संपादकीय

मानद पदवी अन् संशोधन

Arun Patil

ये रे मित्रा, काय झाले, खूप दिवसात फिरकला नाहीस? कुठे फिरायला वगैरे गेला होतास की काय?
अरे नाही रे, असे विशेष काही नाही. तुला तर माहिती आहे, मला क्रिकेटची मॅच टीव्हीवर पाहायला खूप आवडते. आधी वर्ल्डकपच्या मॅचेस पाहिल्या आणि नंतर क्रिकेटचे सामने कुठेतरी दररोज सुरू असतात ते पाहिले. आपला साधा दिनक्रम आहे. ऑफिसला जाऊन संध्याकाळी परत आले की, टीव्ही लावून मॅच पाहत बसायचे. फार कधी कंटाळा तर बातम्या बघत असतो. आपले महाराष्ट्रातले राजकारण आणि त्यात होणारे चमत्कार पाहत असतो.

होय तर. मलाही बातम्या पाहायला आवडते. अशात आलेल्या दोन बातम्या तू पाहिल्यास का? विषय काहीतरी पीएच.डी.च्या पात्रता परीक्षेचा होता. ती लांबली तर काही मुलांची पीएच.डी. करण्याची संधी हुकू शकते, असा विषय एका आमदार महोदयांनी विधानसभेत मांडला होता. त्यावर सदर उपमुख्यमंत्री म्हणाले, 'मग काय होईल? पीएच.डी. होऊन तरी काय दिवे लावणार आहेत?' म्हटलं तर कठोर सत्य आणि म्हटले तर निखालस चूक, असे हे विधान आहे.

होय. मीपण पाहिले ते. त्यानंतर अवघ्या महिनाभरात दुसर्‍या उपमुख्यमंत्र्यांना जपानमधल्या एका विद्यापीठाने डी.लिट. म्हणजे डॉक्टरेटची मानद पदवी प्रदान केली आहे. तसे पाहता, महाराष्ट्रातील एखाद्या राजकीय नेत्याला जपानसारख्या प्रगत देशातील विद्यापीठाने पदवी देणे, हे अभिमानास्पद आहे यात काही शंका नाही. पण मग याचा राज्याला काय फायदा होणार आहे, हे आपल्याला माहीत नाही.

हे बघ, पीएच.डी. ही पदवी संशोधन करून मिळते. त्यासाठी किमान तीन वर्षं आपण निवडलेल्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्याविषयी जगभरात काय संशोधन झाले आहे, याचा आढावा घ्यावा लागतो. त्यासाठी एक मार्गदर्शक असतो. मार्गदर्शक आणि विद्यार्थी मिळून हे संशोधन करतात आणि ते पीएच.डी.चा प्रबंध या स्वरूपात ते सादर केले जाते. तेव्हा कुठे शिक्षण क्षेत्रातील ही सर्वोच्च पदवी मिळते.

हो, ते ठीक आहे रे. पण मग डी.लिट. कशी दिली जाते? काही निकष असतात का?
हे बघ, डी.लिट. ही पदवी तशा अर्थाने एक मानद पदवी आहे. ज्याला डी.लिट. मिळते त्याला आपल्या नावापुढे डॉ. लावण्याचा अधिकार प्राप्त होतो. एखाद्या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ उत्तम असे काम केले तर आणि एखाद्या विद्यापीठाला वाटले याची दखल घेतली पाहिजे, तर ते त्या व्यक्तीला डी.लिट. देत असतात. हा एक प्रकारचा मोठा सन्मान आहे. अच्छा, म्हणजे या सन्मानाचा आणि तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेचा काही संबंध नाही, बरोबर?

अगदी बरोबर आहे. डी.लिट. हा कार्याचा सन्मान असतो आणि त्या व्यक्तीने दीर्घकाळपर्यंत विधायक कार्य केले असेल, तर ती पदवी त्या व्यक्तीला दिली जाते. यासाठी त्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता अजिबात महत्त्वाची नाही. पीएच.डी.साठी मात्र आधी पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच पीएच.डी. करता येते. अर्थात, त्यासाठी अतिशय कठीण अशी परीक्षाही उत्तीर्ण व्हावी लागते.

शिवाय, जसे कोणतेही शिक्षण घेताना गुरू महत्त्वाचा असतो तसेच पीएच.डी.साठी गुरू म्हणजे मार्गदर्शक महत्त्वाचा असतो. तो आपल्या विद्यार्थ्याने कशावर संशोधन करायचे? कशा पद्धतीने करायचे? हे सर्व ठरवून देऊन विद्यार्थ्याकडून काम करून घेत असतो. जेवढे पीएच.डी. आणि डी.लिट. पदवीप्राप्त लोक राज्यामध्ये जास्त संख्येने असतील, तेवढे ते राज्य संस्कृत समजले जाईल, यात काही शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT