्ती असते. ही मनोवृत्ती अभियांत्रिकी पदवीधरच दर्शवतात असे नाही. अनेक अशिक्षित, कमी शिकलेले अनेक तांत्रिक समस्या झटकन सोडवतात हे औद्योगिक क्षेत्रांत अनुभवायला मिळते. त्यामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी फक्त पदवीच्या मागे न लागता कौशल्यवृद्धी, कार्यानुभव, अनुभवी व्यक्तींशी समस्या सोडवणुकीबद्दल संवाद यावर भर दिला पाहिजे. अभियंते हे तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या नवनवीन शोध व निर्मितीमुळे समाजाचे जीवनमान सुधारते. बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या, नवनवीन कौशल्ये शिकत राहणाऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा ऊर्फ ‘हटके’ विचार करणाऱ्या अभियंत्यांना कायम ‘अच्छे दिन’ येणार. गरज आहे ती मानसिकता बदलायची. आजच्या अभियांत्रिकी दिवसाचा हाच संदेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT