गोवा वार्तापत्र : मयुरेश वाटवे
गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांचे नेहमीच स्वागत असते; मात्र अलीकडे काही एकट्या परदेशी महिला पर्यटकांना देशी पर्यटकांचा जाच होऊ लागला आहे. महिला पर्यटकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, त्यांना सेल्फी घेण्यासाठी भरीस पाडून त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच करण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी अलीकडे अशा लोकांविरुद्ध मोहीम उघडली आहे.
गोवा हा सन, सी अँड सँडचा प्रदेश म्हणूनच प्रसिद्ध आहे. परदेशी लोकांना किनाऱ्यांचे मोठे आकर्षण आहे. फार पूर्वी परदेशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर एखादा कोपरा पकडून बेडवर दिवसच्या दिवस शांतपणे पहुडलेले दिसत. तेव्हा किनारेही निवांत होते. एखाद्या रविवारच्या कौटुंबिक सहलीपलीकडे गोमंतकीयांचा समुद्रकिनाऱ्यांशी संबंध नसे. गेल्या काही वर्षांत गोव्याच्या किनाऱ्यांवर देशी पर्यटकांची गजबज प्रचंड वाढली आहे, तरीही परदेशी पर्यटक समुद्राच्या ओढीने येतात. प्रवास सहज सुलभ आणि परवडण्याजोगा झाल्यामुळे कौटुंबिक पर्यटकांऐवजी काही हेतू बाळगून येणाऱ्या अशिष्ट पर्यटकांतही वाढ झाली आहे. अशा देशी पर्यटकांच्या असभ्य वर्तनामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. विशेषतः एकट्या परदेशी महिला पर्यटकांना येणाऱ्या अनुभवांमुळे गोव्यातील पर्यटनाची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा प्रश्नांकित बनली आहे.
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर विशेषतः बागा, कळंगुट, हरमल यासारख्या लोकप्रिय किनाऱ्यांवर अनेक देशी पर्यटक परदेशी महिला पर्यटकांना त्यांच्या संमतीशिवाय जवळून स्पर्श करणे, फोटो घेण्याचा आग््राह करणे किंवा सेल्फी काढण्याचा दबाव टाकणे यांसारखे प्रकार करताना दिसून येतात. या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. परदेशी महिला पर्यटकांना असुरक्षित आणि अस्वस्थ करणारे असे हे वर्तन गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला डाग लावत आहे. गमतीगमतीने फोटो काढणे चालते. काही मर्यादेपर्यंत त्यांचीही काही हरकत नसते; मात्र झुंडीच्या झुंडी जाऊन त्यांच्याशी लगट करू लागल्या, तर त्यांना ते अडचणीचे होतेच, शिवाय त्यांना ती दहशत वाटते. आपण त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करत आहोत, हे देशी पर्यटकांनी लक्षात घेतले पाहिजे. फोटो, सेल्फी काढू देणे त्यांच्यावर बंधनकारक नाही. त्यांनी नकार दिल्यास त्यांच्या इच्छेचा सन्मान केला जायला हवा. अन्यथा, त्यांच्या एका चांगल्या हॉलिडे अनुभवचा विचका होऊन जातो.
पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. लाखो लोक दरवर्षी गोव्याला भेट देतात. स्थानिक नागरिक, हॉटेल मालक, रेस्टॉरंट, टॅक्सी, खानपान व्यावसायिक आणि स्थानिक रोजगार हे सर्व पर्यटनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. त्यामुळे हे पर्यटन पर्यटकांसाठी सुरक्षित, आनंददायी करणे हे राज्याचे कर्तव्यच आहे. या अनुषंगाने गोवा सरकार आणि पोलीस यंत्रणेने कठोर भूमिका घेतली आहे.
विशेषतः गेल्या काही आठवड्यांमध्ये गोवा पोलिसांनी अनधिकृत फोटो व सेल्फी घेणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे. कोणत्याही पर्यटकाचा फोटो किंवा सेल्फी घेण्यापूर्वी संमती घेतली नाही, तर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले जाते, मोबाईल जप्त केले जातात आणि आवश्यक असल्यास 24 तासांची प्रतिबंधात्मक अटक केली जाते. हे फक्त परदेशी पर्यटकांपुरतेच नाही, तर देशी पर्यटकांबाबतही असे प्रकार घडल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सद्यस्थितीत पोलीस गस्त वाढवली गेली आहे आणि समुद्रकिनाऱ्यांवर नियंत्रण, मोबाईल फोटोग््रााफीवर नजर आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात आहे. अतुल्य भारतात ‘अतिथी देवो भव’ असे म्हणत असू, तर तसा अनुभवही पर्यटकांना येणे आवश्यक आहे.