साडी हा बहुतांश महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. समजा एखाद्या महिलेकडे 200 साड्या आहेत आणि बाहेर जाण्यासाठी तिने कपाट उघडले तर तिचा पहिला डायलॉग असतो, साड्याच नाहीत!. किती साड्या घेतल्या म्हणजे भरपूर साड्या आहेत, असे म्हणता येईल याचे कोणतेही गणित नाही. महिलेची साडी खरेदी हा तिच्या नवर्यासाठी डोकेदुखीचा विषय आहे. एक तर त्यातले काही कळत नाही आणि समजा कळत असले आणि एखादी साडी निवडली तर बायकोला नेमकी ती साडी आवडत नाही हे जगाच्या सुरुवातीपासून असेच घडत आलेले आहे.
लाडक्या बहिणींमध्ये अंत्योदय रेशन कार्ड असणार्या महिलांना शासन येत्या होळीच्या आधी एक साडी फ्री देणार आहे, हे ऐकल्यानंतर तमाम महिला वर्गामध्ये आनंदाची लाट उसळली नसती तरच नवल होते. लाडक्या बहिणींना लाडके भाऊ लवकरच दरमहाचे मानधन पण देणार आहेत. याबरोबरच काही महिलांना भावांकडून येणारी साडी ही ‘माहेरची साडी’ वाटणार यात काही शंका नाही. एकंदरीत राज्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे, असे आपल्या लक्षात येईल.
सरकार जोमाने कामाला लागले आहे, असे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. परिवहन मंत्री महोदयांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आजवर किमान पाच ते सहा वेळा बसमध्ये प्रवास केला आहे. बसमधून प्रवास केल्याशिवाय प्रवाशांच्या आणि एसटी प्रशासनाच्या समस्या समजणार नाहीत यासाठी त्यांनी आमदार आणि खासदार यांनाही लाल परीने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. वातानुकूलित केबिनमध्ये बसून फिल्डवरचे निर्णय घेणे चुकीचे आहे, यात शंका नाही. एसटीने प्रवास करताना त्या प्रवासाचे व्हिडीओ घेतले जातील, याची कटाक्षाने काळजी परिवहन मंत्री महोदयांनी घेतले आहे. मंत्री महोदय कोट जॅकेटसह प्रवास करताना किती घामाघूम झाले असतील, याची आपण कल्पनाच केलेली बरे. काही का असेना पण मंत्रिमहोदयांच्या या प्रवासामुळे त्यांचा लाडक्या बहिणीशी पण संपर्क झाला असेल. याचे कारण 50 टक्के भाडे सवलत असल्यामुळे आज एसटीच्या प्रवासात एकूण प्रवाशांमध्ये महिलांचे प्रमाण 70 टक्केच्या आसपास आहे. या महिलांनीच एसटी नफ्यात आणून दिलेली आहे हे समजून घेतले पाहिजे.
एकंदरीत मुलगी म्हणून जन्माला यायचे असेल तर महाराष्ट्रातच जन्माला यावे, अशी परिस्थिती निर्माण झाली तर ते आपल्या राज्यासाठी भूषणावह असणार आहे. महिलांना सर्व प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजेत, असा आमचाही आग्रह आहे. महिला सुरक्षित आणि सुखी राहतील तरच राज्याचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ म्हणजे आनंदी राहण्याचा निर्देशांक खूप उंचावर राहील आणि देशातील सर्वात आनंदी राज्य म्हणून महाराष्ट्राचा नंबर लागणे आपल्या सर्वांसाठी आनंदाचे असेल. लाडक्या बहिणींसाठी अनेक निर्णय घेत असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे ना! त्याउपर विचार करायचा झाल्यास महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणखी काही प्रभावी पावले उचलली तर बरे होईल. आता तर काही लाडक्या बहिणींनी सरकारच्या योजनेचा लाभ मिळू नये, यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे, हे महिलांच्या चांगल्या विचारांचे द्योतक आहे.