पाच वर्षांत महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्क्यांवर. Pudhari File Photo
संपादकीय

पाच वर्षांत महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्क्यांवर

स्टार्टअप उद्योगांत अत्यंत वेगाने राज्यात प्रगती

पुढारी वृत्तसेवा
अनंत सरदेशमुख, माजी महासंचालक, महाराष्ट्र चेंबर्स

महाराष्ट्राचा विकास दर हा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूप चांगला आहे. तसेच सकल उत्पादनातही महाराष्ट्र खूप पुढे आहे. सध्या राज्याचा विकास दर हा 6 टक्के आहे; मात्र आगामी पाच वर्षांत मुंबई-पुण्यासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येत आहे. तसेच स्टार्टअप उद्योगांत अत्यंत वेगाने राज्यात प्रगती सुरू आहे. या सर्वांचा विचार केला, तर महाराष्ट्राचा विकास दर हा 6 वरून 8 ते 10 टक्क्यांवर जाईल असेच चित्र दिसत आहे.

महाराष्ट्र सुरुवातीपासून उद्योगाला प्राधान्य देणारे राज्य ठरले आहे. त्यामुळे ते देशाचे ग्रोथ इंजिन ठरले. आयटी, वाहन या उद्योगांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. आपल्या राज्याकडे जेवढे उद्योगाचे ‘सेगमेंट’ वाढले, तेवढे इतर कुठल्याही राज्यात नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती उद्योग क्षेत्रात चहुबाजूंनी होत आहे. यात आपण बारकाईने पाहिले, तर औषधी, वस्त्र, जैवतंत्रज्ञान, वाहन उद्योग, विद्युत वाहने, आयटी, तेल, नैसर्गिक वायू, खाद्य, कृषी या क्षेत्रांत आपण खूप प्रगती केली आहे.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील नवी गुंतवणूक विकासगंगा ठरणार

देशातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. मुंबई देशाची औद्योगिक व्यापारी राजधानी आणि जागतिक आर्थिक केंद्र आहे. यात भर पडणार आहे ती सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांच्या प्रगतीची. त्यामुळे महाराष्ट्र हे राज्य कायम उद्योगांच्या बाबतीत अग्रेसर राहिले आहे आणि राहणार आहे. देशाचे प्रमुख निर्यात केंद्र म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. यात कुशल कामगार ही आपली जमेची बाजू आहे. औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, कापड उद्योग, वाहनांचे सुटे भाग, दागिनेनिर्मिती, अन्न-खाद्यपदार्थ याकरिता निर्यात व्यापार केंद्रांची स्थापना राज्यात खूप आधी झाली. 2020 पर्यंत राज्यात 37 निर्यात व्यापार केंद्रे झाली आहेत. यात आणखी खूप मोठी भर पडणार आहे. राज्याच्या सकल उत्पादनवाढीचा विचार केला, तर 2015 ते 2024 या नऊ वर्षांत राज्याचा विकास दर सुमारे 6 टक्के इतका आहे. राज्याचा नक्त सकल उत्पादनाचा विचार केला, तर ते 35 लाख कोटी रुपय इतके आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे 2 लाख 78 हजार रुपये इतके 2024 मध्ये झाले आहे. हा एक वेगळा विक्रम महाराष्ट्राने केला आहे. कारण, 2012 मध्ये महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 99 हजार 597 रुपये इतके होते. अवघ्या बारा वर्षांत महाराष्ट्राने ही प्रगती केली आहे. भारताचे दरडोई उत्पन्न 1 लाख 84 हजार रुपये इतके आहे. सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राने शैक्षणिक प्रकल्पांवर 17.2 टक्के इतकी तरतूद केली; मात्र राष्ट्रीय गुंतवणूक ही 15.8 टक्के आहे. आपण इतर राज्यांच्या तुलनेत या गुंतवणुकीत दोन टक्क्यांनी पुढे आहोत. राज्यात 74 हजार 830 कोटी रुपयांची गुंतवणूक शिक्षण, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रांत झाली आहे.

अशी होत आहे राज्याची प्रगती

  • 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई येथे सुमारे 12 हजार 700 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि प्रारंभ झाला.

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग राज्याला समृद्धीकडे नेणारा प्रकल्प ठरत आहे. यात 55 हजार 335 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

  • नवी मुंबई येथे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय विमानतळ यात 14 हजार 119 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

  • सहा लाख कोटी प्रवासी तसेच पंधरा लाख मे. टन मालवाहतूक यातून होणार आहे.

  • 2021-22 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात रस्ते महामार्ग प्रकल्प यात गुंतवणूक झाली आहे, ती 22 हजार सहाशे आठ कोटी रुपयांची आहे.हा

  • अर्थसंकल्पाच्या 5.2 टक्के विनियोग आहे.

  • मे 2022 मध्ये महाराष्ट्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था यात सामंजस्य करार होऊन 30 हजार चारशे कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

  • यात महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांची वाढ अपेक्षित होती, ती सुरू झाली आहे. राज्यात 58 क्लस्टर तयार झाले आहेत.

  • महाराष्ट्र देशातील प्रमुख स्टार्टअप केंद्र ठरले असून, 25 हजार 44 नोंदणीकृत स्टार्टअप आहेत.

  • कर्नाटकमध्ये 15 हजार, दिल्लीत 14 हजार 734, उत्तर प्रदेश 13 हजार 299, गुजरात 11 हजार 436 आहेत. यात युनिकॉर्न कंपन्या 39 असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

  • औद्योगिक धोरण 2019 नुसार महाराष्ट्राने सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग व तंत्रज्ञान उद्योग 4.0 क्षेत्राला प्राधान्य दिले. यात दहा लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती आणि ती सुरू झाली आहे.

  • मुंबई सागरी मार्ग, मेट्रोमध्ये मुंबई, पुणे, नागपूरचा विकास झाला आहे.

  • बंदर विकासामध्ये नाव्हाशेवा, वाढवण बंदर यांचा विकास झाला आहे.

  • विद्युत वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, हरितऊर्जा, हरित तंत्रज्ञान, सौरऊर्जा, वायुऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, उद्योग 4.0 ई-कॉमर्स, जागतिक व्यापार, वित्तसेवा, स्टार्टअप यामध्ये पुढे जाण्याची शक्यता आहे.

  • मॅग्नेेटिक महाराष्ट्र 2.0 जून 2020 मध्ये झाले. यात 1.13 लाख कोटींचे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राकडे आकर्षित झाले.

  • यातून अडीच लाख लोकांना रोजगार मिळाला. उद्योग संवर्धन व आंतरिक

  • व्यापार विभाग भारत सरकार 2019 ते 2024 महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक ही 17 लाख कोटी रुपये इतकी वाढली.

  • महाराष्ट्रातील 2024 मधील एकंदरीत निर्यात ही 5 लाख 71 हजार कोटी इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT