प्रा. डॉ. आनंद गिरी
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यामागे जिजाऊ माँसाहेबांची प्रेरणा, दूरदृष्टी आणि संस्कार यांचा सिंहाचा वाटा होता. शिवरायांची जडणघडण करताना त्यांनी मातृत्वासोबतच कुशल प्रशासक, मार्गदर्शक आणि राष्ट्रनिर्मातीची भूमिकाही समर्थपणे पार पाडली. आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त...
जिजाऊ माँसाहेब या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या पाठीमागे प्रमुख प्रेरणाशक्ती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारी सर्वश्रेष्ठ कर्तबगार स्त्री होत्या. इ. स. १६२९ ते इ. स. १६३६ या काळातील घटना वेगाने घडू लागल्या होत्या. हा कालखंड म्हणजे जिजाऊंच्या कसोटीचा कालखंड होता. या काळात शहाजीराजे कधी निजामशाहीत, तर कधी मोगलाकडे तसेच मोगलाकडून निजामशाहीविरुद्ध, तर निजामशाहीकडून मोगलांच्या विरोधात लढताना दिसतात. शेवटी मोगलांकडून निजामशाहीचा शेवट झाला. शहाजीराजेंनी शर्थीची झुंज दिली होती; परंतु मोगलांच्या पुढे ते निजामशाही वाचवू शकले नाहीत. म्हणून इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीच्या अस्तानंतर मोगलांकडे न जाता त्यांनी आदिलशाहीची चाकरी स्वीकारली आणि कर्नाटक हे स्वतःचे कार्यक्षेत्र निवडले आणि जिजामाता आणि बाल शिवाजी यांना पुण्याच्या जहागिरीची चोख व्यवस्था लावून त्यांना महाराष्ट्रातच ठेवण्यात आले. या जहागिरीची सर्व जबाबदारी जिजाऊंडेच सोपविण्यात आली. जिजाऊंना पुण्याच्या जहागिरीत ठेवण्यामागे फक्त कारभाराची जबाबदारी टाकलेली नव्हती, तर आधीच ठरविल्यानुसार हेतूसिद्धीसाठी फार मोठी कामगिरी त्यांच्यावर सोपविलेली होती. यावरून शहाजीराजेंना जिजाऊंच्या गुणकौशल्याची चांगलीच जाणीव होती. अर्थातच या दोघा पती-पत्नींच्या सर्व आकांक्षा शिवाजीराजेंच्या भोवती केंद्रित झाल्या होत्या. ते एक वेगळे स्वप्न होते.
शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर शिवाजीराजे हेच जिजाऊंच्या जीवनाचे सार आणि सर्वस्व होते. जिजाबाईंचे माहेर देवगिरीच्या यादवांचे वारसा सांगणारे, तर सासर उदयपूरच्या सिसोदिया राजघराण्याचा वारसा सांगणारे होते. या घराण्यांचा सांस्कृतिक वारसा जिजाबाईंकडून छत्रपती शिवरायांना मिळाला. अशा या वीरकन्या व वीरपत्नी असणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या पुत्रावर चांगले संस्कार करून त्यांना सुसंस्कृत बनविले. या जिजाबाईंचा जन्म लखुजी जाधवराव (यादव) या निजामशाहीतील सरदाराच्या पोटी इ. स. १५९५ मध्ये झाला. त्यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी इ. स. १६०५ मध्ये झाले. शहाजीराजेंचे वडील मालोजी हे निजामशाही मनसबदार होते; मात्र पुढे भोसले व जाधव यांच्यात हत्तींच्या प्रकरणातून वितुष्ट आले. त्या संघर्षात जिजाबाईंचा भाऊ दत्ताजी व शहाजीराजेंचा चुलत भाऊ संभाजी मारला गेला. पुढे लखुजी निजामशाही सोडून मोगलांकडे गेले. या प्रकरणाचा जिजाबाईंच्या मनावर मोठा ताण पडला होता. पुढे तर लखुजी मोगलांकडून निजामशाहीकडे आल्यानंतर त्याचा व मुलगे अचलोजी रघुजी व नातू यशवंतराव यांचा निजामाच्या दरबारात खून करण्यात आला. ही कटू घटना जिजाबाईंना पचवावी लागली. या सर्व घटनांमुळे इस्लामी राजवटीबद्दल जिजाबाईंच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण झाला होता. त्यातच ज्या शहाजीराजेंना फर्जद (राजपुत्राचा दर्जाचा) हा किताब देऊन आदिलशहाने सन्मानित केले होते, तरीसुद्धा शहाजीराजेंना आदिलशहाने बेड्या घातल्या. म्हणून या इस्लामी सत्ताधीशांवर त्यांचा विश्वास नव्हता.
देवगिरीच्या यादवांचे राज्य नष्ट करन या इस्लामी राजवटीने महाराष्ट्रावर वरवंटा फिरवला होता. मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. मूर्ती फोडल्या जात होत्या. असा विध्वंस चाललेला होता. या सर्व गोष्टींची शिवाजीराजेंना जाणीव करून देण्याचे काम जिजाबाईंनी केले. धर्म व नीतिमत्ता या गोष्टींना महाराजांनी आपल्या जीवनात मोठे स्थान दिले होते. या पाठीमागे जिजाबाईंचे संस्कार महत्त्वाचे होते. जिजाबाईंची थोरवी गाताना न्यायमूर्ती रानडे म्हणतात, 'शिवरायांची माता जिजाबाई या त्यांच्या मार्गदर्शक व संरक्षक देवता होत्या.' खुद्द छत्रपती शिवाजीराजे मातृभक्त होते. आईवरील श्रद्धेने व तिच्या आशीर्वादाने आपणास यश मिळते आणि कठीण प्रसंगातूनही आपण निभावून जातो अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या जहागिरीमध्ये महाराजांना राज्यकारभाराचे धडे सुरुवातीला जिजाबाईंकडून मिळाले होते. जिजाऊंचे अनुशासन स्वच्छ न्यायदान, प्रजावत्सलता असेच होते व त्यांनी आपल्या जहागिरीमध्ये गुंडगिरी, व्याभिचार, खुनाखुनी, अराजकता यांना पायबंद घातलेला होता. स्वाभाविकच हिंदवी स्वराज्याची बीजे जोमात फोफाऊ लागली. तसेच सामान्य जनतेचा पाठिंबा नवनिर्मित स्वराज्यास लाभला.
सामान्य जनताच शिवरायांच्या स्वराज्याचे बळ होते. या सर्व गोष्टीचा पाया जिजाबाईंनी घातला होता. छत्रपतींच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर जिजाऊ माँसाहेबांचा प्रभाव होता. संस्कार होते. कारण, जिजाऊ माँसाहेबांचेही व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. त्या नुसत्या कारुण्याच्या माता नव्हत्या, तर पित्याचेही कर्तव्य पार पाडणारी ठाम विचाराच्या स्त्री होत्या. त्यांनी आपल्या पुत्राला अन्यायाचा तिरस्कार व प्रतिकार करण्यासाठी अंगात धैर्य निर्माण करण्याचे संस्कार बालपणीच केले होते. जिजाऊंच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. शिवरायांनी मातेचा शब्द कधी मोडला नाही. कारण, जिजाऊ अनेक संकटांतून गेल्या होत्या. त्यातूनच न भिणाऱ्या मनोवृत्तीचे त्यांच्यात बीजारोपण झाले होते. संकट हा तर जिजाऊ व शिवबांच्या आयुष्याचा स्थायीभाव बनलेला होता. शिवरायांनी अनेक संकटांवर मात केली. त्यामागे जिजाऊ माँसाहेब यांची प्रेरणाशक्ती होती. खऱ्याअर्थाने शिवरायांनी आपल्या मातेकडूनच राज्यकारभाराचे व राजनीतीचे धडे घेतले होते. जहागिरीची व्यवस्था पाहत असता जिजाबाईंनी अनेक तंटे सोडविल्याचे उल्लेख सापडतात. तसेच वतने, देणग्या दिल्याचेही उल्लेख आढळतात. त्या पत्रावर 'जिजाऊ वालिदा इ राजा शिवाजी' असा शिक्काही आढळतो.
महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार स्वतः जिजाऊ माँसाहेब पाहत होत्या. त्यांनी आपल्या कारभाराची घडी थोडीही विस्कटू दिलेली नव्हती. सारांश, जिजाऊ माँसाहेबांच्या ठिकाणी राज्यकारभार कौशल्य होते. त्यांना दक्षिणेतील राजकारण व राजनीतीची चांगलीच जाण होती. त्यांचे वडील लखुजी व बंधू अचलोजी व रघुजी इस्लामी कुटील राजनीतीचे बळी पडले होते. खुद्द पतीदेव शहाजीराजे दक्षिणेतील एक श्रेष्ठ दर्जाचे राजानीतिज्ञ होते. त्यांनी आदिलशाही, निजामशाही व मोगल यांच्या बरोबर केलेली राजकारणाची खेळी त्यांनी जवळून पाहिलेली होती. निजामशाहीच्या पुनरुजीवनासाठी शहाजीराजेंचा संघर्ष माँसाहेबांच्या नजरेसमोरच घडला होता. या संघर्षातील सर्व घटनांना पतीसमवेत त्यांनी तोंड दिले होते. त्यामुळे संकटाने डगमगून न जाता व त्यावर मात करण्याची युक्ती शोधून काढणे याचे शिक्षण त्यांना मिळालेच होते. पुढे शिवरायांनी मातोश्रींच्या प्रमाणेच अनेक संकटांवर मात करून विजय प्राप्त केला. खरे पाहता, हे सर्व शिक्षण माता-पुत्रांना परिस्थितीनेच दिले आहे. इस्लामी सत्तेच्या अन्यायाचे व अत्याचाराचे दिवस पाहिलेल्या जिजाबाईंना आपल्या पुत्राने स्वतंत्र राज्याची स्थापना करून ‘राजा’ बनावे असे वाटणे हे स्वाभाविकच आहे. त्यांचे हे वैभवशाली स्वप्न छत्रपती शिवरायांनी जून १६७४ मध्ये राज्याभिषेक करून साकार केले. ते पाहण्याचे भाग्य या थोर मातेला लाभले. या वीर स्त्रीच्या कामगिरीबद्दल अनेक इतिहासकारांनी गौरवोद्गार काढले आहेत. आपल्या मातेच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी जणू नूतन सृष्टीच निर्माण केली, असे आज्ञापत्रकार रामचंद्र पंत म्हणतात. जिजाऊ माँसाहेब या केवळ १७ व्या शतकातील इतिहासाची जननी नव्हे, तर वर्तमानकाळाची व भविष्याचीही ती अखंड स्फूर्तिदात्री आहेत. प्रेरणा देण्याची शक्ती आहेत. खऱ्याअर्थाने त्या लोकमाता, राष्ट्रमाता आहेत.