Hiroshima Bombing | हिरोशिमाच्या राखेचा इशारा 
संपादकीय

Hiroshima Bombing | हिरोशिमाच्या राखेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

प्रा. डॉ. आसमा सौंदलगे-बेग

हिरोशिमावर झालेला अणुबॉम्ब हल्ला ही घटना विज्ञान, नैतिकता आणि शांततेच्या मूल्यांविषयी जगाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आज हिरोशिमा दिन. त्यानिमित्त...

जपानमधील हिरोशिमा शहरावर अमेरिकेने ‘लिटल बॉय’ नावाचा अणुबॉम्ब टाकला आणि काही क्षणांतच संपूर्ण शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ६ ऑगस्ट १९४५ हा दिवस मानवजातीच्या इतिहासावर कायमचा कोरला गेलेला काळा दिवस आहे. लाखो स्वप्ने, हजारो घरे, असंख्य निष्पाप जीव क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. त्या दिवशी केवळ एक शहर जळाले नाही, तर माणसाच्या बुद्धीने निर्माण केलेल्या विनाशकारी शक्तीपुढे माणुसकीच पराभूत झाली. हिरोशिमा ही केवळ इतिहासातील घटना नाही, ती मानवी विवेकाला दरवर्षी विचारला जाणारा एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.

हिरोशिमाची खरी शोकांतिका त्या दिवसापुरती मर्यादित राहिली नाही. त्या स्फोटातून जिवंत बचावलेले लोक आयुष्यभर मृत्यूशी झुंज देत राहिले. जपानमध्ये या लोकांना ‘हिबाकुशा’ म्हणून ओळखले जाते. किरणोत्सर्गामुळे होणारे कर्करोग, त्वचेचे गंभीर विकार, शारीरिक अपंगत्व, मानसिक आघात आणि समाजातील दुजाभाव यांचा सामना त्यांनी अनेक दशके केला. त्यांच्या वेदना इतक्या खोल होत्या की, त्यांची सावली पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचली. युद्धाचा अंत रणांगणावर होतो; पण त्याचे दुःख पिढ्यान्‌ पिढ्या जगत राहते, हे हिरोशिमा शिकवते.

या दुःखाच्या राखेतूनच जगाला आशेचा एक नाजूक किरण मिळाला, 'सदाको सासाकी.' अणुबॉम्ब पडला तेव्हा ती केवळ दोन वर्षांची होती. काही वर्षांनी किरणोत्सर्गामुळे तिला रक्ताचा कर्करोग झाला. जपानी लोककथेनुसार कागदाचे हजार बगळे बनवले, तर इच्छा पूर्ण होते, या विश्वासाने तिने हॉस्पिटलच्या खाटेवर बसून कागदी क्रेन बनवायला सुरुवात केली. तिचे आयुष्य अपुरे ठरले; पण तिचे स्वप्न अपूर्ण राहिले नाही. आज जगभरात कागदी क्रेन हा शांततेचा, आशेचा आणि युद्धविरोधाचा सार्वत्रिक संदेश बनला आहे. या छोट्या मुलीने जगाला शिकवले की, आशा ही कोणत्याही शस्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली असते.

अणुबॉम्बचा शोध हा विज्ञानाच्या प्रगतीचा टप्पा होता; पण त्याचा वापर मानवी संहारासाठी झाला. त्यामुळे हिरोशिमा ही विज्ञानाची हार नव्हती, तर विज्ञानाला नैतिकतेची साथ न मिळाल्यास काय होऊ शकते, याचा भीषण पुरावा होती. ज्ञान माणसाला सामर्थ्य देते; पण विवेकच त्या सामर्थ्याला योग्य दिशा देतो. विवेकाशिवाय विज्ञान हे आशीर्वाद न राहता अभिशाप ठरते. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या युगात जगत आहोत. एका क्लिकवर संपूर्ण जगाशी संवाद साधतो, मंगळावर वसाहतींची स्वप्ने पाहतो; पण पृथ्वीवर शांततेची हमी मात्र अजून देऊ शकत नाही.

१९४५ मधील ‘लिटल बॉय’पेक्षा आजची अण्वस्त्रे हजारो पटीने अधिक शक्तिशाली आहेत. आधुनिक युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाही. त्याचे परिणाम संपूर्ण मानवजातीवर होतील. अणू हल्ल्यानंतर निर्माण होणारा किरणोत्सर्ग, पर्यावरणाची अपरिमित हानी, अन्नटंचाई, हवामानातील बदल आणि मानवी संस्कृतीचा संभाव्य ऱ्हास याची कल्पनाच भयावह आहे. त्यामुळे हिरोशिमा हा भूतकाळ नसून भविष्यासाठी दिलेला कठोर इशारा आहे. आज अणुबॉम्ब रोज पडत नसले, तरी समाजावर अदृश्य स्वरूपात अनेक स्फोट घडत आहेत. माणूस माणसापासून दूर जात आहे. संवादाची जागा संशयाने आणि सहिष्णुतेची जागा कट्टरतेने घेतली आहे. अशा वेळी हिरोशिमा आपल्याला सांगते की, शांतता म्हणजे फक्त युद्ध नसणे नव्हे, तर परस्परांवरील विश्वास, करुणा आणि सहअस्तित्व जपणे होय. दरवर्षी ६ ऑगस्टला शांततेसाठी प्रार्थना केली जाते, मेणबत्त्या पेटवल्या जातात आणि कागदी क्रेन अर्पण केल्या जातात; मात्र खरी श्रद्धांजली स्मारकांवर फुले वाहण्यात नाही, तर आपल्या विचारांत आणि कृतीत माणुसकी जिवंत ठेवण्यात आहे. घरापासून समाजापर्यंत, वर्गखोलीपासून संसदेपर्यंत आणि देशापासून जगापर्यंत संवाद, सहिष्णुता आणि शांततेची संस्कृती रुजवणे, हीच हिरोशिमाला दिलेली खरी आदरांजली ठरेल. आज जगाला गरज आहे अधिक संवेदनशील, विवेकी आणि जबाबदार माणसांची. हिरोशिमाची राख आजही निःशब्दपणे विचारते, 'इतका विनाश पाहून, तरी माणूस काही शिकला आहे का?' या प्रश्नाचे उत्तर इतिहास लिहिणार नाही; ते आपण आपल्या दैनंदिन कृतीतून, आपल्या मूल्यांतून आणि आपल्या माणुसकीतून लिहायचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT