Smart Safety Helmet | हेल्मेट बनेल तुमचा को-पायलट Pudhari Photo
संपादकीय

Smart Safety Helmet | हेल्मेट बनेल तुमचा को-पायलट

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

मोटारसायकल चालवताना हेल्मेट हे चालकाचे सुरक्षा कवच असते. कोणत्याही अपघाती परिस्थितीत हेल्मेट दुचाकीस्वाराचे प्राण वाचवू शकते. दररोज अनेकांना आपण हेल्मेट घालून जाताना पाहत असतो, अनेकदा आपण स्वतः हेल्मेट घालून फिरत असतो. पुढे एक विंडशिल्ड आणि डोक्याची सुरक्षा करणारे कवच हे साधारणतः प्रत्येकाला ज्ञात असणारे हेल्मेट. मात्र, सध्याच्या ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये एक असे स्मार्ट हेल्मेट तयार झाले आहे, जे परिधान करून दुचाकी चालविताना तुम्हाला हॉलीवूडमधील एखाद्या फ्यूचरिस्टिक चित्रपटात असल्याचा भास होईल. हेल्मेटच्या आत वायझरमध्ये हेडस्अप डिस्प्ले (एचयूडी) बसवण्यात आला आहे.

यामुळे तुम्हाला रायडिंगदरम्यान लागणारी सगळी महत्त्वाची माहिती दिसेल. तुमचा वेग, नेव्हिगेशन, येणारे कॉल्स, बॅटरी, नोटिफिकेशन्स : सर्व काही, तीही डोळे रस्त्यावरून न हटवता. यामुळे तुम्हाला दरवेळी मोबाईल पाहण्याची गरज नाही किंवा दुचाकीच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे पाहण्यासाठी नजर भटकवण्याचीही आवश्यकता नसते. सर्व काही थेट तुमच्या नजरेसमोर. एखाद्या को-पायलटप्रमाणे हे हेल्मेट तुम्हाला प्रत्येक माहिती क्षणोक्षणी देत राहील.

स्मार्ट हेल्मेटची खरी जादू म्हणजे ते तुमचे रायडिंग अनुभवाचे परिमाणच बदलून टाकते. कल्पना करा, रस्ता तुमच्यासमोर धावत आहे, वार्‍याचा वेग चेहर्‍यावर जाणवतो आणि त्याच वेळी वायझरच्या कोपर्‍यात एक छोटासा डिजिटल पॅनेल तुम्हाला पुढचे वळण, पुढचा एक्झिट, ट्रॅफिक अलर्टस् आणि स्पीड लिमिट दाखवत राहतो. मोबाईल हाताळणे, स्क्रीन शोधणे किंवा वेगात खाली नजरेने तपासणे हा सगळा त्रास यामुळे भूतकाळात जाईल.

यामध्ये इनबिल्ट स्पीकर्स आणि मायक्रोफोनही दिलेले आहेत. म्हणजे कॉल आला तर तुम्हाला ऐकू येईल, कानात ब्लूटूथ, इअरफोन घालण्याचीही गरजच नाही. जर तुम्ही ग्रुप रायडिंग करत असाल, तर इंटरकॉम मोडमुळे तुमची संपूर्ण टीम एकमेकांशी संवाद साधत पुढे जाऊ शकते. आजवर स्वतंत्रपणे घेतले जाणारे ब्लूटूथ सेट, इंटरकॉम डिव्हाईस, हेडसेट हे सर्व या एका हेल्मेटमध्येच एकत्र मिळते.

लांबच्या प्रवासासाठी बॅटरी बॅकअपदेखील उत्तम आहे. स्मार्ट फिचर्स वापरत 10 तासांचा बॅकअप या हेल्मेटमध्ये मिळतो. रात्र असो की दिवस, उजेडात असो की टनेलमध्ये, वायझरवरील डिस्प्ले समोरचा रस्ता न झाकता पुरेशी चमक राखतो. दुसरा ड्रॉप डाऊन सनवायझर असल्यामुळे दिवसा सूर्यकिरणांचा त्रासही कमी होतो.

या स्मार्ट हेल्मेटचे डिझाईनही विविध रंग आणि साईजमध्ये उपलब्ध आहेत. ड्रॉप डाऊन सनवायझर, दुहेरी वायझर प्रणाली आणि एअरोडायनॅमिक संरचना, यामुळे हे हेल्मेट रोजच्या रायडर्सपासून लाँग रूट रायडर्सपर्यंत सर्वांसाठी योग्य ठरते. साध्या जीटी शैलीच्या हेल्मेटपेक्षा किंमत जवळजवळ दुप्पट असली, तरी यामध्ये मिळणारे फिचर्स निश्चितच उच्च दर्जाचे आहेत. सध्या या स्मार्ट हेल्मेटची किंमत पाश्चात्त्य देशांमध्ये सुमारे 1 लाख 30 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांदरम्यान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT