शशिकांत सावंत
कोकणात 70 हून अधिक समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहेत. यंदा समुद्र किनार्यावर जवळपास 25 लाख पर्यटकांनी हजेरी लावून सुखद आनंदाचा धक्का दिला. इअर एंड आणि नववर्ष स्वागतासाठीचे आता कोकण डेस्टिनेशन ठरत आहे.
पालघरपासून सिंधुदुर्गपासून पसरलेल्या 720 किलोमीटरच्या समुद्रकिनार्यावर जवळपास 25 लाख पर्यटकांनी हजेरी लावून सुखद आनंदाचा धक्का दिला. इअर एंड आणि नववर्ष स्वागत यासाठी गोवा हे महत्त्वाचे डेस्टिनेशन होते. मात्र हा केंद्रबिंदू आता कोकणकडे सरकला आहेे. कोकणात जवळपास 70 पेक्षा जास्त समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहे. पालघर जिल्ह्यामध्ये केळवे, डहाणू, सातपाटी, माहीम, बोर्डी असे समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहेत. रायगड जिल्ह्यात मांडवा, किहीम, वर्सोली, अलिबाग, नागाव, आक्षी, मुरूड, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे, दाभोळ, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी, पावस अशा किनार्यांना पर्यटकांची पसंती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, वाडा, विमलेश्वर मंदिर, तांबळडेग, मिठबाव, आचरा, वालावल, देवबाग, तारकर्ली, निवती, शिरोडा, वेळागर असे किनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. यापूर्वी कोकणात हापूस आंबा, काजू आणि भातपीक हे कोकणी माणसाच्या अर्थकारणाचे केंद्र होते. त्यात पर्यटनही आघाडीवर आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला, त्याला 25 वर्षे झाली. या 25 वर्षांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये फारसे यश आले नसले तरी, निवास-न्याहारी योजना आणि हॉटेल व्यावसायिकांनी पुढे येऊन उभारलेल्या सुविधा यातून पर्यटन वाढू लागले आहे. सिंधुदुर्गात पाच पंचतारांकित हॉटेल उभी करण्याचा आराखडा 25 वर्षांपूर्वी जाहीर झाला. यामध्ये हाऊस बोट, सी वर्ल्ड प्रकल्प, विमानतळ आणि चांगले रस्ते बनविण्याचा संकल्प होता. याच आराखड्यातून विमानतळ उभे राहिले, मात्र विमानउड्डाणेच नसल्याने पर्यटकांना त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही विमानतळांवरील प्रवासी वाहतूक सक्षमपणे सुरू नसल्याने वाढत्या पर्यटनाला याचा फटका बसत आहे. कोकणात गावागावांत रस्ते पोहोचले, तसेच पर्यटन स्थळांवरही पर्यटकांना पोहोचता येईल तेवढी व्यवस्था झाल्याने पर्यटन वाढू लागले आहे.
कोकण हा प्रदेश नैसर्गिक सौंदर्याने नटलेला समृद्ध प्रदेश आहे. इथल्या कातळशिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. कोकणातील किल्ले रायगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी किल्ला यांचा जागतिक वारसास्थळांत समावेश असल्याने येथील पर्यटनाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. कोकण जगाची पुरातत्त्वीय वारसाभूमी ठरेल, अशी पर्यटन केंद्रे येथे पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच या भूमीला आता पर्यटकांचीही मोठी दाद मिळत आहे. कोकणचे हे वाढते पर्यटन अधिक विस्तारावे आणि जागतिक पर्यटनाचे हे एक मुख्य केंद्र व्हावे, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, काळाची गरज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या विमानतळांचे सक्षमीकरण, बंद असलेली जलवाहतूक पुन्हा सुरू करणे आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे यावर भर दिला गेल्यास हे पर्यटन आणखी चांगले बाळसे धरू शकते.
कोकणात कृषी पर्यटनही बहरू लागले आहे. मात्र, या पर्यटनालाही अभ्यास सहलींचे रूप देऊ न त्यात सक्षमता आणता येईल. मलेशिया, थायलंड, सिंगापूर, दुबई या देशांनी पर्यटनविषयक पायाभूत सुविधांचे एकात्मिकरण करून पर्यटकांना असंख्य करमणुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले. थीम पार्क, थिएटर शोज, प्राणी-पक्षी संग्रहालय, म्युझियम अशा पर्यटकांच्या आवडीच्या गोष्टींवर भर दिला. याचा सकारात्मक परिणाम पर्यटन वाढीवर झाला. या गोष्टी कोकणात उभ्या करणे शक्य आहे. किल्ले रायगडावरील शिवसृष्टी ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अशा यापूर्वी घोषित झालेल्या गोष्टी आज केवळ घोषणेच्या पातळीवरच राहिल्या आहेत. यांना मूर्त रूप दिले तर कोकणचे हे वाढते पर्यटन आणखी वृद्धिंगत होऊ शकेल.