वेलकम भाई! Pudhari Photo
संपादकीय

H1B Visa Issue | वेलकम भाई!

सध्या अमेरिकेमध्ये एच-वन बी व्हिसाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जे अमेरिकेबाहेर असणारे भारतीय आहेत, त्यांना त्यांच्या कंपन्यांनी तत्काळ अमेरिकेत प्रवेश करण्याची सूचना केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

सध्या अमेरिकेमध्ये एच-वन बी व्हिसाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जे अमेरिकेबाहेर असणारे भारतीय आहेत, त्यांना त्यांच्या कंपन्यांनी तत्काळ अमेरिकेत प्रवेश करण्याची सूचना केली आहे. ट्रम्प यांच्या व्हिसा नीतीची इतकी धास्ती लोकांनी घेतली आहे की, ते दिवाळीला पण भारतामध्ये येणार नाहीत. बहुतेकांचे आई-वडील, बहीण-भाऊ भारतामध्ये असतात आणि हे आणि यांचे कुटुंब हे अमेरिकेमध्ये असते. सहसा दिवाळीच्या आसपास नाताळाचा सण येतो. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे महिने अमेरिकेतून भारतात येणाऱ्या लोकांच्या लगबगीचे महिने असतात. यावर्षी अमेरिकेत जाणारी विमाने भरभरून जात आहेत; परंतु येणारी विमाने मात्र रिकामी येत आहेत. अशी विचित्र परिस्थिती असताना अमेरिकेत नोकरी करणाऱ्या अनेकांचे लग्नपण मोडले आहे. मुलगा अमेरिकेत आहे म्हणून ज्या मुली लग्न करण्यास उत्सुक होत्या त्यांना आपला भावी पती अमेरिकेत टिकेल का, याची शंका असल्यामुळे त्यांनी लग्न मोडले आहे.

अशा अनिश्चित वातावरणामध्ये बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन उद्योजकाने धमाल उडवून दिली आहे. टोनी क्लोर नावाचा हा मूळ अमेरिकन उद्योजक बंगळुरूमध्ये काम करतो. त्याची मैत्रीण आणि होणारी पत्नी ही बंगळुरूमधील भारतीय तरुणी आहे. दोघे भविष्यात भारतात उद्योग करून इथेच स्थायिक होण्याचे ठरवत आहेत. टोनीने नुकतेच एक ट्विट केले आहे आणि तब्बल पाच वर्षांचा व्हिसा दिल्याबद्दल भारत देशाचे आभार मानले आहेत. आपल्याच देशाचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांनी असे म्हटले आहे की, ट्रम्प हे भारतीयांना ‌‘चले जाव‌’ म्हणत आहेत; परंतु त्याचवेळी भारत देश मात्र माझ्यासारख्या तरुणांना ‌‘वेलकम भाई‌’ म्हणत आहे. भारताने जगभरातील उद्योजकांना आपली दारे खुली केली आहेत म्हणून क्लोर महोदय अत्यंत खूश झाले आहेत. अमेरिकेचा व्हिसा मिळाला म्हणून नाचणाऱ्या भारतीय तरुणांच्या डोळ्यात क्लोर यांनी अंजन घातले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अमेरिकेत जाऊन काम करणारे सर्वच तरुण हे इकडचे सर्वात बुद्धिमान तरुण कधीच नव्हते. पदवीचे शिक्षण इकडे घेऊन, पदव्युत्तर शिक्षणासाठी भरमसाट खर्च करून ते अमेरिकेत गेले होते आणि नोकऱ्या करत होते. अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे संगणक अभियंते फार कमी आहेत. कारण, तेथील तरुणांचा शिक्षणाकडे ओढाच मुळात कमी आहे. अशा स्थितीमध्ये भारतीय तरुणांनी अमेरिकेत जाऊन या नोकऱ्या पटकावल्या नसत्या, तरच नवल होते.

परदेशातील तरुणांना भारताचे आकर्षण इथून पुढील काळात वाढत जाईल, असे वाटते. देशातील असोत की विदेशातील; पण इथे येऊन उद्योग उभारण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक तरुणाला आपण ‌‘वेलकम भाई‌’ म्हणून प्रतिसाद दिला पाहिजे, हे नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT