अहो मी काय म्हणते, मी नोकरीसाठी खूप प्रयत्न केले; पण सध्या कुठे जॉबच मिळाला नाही. मग, मी पीएच.डी. करू का? त्यानिमित्ताने उच्च शिक्षणपण होईल. माझी ना नाही; पण काही राजकीय नेते मात्र पीएच.डी.ला खूप विरोध करताहेत. म्हणे ‘एका घरात अनेक जण पीएच.डी करतात’ वगैरे...
त्यांना म्हणायला काय जातेय. त्यांच्या घरात नाहीत का तीन-तीन खासदार आणि दोन-दोन आमदार. संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले, तर एवढी पदे एकाच घरात कशाला म्हणून... सोडा ना पदे. सामाजिक कामच करायचे आहे, लोकांची कामेच करायची आहेत, त्यासाठी पद कशाला हवे; पण मुळात त्यांचा रोष आहे कशावर?
नेमकं बोललीस. फेलोशिप मिळणे गरजेचेच असते. कारण, त्या काळात पूर्ण वेळ संशोधन करावे लागत असते. काही टर्म्स आणि कंडिशनमुळे नोकरी करता येत नसते. मग, या संशोधक विद्यार्थ्यांचं घर चालणार कसे, म्हणून त्याकरिता हे पैसे दिले जात असतात. त्यातूनच त्यांचा सगळा खर्च चालत असतो. शिवाय संशोधनालाही काही कमी खर्च येत नाही. तो खर्चही असतोच. त्यासाठी पैसे हे विद्यार्थी आणणार कुठून? नाही का?
तेही खरंच आहे म्हणा!
आणि पीएच.डी. करणेही आता सोपे राहिलेले नाही. तिथेही खूप स्पर्धा वाढलेली आहेच की! आधी एन्ट्रान्स की पेट एक्झाम द्यावी, लागते त्यातून तिथेही आता मेरिट लागू लागले आहे. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात आणि आपला विषय पटवून द्यावा लागतो. गाईडच्या मार्गदर्शनानुसार विषय निवडावा लागतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम लागतो खूप. किमान तीन वर्षे संशोधनासाठी द्यावी लागतात. तेवढ्या काळात तो संशोधन प्रबंध पूर्ण होईलच, याची काही गॅरंटी नसते. कधीकधी वेळ लागू शकतो. त्यामुळे ही सर्व महत्त्वाची वर्षे या संशोधनात जात असतात. म्हणूनच फेलोशिप त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते आणि शेवटी चांगल्या शिक्षणासाठी, शिक्षणातून विकासासाठी अशा शिष्यवृत्ती, फेलोशिप असायलाच हव्यात. पीएच.डी.चे संशोधन जरूर व्हावे; पण त्यात विषय दमदार असायला हवा, असे वाटते. काही विषय अगदीच किरकोळ वाटतात. संशोधन असं मस्त मुलभूत झालं पाहिजे, जे समाजाला नंतर उपयोगी पडेल.
संशोधनातून बरेच काही चांगले समोर येऊ शकते. झालंच तर काही चांगली पेटंटही मिळू शकतात नावावर. त्यातून विद्यार्थ्यांचे स्वतःचे, विद्यापीठाचे नावही उज्ज्वल होत असते. असे सगळे लाभ होणार असतील आणि मुळात तुझी संशोधनाची तीव— इच्छाच असेल, तर मी म्हणतो आजपासूनच अॅडमिशनसाठी प्रयत्न करायला लाग.