मयुरेश वाटवे
भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, तरी पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त होण्यासाठी 19 डिसेंबर 1961 पर्यंत वाट पाहावी लागली. मात्र, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रांत गोव्याने 14 वर्षांचा हा अनुशेष भरून काढलेला दिसतो. दरवर्षी छोट्या राज्यांमध्ये गोव्याला मिळणारे विविध पुरस्कार त्याची साक्ष देत असतात.
गोवा मुक्तीनंतर गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे, असा प्रयत्न होता. त्याचा पुरस्कार करणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही स्थापन झाला. मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर या नेत्याचा एक वेगळा करिश्मा होता. देशात काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे गोव्यातही काँग्रेस सहज निवडणूक जिंकेल, असा राष्ट्रीय नेत्यांचा होरा होता. गोव्यातील सामाजिक, आर्थिक क्षेत्रात प्रभाव असलेले भाटकार (जमीनदार) काँग्रेसच्या बाजूने होते. मात्र, त्यांचा अंदाज सपशेल चुकला.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने गोव्यात निर्विवाद सत्ता मिळवत आपले वेगळेपण सिद्ध केले. 1967 साली गोव्याचे विलीनीकरण व्हावे की नाही, यासाठी जनमत कौल घेण्यात आला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री बांदोडकर यांनी राजीनामा दिला होता. ही एक विलक्षण घटना म्हटली पाहिजे. केवळ सहा वर्षांचे वय असलेल्या या मुक्त राज्याने दाखवलेली परिपक्वता तत्पूर्वी आणि नंतरही भल्याभल्यांना दाखवता आलेली नाही. जनतेने विलीनीकरणविरोधी दिलेला कौल बांदोडकर यांनी विनम्रपूर्वक स्वीकारून ते पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची निर्विवाद सत्ता आली. त्यानंतर गोव्याने कधीच पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आपल्याला नेमके काय हवे, याची जाण नुकत्याच मुक्त झालेल्या राज्याने दाखवावी हे अभूतपूर्व होते. बांदोडकर यांनी घातलेल्या भक्कम पायावर नंतर राज्याने चौफेर प्रगती केली. 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.
भाऊसाहेब बांदोडकर यांना मुक्त गोव्याचे शिल्पकार म्हटले जाते; तर 2000 मध्ये सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आधुनिक गोव्याचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांच्या सुरुवातीच्या चार वर्षांच्या कार्यकाळात गोव्याने वेगवान कारभाराचा अनुभव घेतला. दरम्यानच्या काळातील अनेक मुख्यमंत्र्यांनीही आपापल्या परीने राज्याच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे. मुक्तीनंतरच्या काही दशकांत गोव्याने सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जे परिवर्तन घडवले, ते आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरते. सामाजिक क्षेत्रात गोव्याने मानवी विकासाच्या निर्देशांकामध्ये सातत्याने आघाडी घेतली आहे. साक्षरतेचे प्रमाण, विशेषतः महिला साक्षरता, राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. आरोग्यसेवांच्या बाबतीतही गोव्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, खासगी वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य विमा योजनांमुळे आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात गोवा यशस्वी ठरला आहे. सामाजिक सलोखा, धार्मिक सहअस्तित्व आणि सांस्कृतिक सहिष्णुता हे गोव्याच्या समाजजीवनाचे वैशिष्ट्य राहिले आहे. आर्थिक क्षेत्रात गोव्याची वाटचाल तितकीच उल्लेखनीय आहे.
पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. गोव्याला आंतरराष्ट्रीय ओळख आहे. समुद्रकिनारे, ऐतिहासिक चर्च आणि मंदिरे, वारसास्थळे, संगीत-नृत्य परंपरा, उत्सव आणि खाद्यसंस्कृती या सार्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. मात्र, गोव्याने केवळ पर्यटनावर अवलंबून राहण्याऐवजी मत्स्योद्योग, शेती आणि सेवा क्षेत्र यांना चालना दिली. पर्यावरणीय संवेदनशीलतेची जाणीव ठेवत लघुउद्योग, औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात आली. माहिती-तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राच्या वाढीमुळे गोवा केवळ पर्यटनापुरता मर्यादित न राहता ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेले स्वातंत्र्य गोव्याने केवळ जपले नाही, तर त्याचा अर्थपूर्ण वापर करून त्याचे रूपांतर प्रगतीच्या उत्सवात केले आहे.