तानाजी खोत
जगभरातील टेक उद्योगात खळबळ माजवणारी एक महत्त्वपूर्ण घटना नुकतीच घडली. ती म्हणजे, अमेझॉन कंपनीतील 1000 हून अधिक कर्मचार्यांनी कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांना लिहिलेले खुले पत्र. हे पत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अतिवेगाने, कोणत्याही किमतीवर होत असलेल्या विकासावर गंभीर चिंता व्यक्त करत आहे. या पत्रात प्रामुख्याने नोकरीची असुरक्षितता, पर्यावरणाचा र्हास आणि लोकशाहीला एआयमुळे असलेला धोका या तीन प्रमुख मुद्द्यांवर कंपनीने तातडीने नैतिक मार्गदर्शक तत्त्वे आणावीत, अशी मागणी केली आहे.
टेक उद्योगातील कर्मचार्यांनी कंपनीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची ही जगातील पहिलीच वेळ नसली, तरी या पत्राचे महत्त्व वेगळे आहे. कारण, यात केवळ एका धोरणावर नव्हे, तर एआय या मूलभूत आणि सर्वव्यापी तंत्रज्ञानाच्या संपूर्ण विकासाच्या मॉडेलवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या पत्राला इतर कपन्यांमधून मिळालेला व्यापक पाठिंबा हे दर्शवतो की, ही चिंता केवळ अमेझॉनपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण टेक उद्योगाला तसेच आधुनिक मानवी समाजालाच भेडसावणारी चिंता आहे. या पत्राचा मुख्य उद्देश केवळ कंपनीच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणे नाही, तर एआय युगातील समाजासमोर उभ्या राहिलेल्या अत्यंत गंभीर आणि दूरगामी समस्यांकडे जगाचे लक्ष वेधणे हा आहे.
सध्या जगभरातील सरकारे आणि नियमन संस्था एआय नियमनावर विचार करत असताना हे पत्र सार्वजनिक करणे, हा अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. कर्मचार्यांनी एआयच्या चर्चेत नैतिक आणि कामगार हक्कांच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी आणले आहे. त्यांनी एआयच्या विकासाला सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या चौकटीत बसवण्यासाठी धोरणात्मक दबाव निर्माण केला आहे. पत्रावर 1000 हून अधिक अमेझॉन कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या असून इतर बड्या टेक कंपन्यांतील 2,400 हून अधिक कामगारांचा सक्रिय पाठिंबा आहे. हे आकडे केवळ कर्मचार्यांचा असंतोष दाखवत नाही, तर या मोहिमेला एक संघटित आणि वाढणारी आंतरकंपनी नैतिक चळवळ बनवतात. या मजबूत संख्याबळामुळे आणि व्यापक चर्चेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्यवस्थापनाला आणि संचालक मंडळाला या मागणीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.
एआयमुळे निर्माण होणारे रोजगाराचे संकट ही पत्रातील प्रमुख चिंता आहे. एआयमुळे अनेक कामे स्वयंचलित होत आहेत आणि उत्पादकतेच्या नावाखाली मानवी श्रमाचे मूल्य कमी केले जात आहे. पर्यावरणाचा ताण, एआय मॉडेल्ससाठी लागणारी प्रचंड ऊर्जा आणि डेटा सेंटर्समुळे कार्बन उत्सर्जन वाढत आहे, जे हवामान बदल अधिक तीव्र करत आहे. तसेच, एआयचा गैरवापर पाळत ठेवणे आणि लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी होऊ शकतो. अशा चिंता या पत्रात व्यक्त केल्या आहेत. हे पत्र म्हणजे, एआयच्या ‘अनिर्बंध’ विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी, नैतिक नियम आणि मानवी मूल्ये हीच अंतिम मार्गदर्शक तत्त्वे असावीत, या मागणीचा जागतिक उद्घोष आहे. तंत्रज्ञान निर्मात्यांनी नैतिक चिंता विचारात घेण्याची गरज ते अधोरेखित करते. कंपनीच्या निर्णयांना सामाजिक न्यायाच्या कसोटीवर तपासण्याच्या महत्त्वाच्या चर्चेला तोंंड फोडणारे आहे.