Mumbai BMC political | वाद सोडा, कामाला लागा  Pudhari File Photo
संपादकीय

Mumbai BMC political | वाद सोडा, कामाला लागा

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मंत्रिपदांवरील आरोप, राष्ट्रवादीतील घडामोडी आणि स्थानिक सत्तेतील धार्मिक राजकारणामुळे वातावरण तापले आहे. मुंबई महापालिकेसह राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांनी संघर्षाऐवजी जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

अस्वस्थ महाराष्ट्र शांत होण्याचे नाव घेत नाही. थेट मंत्र्याच्या कार्यालयात लाच मागितली जात असल्याचे प्रकरण समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन मंत्र्यांचे आरोपांमुळे पद गेले. आता झिरवळ यांच्या खात्यावर आरोप नव्हे, तर पुरावे सापडल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई झाली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अत्यंत धीरोदात्तपणे राजकारणात वावरू लागलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरची आव्हाने मोठी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा, पाठोपाठची दोन्ही राष्ट्रवादीमधील वेगवेगळी वक्तव्ये, यामुळे अस्वस्थता आहे. दोन्ही राष्ट्रवादीला महापालिकेत किंवा पुण्याचा अपवाद वगळता जिल्हा परिषद निवडणुकीत फारसे यश मिळाले नसले, तरी त्याची कारणे काय? या खोलात न शिरता विलीनीकरणाभोवती चर्चा केंद्रित झाली.

महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया आता जवळपास संपली. विधानसभेसारखेच निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागल्याने महाराष्ट्राने आता बहुमताच्या आधारावर प्रगती करण्याची वेळ आली होती. अस्वस्थ राजकीय महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टी मार्गी लागल्या, असे वाटत असताना अचानक अजितदादा गेले. त्यांच्या पक्षात घडामोडी सुरू झाल्या. त्यातच पुरोगामी महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाला लागलेले धार्मिक रंगही पुसट होण्याचे नाव घेत नाहीत. अल्पसंख्याक दर्जा देणारी पत्रे शाळांना अजितदादांच्या दुखवट्याच्या काळात वाटली. हा काय प्रकार आहे?

महापालिका निवडणुकीत धक्कादायक समर्थन मिळाले ते ‘एमआयएम’ या पक्षाला. कुठेतरी हिंदुत्ववादी शक्तींना रोखण्यासाठी अल्पसंख्याक मते ध—ुवीकरणाशिवाय पर्याय नसल्याच्या मन:स्थितीत आलेली दिसतात. या 14 टक्क्यांपर्यंत असलेल्या लोकसंख्येची मते आपल्यालाच मिळावीत, यासाठी ‘एमआयएम’, समाजवादी पक्ष, मुस्लिम मतदारांचा अनुनय करणारे पक्ष यासह काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे हेही पक्ष प्रयत्न करत असतात. बहुसंख्याक हिंदू भाजपला मत देणार असतील, तर मतांची बेगमी करायची कुठून? यासाठी एकगठ्ठा अल्पसंख्याक मते आपल्याला मिळावीत, अशी चढाओढ भाजपेतर पक्षांमध्ये सुरू आहे. त्यातच टिपू सुलतानसारखी प्रतीकात्मक बाब समोर येत आहे.

टिपू सुलतानचे चित्र मालेगाव महापालिकेत लावण्याच्या निमित्ताने जो वाद सुरू झाला त्याने अचानक वेगळे वळण घेतले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विरोध करण्यासाठी निदर्शने हे समजण्यासारखे. मात्र, सत्ताधारी पक्षाची भूमिका हिंसक असेल तर त्याचे कारण काय? पुण्यातील प्रकार याच वर्गवारीत मोडणारा आहे. अचानक हाणामारी का झाली, याकडे लक्ष द्यावे लागेल. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसला पुढे नेण्याची धडपड करताना दिसतात. त्यासाठी त्यांनी मुस्लिम मते समवेत आणण्याची धडपड केली असावी. मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना होऊ शकते का, याचा विचार सामाजिक अभ्यास करणार्‍यांनी करायला हवा. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की, त्यांनी अशा प्रकारची तुलना केली नव्हती, त्यांचे वाक्य मोडूनतोडून दाखवले गेले. असे असेल तर प्रश्न मिटला. मात्र, सध्या जे काय राजकारण रंगते आहे, त्यात अचानक आक्रमक होत यानिमित्ताने जीभ कापण्याची भाषा सुरू झाली. ही भाषा योग्य आहे का, याचाही विचार व्हायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT