कर्नल शिवानंद वराडकर
१९४७ च्या फाळणीनंतर जम्मू-काश्मीरच्या विलिनीकरणातून निर्माण झालेला गिलगिट-बाल्टिस्तान, जम्मू आणि काश्मीरचा वाद आजही भारत-पाकिस्तान संबंधांच्या केंद्रस्थानी आहे. या प्रदेशाचा इतिहास, भौगोलिक व राजकीय वास्तव, तसेच सध्या पाकिस्तानव्याप्त भागात उसळलेल्या असंतोषाची पार्श्वभूमी आणि त्याचे संभाव्य परिणाम याविषयी...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९४७ पासून ‘पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तान जम्मू आणि काश्मीर’ हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. १९४७ मध्ये दोन्ही देश स्वतंत्र झाल्यावर भारतातील संस्थानांच्या विलीनीकरणाच्या वेळी बर्याच संस्थानांनी लगेच मान्यता देऊन विलीन होण्यात शहाणपणा दाखवला; परंतु काही संस्थाने उगाचच अडून बसली आणि पाणी नाकापर्यंत आल्यावर घाईगडबडीत विलीनीकरणाला मान्यता दिली. राजा हरिसिंह यांच्या अधिपत्याखाली असलेले जम्मू आणि काश्मीर संस्थान हे त्याचे एक उत्तम उदाहरण!
जम्मू-काश्मीर तसे बऱ्यापैकी मोठे संस्थान. उत्तरेला लेह, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान. मधल्या भागात काश्मीरचे खोरे आणि पश्चिम दक्षिण भागात जम्मू, अखनूर, पूंछ, सुरणकोट वगैरे पायथ्याचा भाग. प्रत्येक भागाची रचना, जडणघडण, संस्कृती, चालीरीती, हवामान वेगवेगळे. लडाख, बाल्टिस्तान, गिलगिट, कारगिल भाग हा बर्फाळ, पहाडी, अतिदुर्गम आणि हायअल्टिट्यूड म्हणजे १०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवरचा भाग. वर्षातील सहा-सात महिने बर्फामुळे बाहेरील जगापासून संपर्क तुटलेला. दुर्गम भागामुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे विकास खूप कमी. म्हणूनच रस्ते आणि दळणवळणाची साधने खूपच कमी. लोकसंख्या पण त्यामानाने खूपच विरळ. बहुतेक लोक बौद्ध धर्माचे पालन करणारे आणि कारगिलमध्ये मुस्लीम आणि तुर्तुक/दरबुकमध्ये हानु जमात, जे या सर्वांपासून पूर्णपणे वेगळे आणि आर्यांचे खरे वंशज.
काश्मीर खोऱ्यामध्ये मुख्यत काश्मिरी पंडितांचे आणि मुस्लिमांचे वास्तव्य होते. काश्मीरमध्ये बर्फ पडत असला, तरी कमी उंचीवर असल्याने लडाखसारखा कमी ऑक्सिजनचा त्रास येथे नाही. काश्मीर म्हणजे खरोखरच अतिशय मोहक आणि सुंदर. त्याला 'पृथ्वीवरील स्वर्ग' ही उपाधी एकदम शोभणारी आहे. अनेक प्रकारची रंगीबेरंगी आकर्षक फुले, सफरचंद, अक्रोड, बदामसारखी फळे, सुंदर तलाव, नदी-नाले आणि मखमली गालिच्यासारखी हिरवीगार गवतांची कुरणे. म्हणूनच तर पर्यटनासाठी, सिनेमांच्या चित्रीकरणासाठी येथे लोकांची रीघ लागायची. जम्मू हे काश्मीरच्या पायथ्याला आणि बऱ्यापैकी समतल प्रदेश. इथे राहणारे बहुतांश डोगरा आणि गुज्जर. थोड्या फार प्रमाणात मुसलमान.
१९४७ च्या विभाजनानंतर महाराजा हरिसिंह द्विधा मनःस्थितीत पडले होते. स्वतंत्र राहायचे, भारतात सामील व्हायचे की पाकिस्तानचा हिस्सा व्हायचे, या गोंधळलेल्या अवस्थेतील राजा हरिसिंग वेळेत निर्णय घेऊ शकले नाहीत. तोपर्यंत अगतिक झालेल्या पाकिस्तानने काही बंडखोर स्थानिक लोकांना चिथवून जम्मू-काश्मीर काबीज करायच्या इराद्याने श्रीनगरवर आक्रमण केले. ज्यावेळी त्यांच्याकडून बारामुल्ला आणि उरी काबीज केले गेले आणि त्यांचा मोर्चा जेव्हा श्रीनगरकडे वळला तेव्हा कुठे राजा हरीसिंगना धोक्याची जाणीव होऊन त्यांनी विलीनीकरणावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी या बंडखोरांना मागे लोटून बारामुल्ला, उरी परत घेतले आणि पुढचा अनर्थ टाळला. काही दिवसांनी युद्धसंधी झाल्यावर यापैकी जम्मू, काश्मीर आणि लडाखचा काही भाग पाकिस्तानकडे राहिला आणि सध्याची नियंत्रण रेषा लागू झाली, जीला आपण 'लाईन ऑफ कंट्रोल' म्हणतो.
राजा हरीसिंग संस्थानाच्या पाकिस्तानकडे असलेल्या भागाला पाकव्याप्त काश्मीर असे म्हटले जाते. तसे पाहायला गेले, तर या भागाला पाकव्याप्त गिलगिट, बाल्टिस्तान, जम्मू आणि काश्मीर असे म्हटले पाहिजे. कारण, पाकिस्तानकडे जेवढा भाग आहे त्यापैकी ८६ टक्के गिलगिट बाल्टिस्तानाचा प्रदेश, १० टक्के जम्मूचा प्रदेश आणि फक्त ४ टक्के काश्मीरचा भाग आहे, हे बहुतेकांना माहीतच नाही. सध्या या पुर्या पाकव्याप्त प्रदेशात हिंसाचार, जाळपोळ, निदर्शने चाललेली आहेत. पाकिस्तान सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केली गेली आहेत आणि तिथला आक्रोश दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागातील असंतोषाचे, खदखदीचे मुख्य कारण म्हणजे अन्नधान्ये, जीवनावश्यक वस्तू आणि विजेचे अतोनात वाढलेले दर आणि नागरिकांसाठी मूलभूत अधिकारांची वानवा; पण आता या आंदोलनाने त्याही पुढे जाऊन हिंसक वळण घेतले आहे. दडपशाहीला कंटाळून तिथल्या स्थानिकांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांबरोबर दोन हात करायला सुरुवात केली आहे.
खरे तर, आपल्या जम्मू आणि काश्मीर राज्याला जी स्वायत्तता दिली गेली होती तशाच प्रकारची प्रणाली पाकिस्तानव्याप्त भागातही आहे; परंतु पाकिस्तानद्वारे या पाकव्याप्त प्रदेशाला कुठल्याही प्रकारचा स्वायत्तता दर्जा, कुठलेच अधिकार दिले गेलेले नाहीत. त्यांचा पाकिस्तानच्या राजकारणात कोणताही प्रकारचा सहभाग नाही आणि स्वायत्तता तिथे फक्त नावापुरती आणि कागदावरच आहे. तसेच त्या भागात काहीही उद्योगधंदेही नाहीत. बऱ्याच म्हणजे जवळजवळ ८७ टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. हा भागही आपल्या लडाख, काश्मीरसारखा निसर्गरम्य असल्याने पर्यटनाला इथेही खूप वाव आहे; पण त्यामानाने इथे पर्यटकांचा ओघ कमीच आहे आणि तिथले अनेक लोक बाहेरच्या देशात गेले आहेत. त्यात खासकरून ब्रिटनमध्ये गेले आहेत. ते पैसे पाठवतात आणि त्यावरच येथील नागरिकांची गुजराण होते. तसे बघायला गेले, तर पुऱ्या पाकिस्तानमध्ये या भागातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने तिथला साक्षरता दर हा खूपच चांगला म्हणजे ७४ टक्के इतका आहे. तिथे नागरिकांसाठी मूलभूत अधिकार, विकासकामांची कमी आणि महागाई हीच असंतोषाची मुख्य कारणे आहेत आणि मुख्य म्हणजे गिलगिट बाल्टिस्तानवाल्यांचे लेह, कारगिलबरोबर काश्मीरची आपल्या काश्मीरबरोबर आणि जम्मूची आपल्या जम्मूबरोबर तुलना होतेय आणि त्यांच्या लक्षात आले आहे की, भारत प्रशासित लडाख, काश्मीर आणि जम्मूमधील लोकांचे राहणीमान, आर्थिक परिस्थिती, प्रशासन आणि पर्यटन कितीतरी चांगल्या दर्जाचे आहे.
‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या म्हणीप्रमाणे पाकिस्तानने चीनबरोबर आपला सीमावाद सोडवण्यासाठी गिलगिट बाल्टिस्तानच्या इशान्य सीमेवरील काराकोरम पर्वतरांगा आणि सियाचीन ग्लेशियरच्या पश्चिमेकडील अतिमहत्त्वपूर्ण आणि सेन्सिटिव्ह शक्सगाम व्हॅली चीनला देऊन टाकली, जी सध्या चीनच्या जिनझियांग उघार प्रदेशाचा भाग आहे. अर्थात, हा वादग्रस्त पाकव्याप्त प्रदेशाचा भाग असल्याने भारताने हे मान्य केलेले नाही आणि यावर आक्षेप नोंदवलेला आहे.
पाकिस्तानची सध्या सगळ्याच स्तरावर अधोगती सुरू आहे. भ्रष्ट आणि अस्थिर प्रशासन, कर्जबाजारीपणा, दहशतवाद याने पाकिस्तान पोखरलाय. त्यामुळेच अफगाणिस्तान आणि भारताच्या सीमेजवळील खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, पंजाब सिंध आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीर वगैरे प्रदेश कंटाळून वेगळे व्हायची मागणी करत आहेत. हे असेच चालत राहिले, तर पाकिस्तान लवकरच छोट्या-छोट्या देशांमध्ये विभागाला जाईल आणि कोणी सांगावे, जर का पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मनावर घेतले, तर ते परत पूर्वीप्रमाणे भारतातील लडाख, जम्मू-काश्मीरचा भाग होऊ शकतात. आगे आगे देखो, होता है क्या..!