Bodhisattva Padmapani | ‘बोधिसत्व पद्मपाणि’ कलाकृतींचा जागतिक प्रवास! 
संपादकीय

Bodhisattva Padmapani | ‘बोधिसत्व पद्मपाणि’ कलाकृतींचा जागतिक प्रवास!

पुढारी वृत्तसेवा

डॉ. राहुल रनाळकर, नाशिक

जपानमधील एक्स्पो 2025 मध्ये ‘भारत पॅव्हेलियन’ आकर्षणाचे केंद्र ठरले होते. ‘भारत पॅव्हेलियन’ व जगात पहिल्यांदा रिस्टोर होऊन प्रदर्शित होणार्‍या ‘बोधिसत्व पद्मपाणि’ या कलाकृतीला जगभरातील 2 कोटी 90 लाख 17,924 प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्याची वर्षपूर्ती तसेच शनिवार, 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन जगभर साजरा होतो त्यानिमित्त विशेष लेख...

ओसाका, जपान येथे आयोजित एक्स्पो 2025 या जागतिक प्रदर्शनात भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा ठरलेल्या ‘भारत पॅव्हेलियन’ने जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली. त्या स्मृती आजही जगातील संवेदनशील मनांत कोरल्या गेलेल्या आहेत. नाशिक येथील रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट प्रसाद पवार यांच्या ‘बोधिसत्व पद्मपाणि’ या अजिंठा लेणीतील चित्राला तब्बल 2 कोटी 90 लाख 17,924 लोकांनी भेट देत जागतिक विक्रम नोंदवला. भारतीय कला, संस्कृती आणि अध्यात्माचा संगम घडवणार्‍या या सादरीकरणाने जागतिकस्तरावर भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अधिक द़ृढ केली आहे.

एक्स्पो 2025 हे एक जागतिक प्रदर्शन ओसाका, जपान येथे आयोजित करण्यात आले होते. आपल्या जीवनासाठी भविष्यातील समाजाची रचना करणे ही या प्रदर्शनाची मुख्य थीम होती. ओसाका येथील युमेशिमा बेटावर 155 हेक्टर (383 एकर) क्षेत्रावर हे भव्य स्थळ उभारण्यात आले होते. प्रदर्शनातील ‘ग्रँड रिंग’ची रचना जपानी आर्किटेक्टस्नी केली होती.

जपानचे पंतप्रधान इशिबा शिगेरू यांनी जगाला या प्रदर्शनासाठी निमंत्रित करताना कोरोनानंतरच्या काळातील जागतिक विभाजनावर भाष्य केले. त्यांनी नमूद केले की, जगाने कोरोनाच्या कठीण परिस्थितीवर मात केली असली, तरी आता विविध प्रकारच्या विभाजनाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशावेळी जगभरातील लोकांनी ‘जीवन’ या विषयावर एकत्र येऊन चर्चा करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध विचारसरणी आणि संस्कृतींशी संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला बुद्ध दिला हा संदेश जागतिकस्तरावर वारंवार दिला आहे. त्याच विचारांतून ‘भारत पॅव्हेलियन’मध्ये बोधिसत्व पद्मपाणि यांना शांतिदूत म्हणून केंद्रस्थानी स्थान देण्यात आले होते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रत्यय या सादरीकरणातून येत होता. भारताच्या नव्या संसदेत भारतीय संस्कृती-परंपरेची साक्ष देणार्‍या कलाकृतींची संकल्पना मांडणारे आणि जी-20 परिषदेच्या सांस्कृतिक मांडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘आयजीएनसीए’चे प्रमुख डॉ. सच्चिदानंद जोशी यांच्या संकल्पनेतून ‘पद्मपाणि’ थीमवर भारत पॅव्हेलियन साकारण्यात आले. त्यांच्या नियोजनामुळे ही कलाकृती ‘शो स्टॉपर’ ठरली.

प्रसाद पवार यांच्या 35 वर्षांच्या अखंड संशोधन, डॉक्युमेंटेशन आणि रिस्टोरेशन कार्यातून अजिंठा येथील 2,000 वर्षांपूर्वीच्या जातक कथांचे प्रथमच जागतिकस्तरावर सादरीकरण करण्यात आले. अंधार्‍या लेण्यांतील हा ठेवा प्रथमच जगासाठी प्रकाशात आणण्यात आला. अजिंठ्यातील ज्या चित्रांकडे अगदी जवळून पाहता येत नाही, ती चित्रे येथे अत्यंत जवळून अनुभवता आली. ‘भारत पॅव्हेलियन’मध्ये 5,32,800 स्क्वेअर इंच क्षेत्रफळातील भव्य प्रिंटस् मूळ रंगछटांसह प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच, बोधिसत्व पद्मपाणि, बोधिसत्व वज्रपाणी आणि अप्सरा या चित्रांचे 9,000 स्क्वेअर इंच आकारातील रिस्टोर केलेले स्वरूप प्रथमच सादर करण्यात आले. या चित्रांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याचे नियोजन होते. या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीतील सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान, कला, समाजव्यवस्था, वास्तुरचना, व्यापार आणि जीवनशैली यांची प्रगल्भता अधोरेखित झाली. नष्ट होत असलेल्या चित्रांचे पुनर्निर्माण करण्यासाठी कला, बौद्धिक संपदा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला.

व्हिज्युअल लँग्वेजचे महत्त्व अधोरेखित करताना असे दिसून आले की, संवादाचे हे प्रभावी माध्यम हजारो वर्षांपूर्वी अजिंठा लेण्यांमध्येच चित्रित झाले होते. आजच्या अ‍ॅनिमेशन तंत्राची मुळेही याच परंपरेत असल्याचे स्पष्ट झाले. अजिंठा चित्रकलेचा सखोल अभ्यास व्हावा, यासाठी विशेष मांडणी करण्यात आली होती. चैत्य आणि विहार यांची स्वतंत्र रचना, रेखाचित्रांद्वारे स्पष्टीकरण, क्यूआर कोडच्या माध्यमातून माहिती तसेच 2,000 स्क्वेअर फुटांपेक्षा मोठ्या भिंतीवरील चित्रे आणि 1,000 फुटांचे छतावरील चित्र ही प्रमुख आकर्षणे ठरली. 160 देशांच्या सहभागासह आयोजित या प्रदर्शनात तंत्रज्ञान, पर्यावरण, संस्कृती, पर्यटन, मानवी भावना आणि जागतिक वारसा या विषयांचा समावेश होता. 13 एप्रिल ते 13 ऑक्टोबर 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत हे प्रदर्शन पार पडले. या काळात ‘भारत पॅव्हेलियन’ हे सर्वाधिक आकर्षण ठरलेल्या पहिल्या तीन पॅव्हेलियनपैकी एक ठरले.

स्कॉड्रन लीडर अंकुर नाईक (प्रेसिडेंट, प्रसाद पवार फाऊंडेशन) यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून जगभरात टिकून आहे आणि अजिंठा येथील जातक कथा पुन्हा जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. आजही जगभरामध्ये भारतीय संस्कृतीचे आकर्षण आहे. चित्रकार प्रसाद पवार यांनी नमूद केले की, जपानमधून बुद्धांच्या वैश्विक तत्त्वज्ञानाचा प्रसार होत असून, अजिंठा चित्रांचा अंधारातून प्रकाशाकडे प्रवास सुरू झाला आहे. जगाला युद्धापासून दूर नेऊन शांती आणि अहिंसेच्या मार्गाकडे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

फाऊंडेशनचे संचालक रमेश साळवे यांनी ज्ञात-अज्ञात कलाकारांचे आभार मानत अजिंठा संशोधन आणि संवर्धनाचा दीप कायम तेवत ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, जगातील 100 कोटी लोकांपर्यंत अजिंठा पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. एकूणच, एक्स्पो 2025 मधील ‘भारत पॅव्हेलियन’ने भारतीय संस्कृतीचा जागतिक ठसा उमटवत कला, तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम सादर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT