गोवा डायरी 
संपादकीय

गोवा डायरी : छोट्या पक्षांची ‘निर्णायक’ ताकद

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने गोव्यातील स्थानिक पक्ष हे ‘इतर’ म्हणून गणले जातात. मात्र, त्यांचा प्रभाव एवढा असतो की, ती सर्व राजकीय गणिते उलटी पालटी करू शकतात.

दिल्लीच्या स्टुडिओत देशाचा नकाशा रंगवताना गोव्याच्या वाट्याला नेहमी ‘इतर’ नावाची एक सोयीस्कर पळवाट येते. भाजप, काँग्रेस आणि अलीकडे आम आदमी पार्टी एवढीच राजकीय पक्षांची नावे राष्ट्रीय चर्चेत घेतली जातात. उरलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स हे ‘इतर’मध्ये ढकलले जातात. पण गोव्यात राहणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की, हेच ‘इतर’ पक्ष इथला निकाल ठरवतात. निवडणुका तीन महिन्यांवर आल्या असताना त्यांना ‘इतर’ म्हणून वासलात लावणे ही मोठी चूक ठरू शकते. आज काँग्रेस-आरजी यांची औपचारिक युती झाली आहे. गोवा फॉरवर्ड प्रतीक्षेत आहे आणि भाजप-मगो सरकार सत्तेत असूनही जागावाटपावरून ठिणग्या उडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांचे महत्त्व समजून घ्यावे लागेल.

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने कमी वेळात मोठी पकड बसवली आहे. त्याची जमेची बाजू म्हणजे थेट भूमिपुत्रवादाचा मुद्दा. नोकऱ्या, जमीन, पोगो बिल आणि परप्रांतीयांच्या लोंढ्याविरोधातील त्यांची आक्रमक भूमिका तरुणांना भावते. सोशल मीडियावरील त्यांची ताकद गोव्यातील इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त आहे. सांत आंद्रे, मये, शिवोली, मांद्रे या मतदारसंघांत त्यांचा लक्षणीय प्रभाव आहे. पण पक्षातील फुटीचा परिणाम संघटनात्मक विस्तारावर झाला आहे. वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे काँग्रेसची युती आहे. ते विधिमंडळ पक्षप्रमुखही आहेत. पण त्यांच्या अस्तित्वालाच दुसऱ्या अधिक प्रबळ गटाने आव्हान दिले आहे. हा दुसरा गट जमिनीवर सक्रिय आहे आणि तो पक्षाचे नुकसान करू शकतो. बोरकर गटाने सोळा जागांची मागणी केली आहे. त्यांना योग्य जागा मिळाल्या नाहीत तर ते काँग्रेसचे नुकसान करू शकतात.

दुसरा पक्ष म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष. हा गोव्यातील सगळ्यात जुना प्रादेशिक पक्ष आहे. त्याची जमेची बाजू म्हणजे त्याचा पारंपरिक बहुजन आणि मराठी भाषिक मतदार. फोंडा, पेडणे, डिचोली, प्रियोळ या भागात आजही मगोला मानणारा निष्ठावंत वर्ग आहे. सत्तेच्या राजकारणात किंगमेकर म्हणून राहण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्याची कमकुवत बाजू म्हणजे नेतृत्वाचा एकच चेहरा आणि नव्या पिढीशी तुटलेली नाळ. सुदिन ढवळीकर यांच्यावरच पक्ष अवलंबून आहे. त्यांनी सात जागांवर दावा सांगितला आहे. पण भाजप त्यांना किती जागा देऊ करतो हे पाहावे लागेल. पण युती तुटल्यास जवळपास १५ मतदारसंघांत तो आपले उपद्रवमूल्य दाखवू शकतो.

तिसरा पक्ष गोवा फॉरवर्ड. विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाची जमेची बाजू म्हणजे गोमंतकीय अस्मितेचा स्पष्ट अजेंडा आणि अभ्यासू, आक्रमक नेतृत्व. जमीन, पर्यावरण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. फातोर्डा आणि सासष्टीतील काही भागात त्यांची पकड घट्ट आहे आणि २०१७ मध्ये त्यांनी किंगमेकर होऊन आपले वजन सिद्ध केले आहे. त्याची कमकुवत बाजू म्हणजे भौगोलिक मर्यादा. ते प्रामुख्याने सासष्टीपुरतेच मर्यादित राहिले. दुसरे म्हणजे सत्तेसाठी तडजोड करणारा पक्ष असा शिक्का त्यांच्यावर बसला आहे.

या तिन्ही पक्षांना ‘इतर’ म्हणण्यात धोका काय आहे? गोव्यात बहुमत २१ जागांचे आहे आणि इथे निवडणूक हजार बाराशे मतांनी फिरते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये मगो, गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांनी प्रत्येकी १ ते ३ जागा जिंकल्या असल्या तरी १५ ते २० मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ३ ते ५ हजार मते घेतली आहेत. ही मते भाजप आणि काँग्रेसचीच होती. म्हणजे हे पक्ष जिंकले नाहीत तरी निकालावर प्रभाव टाकतात. त्यांना ‘इतर’ म्हटले की. हे गणितच समजत नाही. म्हणूनच काँग्रेस-आरजी युती असो वा भाजप-मगो युतीतील धुसफूस असो, या तिन्ही पक्षांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आकाराने छोटे असले तरी हे गोव्याच्या राजकारणाचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यांना ‘इतर’मध्ये ढकलणे सोपे आहे, पण निकाल अनपेक्षित लागला तर तो याच ‘इतर’मुळे लागतो हे लक्षात घ्यावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT