Gomantaki Vari | गोमंतकीय वारी  
संपादकीय

Gomantaki Vari | गोमंतकीय वारी

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

गोव्याची जी प्रतिमा बाहेरच्या प्रदेशात आहे, ती चातुर्मासात गळून पडते. वातावरण हरिनामाच्या गजराने टाळ-मृदुंगाच्या तालात रंगून जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पथके आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. त्यानंतर पुढील चार महिने विविध कारणांनी भक्तीचा हा गजर घुमत राहतो.

आषाढ आला की महाराष्ट्रातील वातावरण बदलते. शेतात पेरणी झालेली असते, आकाशात धूसर मेघ असतात आणि माणसांच्या मनात एकच ओढ असते - पंढरपूर. चंद्रभागेच्या काठावर उभा असलेला तो सावळा विठ्ठल, ज्याच्या भेटीसाठी वर्षभर वाट पाहिली जाते. ही भेट फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. भक्तीला भाषा नसते, सीमा नसतात. म्हणूनच गोवा, कर्नाटक आणि आता लंडनमधूनही वारी निघाली आहे. कानडा विठ्ठलु पंढरपुरात येऊन बसला आणि त्याने त्रिखंडातील वैष्णवांना एका सूत्रात बांधले. गोव्यातील संस्कृतीबद्दल बाहेरच्या लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. गोवा म्हणजे पार्ट्या, कॅसिनो, चंगळवाद. पण आषाढी एकादशी जवळ आली की, हा गैरसमज आपोआप गळून पडतो. कारण गोमंतकीयांच्या मनामनात विठ्ठलभक्तीचा भाव खोलवर रुजलेला आहे.

दरवर्षी गोव्यातून पाच हजारांपेक्षा जास्त वारकरी पायी पंढरपूरला जातात. ३५० किलोमीटरची वाट. साधारण १५ दिवसांचा प्रवास. खांद्यावर झोळी, मुखात हरिनाम, टाळ-मृदुंगाचा अखंड गजर आणि डोळ्यात फक्त एकच स्वप्न. विठ्ठलाचे दर्शन. उन्हातान्हात चालणे, कधी पाऊस, कधी चिखल. पायाला फोड येतात, अंग दुखते. पण हे सगळे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात विरून जाते. तहानभुकेचा विसर पडतो. एका घासाने पोट भरते आणि एक घोट पाण्याने तहान भागते. सर्व चिंता विवंचना कुठल्या कुठे पळून जातात. या तपश्चर्येतून मिळणारे मानसिक समाधान शब्दात सांगता येत नाही.

वाटेत अनेक विस्मयकारक अनुभव येतात. अज्ञात गावात अनोळखी माणसे जेवायला बोलावतात. रात्री झोपण्यासाठी शाळा, मंदिर उघडून देतात. पाय दुखत असेल तर कोणी तरी तेल लावून देतो. धर्म, जात, भाषा सगळे बाजूला पडते. फक्त एक ओळख उरते ती म्हणजे वारकरी. गोव्यातून निघणाऱ्या वाऱ्यांचीही स्वतःची परंपरा आहे. आता तर ही वारी आंतरराष्ट्रीय झाली आहे. लंडनमधूनही वारी निघाली आहे. तिथे राहणारे गोमंतकीय आणि महाराष्ट्रीय मंडळी एकत्र येऊन नामस्मरण करत पंढरपूर गाठणार आहेत. भौगोलिक सीमा विसरून लोक एकत्र येतात. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे हे चांगले उदाहरण आहे. उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम सगळे भेद विसरून लाखो लोक एकाच रंगात रंगतात. तो रंग आहे भगवा.

पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात आत जाता येईलच याची खात्री नसते. गर्दी एवढी असते की, कधी कधी फक्त कळसाचे दर्शन होते. कधी पायरीला स्पर्श करून परतावे लागते. पण वारकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान असते. वारीत चालताना मिळालेला आनंद, सोबत मिळालेले लोक, मनात रुजलेली शांतता. मंदिर हे फक्त निमित्त असते. खरा विठ्ठल तर वाटेत प्रत्येक वारकऱ्यात भेटतो.

गोव्यातून जाणाऱ्या वाऱ्या आपल्याला शिकवतात की मॉडर्न होणे म्हणजे मुळे तोडणे नव्हे. चंगळवादी जीवन जगत असलो तरी मनातली भक्ती जिवंत ठेवता येते. गोवा बदलत असला तरी आषाढी एकादशी आली की, हजारो हात टाळ घ्यायला पुढे सरसावतात. आपल्या मुळांशी, आपल्या परंपरेशी जोडून घेण्याचा हा ध्यास अभूतपूर्व म्हणावा लागेल. हा विरोधाभास नाही. ही आपली ताकद आहे. या वारीतून मिळणारे मानसिक समाधान फार मोठे आहे. रोजच्या जीवनातील ताण, कामाचा दबाव, पैशाची चिंता हे सगळे १५ दिवसांसाठी बाजूला ठेवले जाते. वारीत माणूस फक्त माणूस म्हणून जगतो. लहान- थोर, महिला- पुरुष, आपली कामाच्या ठिकाणची पदे मागे पडून समोर राहते ती केवळ ‘माऊली’. सगळे एका रांगेत चालतात. एकाच पंगतीत जेवतात. एकाच स्वरात गातात. ही समानता आणि हा आनंद आजच्या काळात दुर्मीळ आहे. म्हणूनच वारी संपली की लोक सांगतात, आम्ही रिचार्ज होऊन आलो. आषाढी एकादशी ही एक सांस्कृतिक यात्रा आहे. गोव्यातून निघणाऱ्या वाऱ्या या यात्रेचा महत्त्वाचा भाग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT