संपादकीय

Guru Purnima: चित्तशुद्धीतून आत्मज्ञान देणारे सद्‌गुरू

लौकिक - अलौकिक विद्यांच्या पलीकडे जाऊन शिष्याला त्याची स्वतःची ओळख करून देणारे सद्‌गुरू हे साक्षात ईश्वरच मानले जातात

पुढारी वृत्तसेवा
सचिन बनछोडे

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥' असे सांगणारी आपली संस्कृती आहे. सद्‌गुरूंविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. त्यानिमित्त...

मनुष्य जन्मतःच ज्ञान घेऊन येत नाही. वाढत्या वयाबरोबर तो आजूबाजूच्या जाणत्या लोकांकडून काही ना काही शिकत आपली जीवनाची वाटचाल करू लागतो. तैत्तिरीय उपनिषदामध्ये ‘मातृ देवो भव’, ‘पितृ देवो भव’ आणि ‘आचार्य देवो भव’ असे म्हटले आहे. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने आपल्याला ज्यांच्याकडून हे ज्ञान मिळते, त्या आई-वडील आणि आचार्यांना प्राचीन उपनिषदांनी ईश्वराची उपमा देणे यात नवल नाही! मात्र सर्व लौकिक - अलौकिक विद्यांच्या पलीकडे जाऊन शिष्याला त्याची स्वतःची ओळख करून देणारे सद्‌गुरू हे साक्षात ईश्वरच मानले जातात.

एखादा सम्राट आपले सम्राटपद विसरला आणि भ्रांतीत दोनवेळेच्या अन्नाची भीक मागत फिरू लागला तर त्याला ‘तू सम्राट आहेस’ असे सांगून त्याची भ्रांती दूर करणाऱ्या व्यक्तीचे उपकार तो कसा फेडेल? तशाच प्रकारे सद्‌गुरू शिष्याला तू ‘हीन-दीन’ किंवा ‘जीव’ नसून साक्षात परमात्माच आहेस, या मूळ स्थितीची ओळख व जाणीव करून देतात आणि त्याला स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट असल्याचेच पटवून देतात. हा अलभ्य लाभ मिळवून देणाऱ्या सद्‌गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा!

आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झाला असे मानले जाते. वेदांचे संकलन करणारे तसेच अठरा पुराणे, महाभारत आणि ब्रह्मसूत्रांची रचना करणारे पराशरपुत्र व्यास हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म या पौर्णिमेला झाल्याने तिला ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हटले जाते तसेच गुरुपूजेला ‘व्यासपूजा’ असेही म्हटले जाते. भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप हे ज्ञानदान करणाऱ्या सद्‌गुरूंचेच आहे. त्यांचा जयघोष ‘श्री गुरुदेव दत्त’ असाच केला जातो. अनेक संप्रदायांच्या मूळ पुरुषांना दत्तगुरूंचा अनुग्रह लाभल्याचे दिसून येते. दत्तात्रेयांच्या सोळा अवतारांपैकी एका अवताराचे नाव ‘आदिगुरू’ असेच आहे. त्यामुळे या पौर्णिमेला अनेक दत्तक्षेत्री मोठा उत्सव होत असतो.

भारतीय संस्कृतीमध्ये अशा सद्‌गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. मनुष्य जन्माला आल्यावर पशुपक्ष्यांप्रमाणे केवळ ‘आहारनिद्राभयमैथुनम’ (आहार, निद्रा, संरक्षण आणि मैथुन) अशा गोष्टींमध्येच जीवन घालवणे हे माणसासारख्या बुद्धीचे वरदान मिळालेल्या प्राण्यासाठी योग्य नाही. कठोपनिषदात म्हटले आहे की, परमात्म्याने आपली सर्व इंद्रिये बहिर्मुख करून ती 'हिंसित' करून ठेवलेली आहे. मनुष्य केवळ बाह्य गोष्टींमध्येच अडकतो व स्वतःच्या मूळ स्थितीकडे त्याचे लक्ष जात नाही, हीच माया आहे. त्यामुळे याच उपनिषदाने म्हटले आहे की ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ (उठा, जागे व्हा आणि आत्मदर्शी गुरूकडून आत्म्याचे ज्ञान घ्या), छांदोग्य उपनिषदाने गुरूंचे माहात्म्य अधोरेखित करीत म्हटले आहे की, ‘आचार्यवान पुरुषो वेद’ (जो सद्‌गुरूंच्या आश्रयाला आहे त्यालाच ज्ञान मिळते), मुंडक उपनिषदात म्हटले आहे की, ‘तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम' (आत्मज्ञानासाठी हातात समिधा घेऊन श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरूकडे जावे), याचा अर्थ गुरूही ‘श्रोत्रिय’ म्हणजेच विद्वान असावा आणि केवळ पुस्तकी पांडित्यच असलेला नव्हे तर त्याला ब्रह्मतत्त्वाचा साक्षात अनुभवही मिळून त्यामध्ये तो स्थित असावा.

अशा ‘शाब्दे परे च निष्णात’ गुरूचे अत्यंत महत्त्व असते. भगवद्‌गीतेतही श्रीकृष्णांनी म्हटले आहे की ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः॥’ (हे ज्ञान तू तत्त्वदर्शी ज्ञानी गुरूकडे जाऊन प्राप्त कर. त्यांना नम्रतेने प्रणाम केल्यावर, त्यांची सेवा केल्यावर आणि कपटरहित, सरळपणे प्रश्न विचारल्यावर असे ज्ञानी महात्मा तुला उपदेश करतील.) ‘ज्ञानादेव तु कैवल्यम’ म्हणजे केवळ ज्ञानानेच मुक्ती मिळते हे खरे असले तरी आत्मज्ञान मिळवण्यापूर्वी शिष्याने आपले त्रिदोष घालवणेही गरजेचे असते.

मल, विक्षेप आणि आवरण असे हे तीन दोष असतात. त्यावर अनुक्रमे सत्कर्म, उपासना आणि ज्ञान असे उपाय आहेत. निष्काम सत्कर्मांनी चित्तावरील मल निघून जातो व अंतःकरणाची शुद्धी होते. असे शुद्ध मन उपासनेने एकाग्र होऊ शकते, त्याचा विक्षेपभाव, चांचल्य निघून जाते. त्यानंतर ज्ञानाने आत्मस्वरूपावरील भ्रामक आवरण दूर होऊन शिष्याला स्वतःची खरी ओळख मिळते. यामुळे सर्व प्रकारच्या दुःखांची आत्यंतिक निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होते, हाच मोक्ष आहे! जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका करणारी ही स्थिती व त्यासाठीची आवश्यक पूर्वतयारी सद्‌गुरूच करवून घेतात. त्याबद्दल शिष्याने नेहमीच कृतज्ञ राहणे आवश्यक आहे हे सांगणारा हा गुरुपौर्णिमेचा दिवस. त्यानिमित्त जगभरातील सर्व गुरूंना व सर्वव्यापी गुरुतत्त्वाला शतशः वंदन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT