महेश कराडकर
मोत्यासारखं अक्षर, पक्कं व्याकरण आणि साधी-सोपी रसाळ भाषा असलेले लेखक म्हणून मराठी भाषा व्यवहारातील सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे असणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन झाले आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. यानिमित्ताने...
श्रीनिवास कुलकर्णी यांनी 'डोह', 'सोन्याचा पिंपळ', 'पाण्याचे पंख' आणि 'कोरडी भिक्षा' या ललितरम्य पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या या लेखनानं औदुंबर, सांगली आणि कराडसारख्या कृष्णेच्या काठावरचा परिसर, तिथला निसर्ग आणि माणसंदेखील अजरामर झाली. औदुंबरच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालेला एक छोटासा मुलगा सांगलीच्या अनाथ विद्यार्थिगृहात राहून माधुकरी मागत मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतो. मॅट्रिकनंतर उत्तम हस्ताक्षरामुळे या किशोरवयीन मुलाला कराडच्या ओगले काच कारखान्यात नोकरी मिळते. तिथे त्यांना प्रभाकर पाध्ये यांच्यासारखे उच्च अभिरूची असलेले लेखक वरिष्ठ म्हणून भेटतात आणि लेखक म्हणून त्यांच्या आंतरिक प्रवासाची वाट आणखी खुलत जाते.
'डोह' हा कसदार संग्रह प्रकाशित झाला आणि अवघ्या मराठी साहित्यविश्वानं या नव्या, निरलस, हळव्या, टवटवीत अनुभवांच्या अस्सल पुस्तकाचं भरभरून कौतुक केलं. इरावती कर्वेंपासून दुर्गा भागवत, इंदिरा संत, पु. ल. व व्यंकटेश, ग. दि. माडगुळकर अशा साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचं स्वागत केलं. कुलकर्णी यांनी अनेक नवे कसदार लेखन करणारे साहित्यिक प्रकाशात आणले. त्यामध्ये प्रा. मोहन पाटील, कृष्णात खोत, विजय पाटील यांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल. त्यांचा साक्षेपी भाव, नीर-क्षीर वृत्ती, संवेदनशील चोखंदळपणा आणि ठामपणा ही गुणवैशिष्ट्ये त्यांच्या संपादनाच्या कामात नेहमीच उपयोगाची ठरत. प्रसिद्धीपराङमुखता हा त्यांचा आणखी एक गुणविशेष. त्यांच्या विनंतीमुळे मराठीतले सर्वच दिग्गज साहित्यिक औदुंबर साहित्य संमेलनात हजेरी लावत.
ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण दांडेकर, अविनाश सप्रे आणि श्रीराम भिसे यांच्या स्नेहामुळे श्रीनिवास कुलकर्णी यांच्याशी माझा परिचय दृढ होत गेला. त्यांच्या अतिशय तरल, साध्या कुतूहलमिश्रित, पण नाजूक मिष्किल स्वभावाचे पैलू जवळून अनुभवता आले. कराडचे आणि श्रीनिवास कुलकर्णी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांनी कराड सोडून जाऊ नये, म्हणून स्वतः यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना प्रेमानं थांबवून घेतलं होतं. कराडमध्ये झालेल्या दोन्ही साहित्य संमेलनांत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रत्येक लिहिणाऱ्या माणसाबद्दल त्यांना प्रचंड आपुलकी होती. त्यामुळेच कराडमार्गे जाणारा प्रत्येक साहित्यिक त्यांच्याकडे आवर्जून यायचा. त्यांचे कोयना वसाहतीतले घर आणि सावलीसारखी मागे उभी असणारी त्यांची अर्धांगिनी ललिता सर्वांचे प्रेमाने स्वागत करायचे. सुगरण असलेल्या वहिनींचा पाहुणचार आणि त्यांच्याबरोबरच्या साहित्यिक गप्पांनीही सारस्वत मंडळी तृप्त अंतःकरणाने पुढच्या प्रवासाला निघायची. कुणी एखादा मुक्कामही टाकायचा.
बालपणापासून अनुभवलेले निसर्गसौंदर्य, चित्रकलेचा वारसा आणि संस्कारक्षम वातावरण यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याच अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उमटत राहिले. मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण; पण लेखनाची प्रामाणिक असोशी, इतरांच्या साहित्याबद्दल कुतूहल आणि ओढ यामुळे एका समर्थ लेखकाबरोबरच अनेक लेखक घडविणारा साक्षेपी संपादक म्हणून ते संवेदनशील, विनम्र भावाने साहित्य क्षेत्रात सोन्याचा पिंपळ होऊन सळसळत राहिले. मराठी भाषा, मराठी साहित्य प्रगल्भ करणाऱ्या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाची पुस्तके अनेक शाळा आणि विद्यापीठांतून नवी तरल, संवेदनशील मने घडवत आली आहेत. त्यांच्या या जीवनप्रवासाचा गौरव त्यांच्या विविध साहित्यकृतींना मिळालेल्या पुरस्कारांनी अधोरेखित होत आला आहे. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने नाशिक येथे त्यांना प्रतिष्ठेचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊनही सन्मानित केले होते. कुठलाही आविर्भाव न ठेवता अतिशय निर्मळ मनाने श्रीनिवास विनायक कुलकर्णींनी दिलेले योगदान याहीपुढच्या अनेक पिढ्यांना समृद्ध करत राहील.