Silver Price Drop | सोने-चांदीची मूल्यघसरण Pudhari
संपादकीय

Silver Price Drop | सोने-चांदीची मूल्यघसरण

पुढारी वृत्तसेवा

सोने आणि चांदी हे अलंकार किंवा पारंपरिक बचतीचे माध्यम असण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेतील अत्यंत संवेदनशील पण प्रमाणित असे जिन्नस अर्थात कमोडिटी मानले जातात. ज्या वस्तूंची गुणवत्ता सर्वत्र एकसमान असते आणि ज्यांचा व्यापार जागतिक स्तरावर मागणी व पुरवठ्याच्या मूलभूत नियमांवर चालतो, त्यांना अर्थशास्त्रात कमोडिटी असे संबोधले जाते. खनिज तेल, नैसर्गिक वायू, तांबे किंवा गहू, तांदूळ यांसारख्या कच्च्या मालाच्या श्रेणीतच सोने आणि चांदीचा समावेश होतो; मात्र इतर कमोडीटींच्या तुलनेत मौल्यवान धातूंना दुहेरी आर्थिक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे ते प्रत्यक्ष वापराचे आणि औद्योगिक उत्पादनाचे घटक आहेत, तर दुसरीकडे ते कागदी चलनाला पर्याय ठरणारी सार्वत्रिक आणि कालातीत वित्तीय मालमत्ता म्हणून कार्य करतात. नाशवंत नसणे, मर्यादित नैसर्गिक साठा, सहज विभाज्यता आणि जागतिक पातळीवरील सर्वमान्य स्वीकारार्हता या वैशिष्ट्यांमुळे सोने आणि चांदीला चलनविषयक सुरक्षिततेचे कवच मानले जाते. या धातूंचा व्यवहार आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारपेठांमध्ये वायदे, रोखे आणि विनिमय निधींच्या माध्यमातून होत असल्याने त्यांच्या किमती जागतिक व्याजदर, डॉलरचे मूल्य, महागाईचा दर आणि भूराजकीय घडामोडींनुसार सतत हेलकावे खात असतात.

यामध्ये एक सरळसाधे अर्थकारण नेहमीच दिसून आले आहे, ते म्हणजे असुरक्षित, अस्थिर जागतिक वातावरणात सोने-चांदी या कमोडिटींचे भाव वधारतात. कोरोना महामारी काळात हे प्रकर्षाने पाहायला मिळाले. किंबहुना मार्च २०२० पासून चालू वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सोन्याच्या दराचा आलेख सातत्याने चढाच राहिला. २०२० मध्ये भारतात २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर प्रति १० ग्रॅम सुमारे ४८,६५० रुपये आणि चांदीचा दर प्रतिकिलो ५९,२८० रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धाच्या ठिणगीने आणि जागतिक महागाईने सोने ५१,९८० रुपये आणि चांदी ६५,४०० रुपयांपर्यंत पोहोचली. पुढील दोन वर्षांमध्ये जागतिक मध्यवर्ती बँकांनी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी सुरू ठेवल्याने दर अनुक्रमे ६०,६०० रुपये आणि ७५,८४० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत चढले, तर चांदीनेही ८९,१३० रुपयांचा टप्पा ओलांडला. गतवर्षी या दरांनी ऐतिहासिक भरारी घेतली. विशेषतः आखातातील संघर्ष भडकण्याची चिन्हे दिसू लागताच सोन्याने जोरदार उसळी घेतली. इतिहासात प्रथमच सोन्याचे भाव दीड लाख रुपये प्रतिदहा ग्रॅम इतके झाले. याच कालावधीत चांदीने तर सोन्यालाही मागे टाकत २०२५ मध्ये १,६२,६७० रुपयांचा टप्पा पार केला आणि जानेवारी २०२६ मध्ये तर प्रतिकिलो ३,७९,९८० ते ४,२०,००० रुपयांच्या शिखराला स्पर्श केला.

अवघ्या सहा वर्षांत सोन्याच्या किमतीत जवळपास तिप्पट, तर चांदीच्या किमतीत शिखरावर असताना तब्बल सात ते आठ पटींनी वाढ झाली. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही वाढ आनंदी आनंद गडे ठरली. कारण, या मौल्यवान धातूंनी महागाईवर मात करणारा घसघशीत परतावा दिला; मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय घसरण होत आहे. भारतात चांदीचे दर प्रतिकिलो दोन लाख रुपयांखाली घसरून ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले, तर २४ कॅरेट सोन्याचे दरही प्रति १० ग्रॅम सुमारे १,४२,००० रुपयांच्या आसपास खाली आलेत. चालू वर्षाच्या सुरुवातीला २९ जानेवारी २०२६ रोजी मल्टिकमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) स्पॉट बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅम सुमारे १,७६,३०६ रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता, तर देशभरातील विविध प्रमुख शहरांमध्ये जीएसटी तसेच स्थानिक करांसह हे भाव १,८३,००० रुपयांपर्यंत पोहोचले होते. म्हणजेच आजचे भाव हे याच वर्षातील उच्चांकी पातळीपेक्षा २० ते २२ टक्क्यांनी कमी आहेत. चांदीचे दर तर ५० टक्क्यांनी घसरलेत. या घसरणीमागे जागतिक व्याजदर, चलनवाढ, वित्तीय संधीचा खर्च आणि आशियाई देशांची दीर्घकालीन रणनीती असे अनेक घटक कारणीभूत आहेत. या विक्रमी घसरणीमुळे यंदा दिवाळीमध्ये भारतात सोन्या-चांदीची तुफानी खरेदी पाहायला मिळाली.

भारतीयांच्या सोने प्रेमाला महागाईची झळ सहसा दिसून येत नाही; मात्र सोने पावणे दोन लाखांच्या पुढे गेल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांनी खरेदीला आवर घातला होता. विशेषतः गेल्या चार-सहा महिन्यांत म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने खरेदी जाणीवपूर्वक टाळण्याचा विचार सुरू झाला होता. कारण, सोने हे देशांतर्गत उत्पादन नसून ते आयात करावे लागते. साहजिकच, जितकी त्याची खरेदी अधिक तितका आयातीचा खर्च जास्त. तो वाढला की, रुपयावर दबाव येतो. विदेशी गंगाजळीला फटका बसतो. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनात सोने खरेदीचा मुद्दा प्राधान्याने होता; पण यंंदाच्या दिवाळीआधी आखातातील युद्धसंघर्ष निवळण्याचे संकेत दिसू लागले होते. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा 'दारुण' शब्दालाही लाजवेल असा पराभव झाल्याने युद्धबंदीच्या शक्यतांना अधिक बळकटी दिली. कच्च्या तेलातील घसरणीने आगामी काळातील जोखीम कमी झाल्याचे स्पष्ट केले. भारतीय शेअर बाजाराने पुन्हा उच्चांकासमीप झेप घेऊन जागतिक प्रवाहांची दिशा अनुकूल असल्याची दुदुंभी दिली. याच शृंखलेतील एक भाग म्हणून सोन्या-चांदीच्या भावांत झालेल्या घसरणीकडे पाहायला हवे.

कच्चे तेल, सोने-चांदीच्या भावांची उतरणीला लागलेली गाडी आणि भांडवली बाजारांमधील तेजी या दोन्हींचा सामायिक अर्थ एकच, तो म्हणजे संघर्षकाळ संपतो आहे आणि शांतता येणार आहे. दिवाळीत सोन्या-चांदीची जोरदार खरेदी करून भारतीय ग्राहकांनीही या प्रवाहाचे पाईक बनणे पसंत केले. यंदाच्या धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात देशभरात सुमारे ५२ टन सोन्याची आणि ३०० टन चांदीची विक्री झाल्याचा सराफा उद्योग संघटनेचा अंदाज आहे. सोने खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के, तर चांदीच्या खरेदीत १० टक्के वाढ झाली. सोन्याच्या विक्रीचे मूल्य तब्बल ७२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. आगामी काळात सोन्याच्या दरातील सध्याची घसरण कायम राहील की नाही, हे जागतिक घडामोडींवर अवलंबून असेल. मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली सोने खरेदी, जागतिक कर्जाचे वाढते प्रमाण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील अनिश्चितता हे घटक दीर्घकालीन मागणीला आधार देऊ शकतात. दुसरीकडे अमेरिकी व्याजदर आणि डॉलरमधील चढउतार अल्पकालीन किमतींवर दबाव निर्माण करू शकतात. सोन्याला सुरक्षित मालमत्ता मानणे योग्य असले, तरी त्याच्या बाजारभावाला सुरक्षिततेची हमी समजणे चुकीचे आहे. सध्याच्या घसरणीने गुंतवणूकदारांना दिलेला सर्वांत महत्त्वाचा इशारा हाच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT