Breath health detection | श्वासातून कळणार आरोग्यस्थिती! 
संपादकीय

Breath health detection | श्वासातून कळणार आरोग्यस्थिती!

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

आपण दिवसभरात किती पावले चाललो, किती कॅलरीज बर्न केल्या किंवा आपली झोप कशी झाली, हे सांगणारी स्मार्टवॉच आजकाल प्रत्येकाच्या हातावर दिसतात. आपण आपल्या हृदयाचे ठोके मोजतो, पावले मोजतो, अगदी झोपेचे तास ही मोजतो. पण, या सगळ्या धावपळीत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होते, ते म्हणजे आपला ‘श्वास’. लहानपणी किंवा योगाच्या क्लासमध्ये आपल्याला नेहमी सांगितले जायचे, ‘श्वासावर लक्ष केंद्रित करा.’ कारण, श्वास हाच आपल्या शरीराचा आणि मनाचा आरसा असतो.

आपण तणावात असताना श्वास वेगळा असतो आणि शांत असताना वेगळा. पण, कामाच्या गडबडीत याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नसतो. आता नेमकी हीच गरज ओळखून गॅजेट वर्ल्डमध्ये एक भन्नाट आणि तितकेच हटके तंत्रज्ञान दाखल झाले आहे. हे जगातले पहिले अ‍ॅकॉस्टिक वेअरेबल आहे. वाचायला जरा नवल वाटेल; पण हे गॅजेट चक्क तुमच्या श्वासाचा आवाज ऐकून तुमच्या आरोग्याची कुंडलीच मांडते. आजवरची गॅजेटस् फक्त हालचालींवर किंवा नाडीवर आधारित होती; पण हे ब्रेथ मॉनिटर एक पाऊल पुढे गेले आहे. हे एक छोटे, वजनाला हलके आणि मॅग्नेटिक डिव्हाईस आहे, जे तुम्ही तुमच्या कपड्यांच्या आत छातीवर सहज लावू शकता. यामध्ये वैद्यकीय दर्जाचे (मेडिकल ग्रेड) ‘मेकॅनो-अकौस्टिक सेन्सर्स’ बसवलेले आहेत.

जेव्हा तुम्ही हे छातीवर लावता, तेव्हा ते थेट तुमच्या फुफ्फुसांच्या आणि हृदयाच्या जवळ असते. हे सेन्सर्स तुमच्या श्वासाची लय, खोली आणि गती मोजतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही नाकाने श्वास घेत आहात की तोंडाने, हे देखील हे गॅजेट अचूकपणे ओळखते. अनेकदा आपल्याला कळतही नाही की, आपण चुकीच्या पद्धतीने श्वास घेत आहोत, ज्यामुळे थकवा येतो किंवा झोप पूर्ण होत नाही. हे गॅजेट तुम्हाला याची जाणीव करून देते.

श्वास मोजणारे हे गॅजेट फक्त माहिती गोळा करत नाही, तर तुम्हाला हलकासा कंप (हॅप्टिक नज) देऊन योग्य वेळी सावध करते. समजा, तुम्हाला खूप ताण आलाय आणि तुमचा श्वास उथळ झालाय, तर हे गॅजेट व्हायब्रेट होऊन तुम्हाला दीर्घ श्वास घेण्याची आठवण करून देईल. याचे अ‍ॅप तुम्हाला तुमचा ‘नर्व्हस सिस्टम इंडेक्स’ आणि ‘ब्रेथ स्कोर’ दाखवते. यामुळे तुम्ही तुमच्या मनावर आणि शरीरावर ताबा मिळवू शकता.

अ‍ॅथलिटस्ना आपली क्षमता वाढवण्यासाठी, तर ज्यांना दम्याचा (अस्थमा) त्रास आहे, त्यांना आपले ट्रिगर्स ओळखण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते. स्मार्ट ब्रेथ मॉनिटर नुकतेच लाँच झाले असून, त्याची अंदाजे किंमत 249 डॉलर्स म्हणजेच सुमारे 21 ते 22 हजार रुपये आहे. सध्याच्या घडीला हे थोडे महाग वाटू शकते; पण आरोग्याच्या द़ृष्टीने विचार केला तर ही गुंतवणूक महत्त्वाची ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT