मयुरेश वाटवे
पार्टी विथ डिफरन्स म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही गोव्यात बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. उपरे विरुद्ध निष्ठावंत असा हा वाद रंगवण्यात येत असला, तरी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा हा घटकही आहे. भाजप यावर कसा मार्ग काढतो, हे पाहावे लागेल.
गोव्यात निवडणुका जवळ येत आहेत तशी भाजपातही विविध मतदारसंघात बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीत केवळ भाजपातच बंडखोरी होणार असे दिसते. कारण, इतर पक्षांकडे एखाददुसऱ्या मतदारसंघातील अपवाद वगळता बंडखोरी करायला उमेदवारच नाहीत. भाजप नेते, कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ असतात; पण आता पक्षाचे व्यावसायिकीकरण झालेले असल्यामुळे निष्ठेला फारशी किंमत राहिलेली नाही. अनेक नेते आपल्याला नाही तर आपल्या पत्नीला, मुलाला, मुलीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत आहेत; पण पक्षासाठी केवळ त्यांनीच खस्ता खाल्लेल्या असतात असे नाही. इतर अनेक कार्यकर्त्यांचेही पक्षवाढीत मोठे योगदान आहे; मात्र दुर्दैवाने त्यांचा विचार कधी होतच नाही. नेत्यांना आपल्या कुटुंबापलीकडे कुणी दिसत नाही. सध्याची बंडखोरी ही खरे तर राजेशाही मानसिकतेतूनच होत आहे; मात्र पक्षाने २०२२ मध्ये पक्षात घेतलेल्या फुटिरांना उमेदवारी देऊन पक्षनिष्ठांना डावलू नये अशी सार्वत्रिक भावना आहे. पक्षातच नव्हे तर लोकांचीही ती भावना आहे.
भाजपातील जुने नेते, मंत्रिपद भूषवलेले नेते आपल्याला उमेदवारी मिळत नाही म्हणून नाराज आहेत. अलीकडेच माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी ओबीसी वित्त महामंडळाचा राजीनामा दिला. पक्षातून छळ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. साळगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप परुळेकरही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मांद्रे मतदारसंघात अलीकडेच भाजपात फेरप्रवेश केलेले लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार दयानंद सोपटे हे इच्छुक आहेत. सध्या या मतदारसंघात मगो पक्षाचा आमदार आहे; पण भाजप-मगो युती न झाल्यास मगोचे आमदार जीत आरोलकर यांनाच भाजपात आणून उमेदवारी द्यायचा एक विचार सुरू आहे.
उत्पल पर्रीकर पणजीसाठी इच्छुक आहेत; मात्र महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना डावलून त्यांना उमेदवारी मिळणे कठीण आहे. सावर्डेतून माजी मंत्री विनय तेंडुलकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत; मात्र त्यांनी अद्याप बंडखोरीची भाषा केलेली नाही. कुडचडे मतदारसंघात आमदार नीलेश काब्राल यांना उमेदवारी डावलली जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तेही बंडखोरी करतील, हे निश्चित आहे. पेडणे मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हेही आपल्याला भाजपची उमेदवारी मिळावी या प्रयत्नात आहेत. सध्या अनेक बंडखोर गोवा फॉरवर्डच्या संपर्कात आहेत.
काँग्रेसने फुटिरांना उमेदवारी देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे; पण काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती झाल्यास तो नियम मित्रपक्षांनाही लागू होणार का, हा कळीचा मुद्दा आहे. उद्या ते निवडून आले आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आले, तर शेवटी ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार आहेत.
मांद्रे, पेडणे, शिवोली, साळगाव, सावर्डे, कुडचडे, कुंभारजुवे, दाबोळी, पणजी, म्हापसा अशा जवळपास दहा मतदारसंघांत भाजपात उघडपणे बंडखोरी दिसते आहे. इतर मतदारसंघांत सुप्तपणे असू शकते. भाजपसाठी हा चिंतेचा विषय आहे. गोवा फॉरवर्डकडे तसे फार उमेदवार नाहीत. फातोर्ड्यात विजय सरदेसाई, मांद्रे मतदारसंघात दीपक कळंगुटकर. बाकी मतदारसंघांत त्यांची भिस्त भाजपच्या नाराज नेत्यांवरच आहे. दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर यांच्याकडे स्वत:ची हक्काची वोट बँक आहे. २०२२ मध्ये बंडखोरी करून लक्ष्मीकांत पार्सेकर फसले. त्यांनी भाजप उमेदवाराचा पाडाव केला एवढाच काय तो लाभ. जे नवीन बंडखोर निर्माण झाले आहेत ते निवडून येतीलच असे नाही; मात्र पक्षाच्या उमेदवाराला दगाफटका करू शकण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
विधानसभा निवडणुकीला तीन महिने शिल्लक आहेत. दोन महिन्यांनंतर आचारसंहिता लागू होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या रकमेत ५०० रुपयांनी वाढ केली आहे. अप्रेंटिस योजनेतील विद्यावेतन वाढवले आहे, उज्ज्वला योजनेची वर्षाची रक्कम खात्यात जमा होत आहे. याचा लाभ भाजपला नक्कीच मिळणार आहे. माझा फ्लॅट योजनेत जवळपास ५० हजार लाभार्थी असणार आहेत; पण बंडखोरीचे ग्रहण भाजपला अडचणीत आणू शकते.