ज्योती मल्होत्राचे कारनामे File Photo
संपादकीय

ज्योती मल्होत्राचे कारनामे

पुढारी वृत्तसेवा

‘देश के दुश्मनों ने देख लिया कि, जब सिंदूर बारूद बन जाता हैं, तो नतीजा क्या होता हैं’ असा सणसणीत टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला हाणला आहे. पाकिस्तानला भारतासमोर शरण यावे लागले असले, तरी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरे! त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आणखी कर्ज मिळविले असून, चीनकडून तो आधुनिक शस्त्रास्त्रांची मदत मिळवू पाहत आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी, अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसहाक दार यांच्यात त्रिपक्षीय सहकार्य वाढवण्यावर आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्याबाबत एकमत झाले आहे. पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करण्यासाठी ज्याप्रमाणे दहशतवादी घुसवतो, त्याचप्रमाणे हेरांचा वापरही करून घेतो. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून एका यूट्यूबरसह 12 जणांना पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. हरियाणामधील नूहमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या महंमद तारीफला अटक केली असून, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला तो सिम कार्ड पुरवत होता. हवाई दलाच्या शिरसातळाची छायाचित्रे आणि व्हिडीओ दिल्यास लाखो रुपये देण्याचे आमिषही त्याला दाखवले होते.

मातृभूमीशी गद्दारी करणार्‍या अशा लोकांना कशाचेच सोयरसूतक नसते; मात्र या सर्वात महत्त्वाचे नाव आहे ते यूट्यूब ब्लॉगर ज्योती मल्होत्राचे. ती तीन महिन्यांपूर्वी पहलगामला जाऊन आली होती. त्या काळात तिने काही हेरगिरीच्या कारवाया केल्या का किंवा काही डेटा संकलित करून तो इतरांना दिला का, याचा तपास केला जात आहे. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा आणि नंतर हकालपट्टी केलेला कर्मचारी दानिश याच्या आपण थेट संपर्कात होतो, असे तिने चौकशीत कबूल केले आहे. दानिश हा ज्योतीला हेरगिरीच्या कामासाठी सर्वार्थाने तयार करण्यात सक्रिय होता. आपण देशद्रोह केला म्हणजे काही चूक केली आहे, असे आज ज्योतीला वाटतच नाही. जे केले ते योग्यच होते, अशी तिची भावना असून, ते धक्कादायक आहे. आधुनिक युद्ध हे केवळ सीमेवरच लढले जात नाही, तर ते अन्य माध्यमांतूनही लढवले जाते. त्यासाठी पाकिस्तानसारखे देश सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची ‘भरती’ करत आहे.

सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून भारतविरोधी नॅरेटिव्ह तयार करण्याचा उपद्व्याप केला जात आहे. ‘ट्रॅव्हल विथ ज्यो’ असे ज्योतीच्या यूट्यूब चॅनेल आणि इन्स्टाग्राम पेजचे नाव आहे. तिचे यूट्यूबवर 3.79 लाख आणि इन्स्टाग्रामवर 1.40 लाख व फेसबुकवर 3.22 लाख फॉलोअर्स आहेत. ज्योतीच्या चॅनेलवर आतापर्यंत देश-विदेशांतील प्रवासाचे 4300 हून अधिक व्हिडीओ टाकले आहेत. इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात, थायलंड, भूतान, नेपाळ आणि चीनमध्ये तिने प्रवास केला असून, मार्च आणि एप्रिल महिन्यात ज्योती पाकिस्तानातही गेली होती. यादरम्यान तिने अनेक व्हिडीओ आणि रील्स तिच्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. तिला ‘नॅशनल डे ऑफ पाकिस्तान’ या कार्यक्रमाच्या इफ्तार डिनर पार्टीचे विशेष आमंत्रण मिळाले होते.

यावरून पाकिस्तान तिच्यात कशी ‘गुंतवणूक’करत होता, हे स्पष्ट होते. याच पार्टीत दानिश हा ज्योतीचा परिचय अनेकांशी प्रसिद्ध यूट्यूबर म्हणून करून देत होता. ती दोनवेळा पाकिस्तानात गेली होती आणि त्यावेळी दानिशनेच तिची राहण्याची व्यवस्था केली होती. दानिशने 24 तासांत देश सोडावा, असा आदेश भारताने 13 मे रोजी दिला होता. म्हणजे त्याच्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणेची बारीक नजर होती. ज्योतीने चारवेळा मुंबईला भेट दिली असून, लालबागचा राजा आणि तेथील गर्दीचे चित्रीकरणही केले होते. अन्यत्रही ती गर्दीच्या ठिकाणी गेली होती. याचा अर्थ कदाचित ती रेकी करण्यासाठीच मुंबईला आली असणार. यापूर्वी डेव्हिड हेडलीनेही मुंबईत रेकी केली होती.

मुंबईत अनेकदा बॉम्बस्फोटाचे प्रकार झाले असून, त्यामुळेच आता ज्योतीची कसून तपासणी करण्याची गरज आहे. तिला पैसा, प्रसिद्धी व ग्लॅमरचे आकर्षण असावे, असे स्पष्ट दिसते. सौंदर्याच्या जादूने ती लोकांना गळाला लावत असल्याचे काही व्हिडीओंमधून जाणवते. सोशल मीडियावर ज्यांचा प्रभाव असतो, जे लोकप्रिय असतात अशांना आपल्याकडे खेचून घेण्याचा उद्योग पाकिस्तानातील उच्चायुक्तालयातून होत असतो. ज्योतीही दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात प्रवासी व्हिसा मिळवण्यासाठी गेली होती आणि तिथेच दानिशने तिला हेरले आणि जाळ्यात पकडले. अनेकदा हनी ट्रॅपचा वापर करून प्रशासनातील अधिकार्‍यांना फितवले जाते. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे, डीआरडीओमधील प्रदीप कुरुलकरचे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटस् मिळतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियताही खूप असते आणि त्यांना अनेक ठिकाणी सहज प्रवेशही मिळू शकतो.

बरेच इन्फ्लुएन्सर्स सरकारवर टीकाही करतात; पण त्याला ‘राष्ट्रद्रोह’ म्हणता येत नाही; मात्र सोशल मीडियाचा अस्त्र म्हणून वापर करून पाकिस्तानची आयएसआय आता भारताच्या विरोधातील वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, असे दिसते. तसेच ज्योतीसारख्या सेलेबि—टीजचा वापर माहिती काढण्यासाठी म्हणूनही केला जात आहे. 1990च्या दशकात ‘इस्रो’च्या काही शास्त्रज्ञांविरोधात हेरगिरीचा आरोप झाला होता. ‘इस्रो’ने विकसित केलेल्या स्वदेशी रॉकेट इंजिनच्या डिझाईनसह गोपनीय कागदपत्रे विकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली काही वरिष्ठ एरोस्पेस अभियंत्यांना अटक झाली होती. राजीव गांधी पंतप्रधान असताना जानेवारी 1985 मध्ये कुमार नारायण या भारतीय व्यावसायिकास अटक केली होती. पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयातील कर्मचारीच काही संवेदनशील कागदपत्रे कुमार नारायणतर्फे अन्य राष्ट्रांना धाडत असल्याचा आरोप होता. या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयातील काही कर्मचार्‍यांना अटकही झाली होती. बाह्य शत्रूंशी लढणे सोपे असते; पण अंतर्गत शत्रू हे अधिक धोकादायक असतात. अशा प्रवृत्तींचाही खात्मा करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT