शशिकांत सावंत
हापूस आंब्याच्या घटलेल्या उत्पादनामुळे कोकणातील बागायतदारांचे अर्थकारण कोलमडले असून संपूर्ण प्रदेश मंदीच्या छायेत गेला आहे.
हापूस आंब्याचे बिघडलेले अर्थकारण अखंड कोकणाला मंदीची झळ देणारे ठरले आहे. एक हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेला आंबा हंगाम एप्रिल सुरू झाला, तरी सुनासुनाच आहे. खरं तर, दरवर्षी या कालावधीत हापूस आंब्याने बाजारपेठा फुलून जातात; पण यावेळी कोकणात आणि मुंबई मार्केटलादेखील हवा तसा आंबा पाहायला मिळालेला नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 25 ते 30 हजार आंबा पेट्या देवगड आणि रत्नागिरीवरून मुंबई मार्केटला दाखल होतात. यावर्षी हे प्रमाण दहा हजारांवर आले. या एकूण बाजाराचा टाळेबंद मांडला, तर 60 टक्के आंब्याची यावर्षी घट दिसते. वातावरणीय बदल, अवेळी पाऊस, उष्णतेमध्ये झालेली वाढ याचा परिणाम हापूस हंगामावर झाला आहे.
देवगड हा आंब्याचा मुख्य बेल्ट आहे. या भागात 25 ते 30 हजार बागायतदार हापूसच्या उत्पादनावर आपले वार्षिक गणित मांडतात; मात्र येथे उत्पादनात झालेली मोठी घट यामुळे उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याने बागायत शेतीचे गणित बिघडले आहे. म्हणूनच शेतकर्यांनी भरपाईसाठी मोर्चे काढले. त्याबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. रत्नागिरी हापूसदेखील मोठ्या प्रमाणावर बाजारात येतो. या दोन्ही हापूसची चव वेगळी आहे. कातळ चिर्यामध्ये येणार्या हापूसमध्ये लोहाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तांबूस नारंगी रंगामध्ये हा हापूस आंबा पाहायला मिळतो, तर रत्नागिरीचा हापूस हा पिवळसर केशरी रंगाचा आहे. त्याची चव आणखी वेगळी आहे. सिंधुदुर्गात वेंगुर्ले ते विजयदुर्ग या सागरी पट्ट्यात येणारा हापूस हा देठाकडील बाजूला केशरी रंगाचा आहे. हा हापूस टिकाऊ असल्याने परदेशातही याची मोठी मागणी आहे; पण यावर्षी युद्धामुळे हापूसची परदेशवारीही रोडावली. कोकणात देवगड, रत्नागिरी आणि अलिबाग अशा तीन बेल्टमध्ये हापूस येतो. अलिबागचा हापूस याची चव आणि प्रकारही वेगळा आहे.
रायगड जिल्ह्यातून मुंबईच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबा जातो; परंतु यावर्षी मार्च महिना संपला, तरी अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमधील हापूस आंबा अद्याप वाशी मार्केटमध्ये पोहोचलेला नाही. सद्यस्थितीत केवळ 200 ते 300 पेट्या आंबाच रवाना होत असल्याचे हाशिवरे येथील आंबा व्यावसायिक मुकुंद म्हात्रे यांनी सांगितले. यंदा काहीसा लांबलेला पाऊस आणि तो थांबल्यावर अचानक वाढलेले तापमान यामुळे आंबा मोहोरण्याच्या काळातच पहिला वातावरणीय फटका बसला. दुसरा फटका बसला तो थंडीनंतर. पुन्हा तापमान वाढ झाली. परिणामी, त्याचा परिणाम फळधारणेवर झाला आणि त्याचवेळी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आणि पीक कमी झाले आहे.
एकूण कोकणच्या देवगड, रत्नागिरी, अलिबाग या तिन्ही बेल्टमध्ये आंब्याचे उत्पादन कमी झाल्याने बागायतदारांचे अर्थकारण बिघडले आहे. उत्पादन खर्चाइतकेही उत्पादन नसल्याने या व्यवसायाची स्थिती नाजूक झाली आहे. कोकण कृषी विद्यापीठाने या सर्व बदलांचा अभ्यास करून हापूसचे बिघडलेले गणित दुरुस्त करण्यासाठी शेतकर्यांनी काय करावे, याचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भविष्यात हापूसच्या उत्पादनाबाबत काय करता येईल? कुठल्या हापूसच्या जाती बदलत्या वातावरणात तग धरतील, याचे विवेचन होणे गरजेचे आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्यालाही शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
एका बाजूला आंबा बागायतदार संकटात आहेत, तर दुसरीकडे बल्क डिझेलवर 22 रुपये प्रतिलिटर वाढ झाल्याने मच्छीमार मेटाकुटीस आला आहे. कोकणात बागायत शेती आणि मच्छीमारी हे लोकांचे दोन उदरनिर्वाहाचे प्रमुख व्यवसाय आहेत. ग्रामीण भागातील 60 टक्के लोकांचा उदरनिर्वाह यावर चालतो. या स्थितीचा अभ्यास करणे या व्यवसायातील लोकांना आर्थिक मदत देणे अनिवार्य आहे. बल्क डिझेलमध्ये गुजरातमध्ये सवलत मिळते; पण महाराष्ट्रात मिळत नाही. या राज्यनिहाय भेदभावामुळे मच्छीमारांत नाराजी आहे. एका बाजूला मच्छीमारांचा मोर्चा, तर दुसरीकडे बागायतदारांचा मोर्चा असा निर्माण होणारा असंतोष थांबवायचा असेल, तर न्यायाची भूमिका अनिवार्य आहे.