परंपरेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला गीताजयंती साजरी होते. या एकादशीला ‘मोक्षदा’ हे समर्पक नाव आहे. श्रीमद् भगवद्गीतेतील ज्ञान हे मोक्ष मिळवण्यासाठी पुरेसे आहे. आज गीताजयंती त्यानिमित्त...
सचिन बनछोडे
भारतीय अध्यात्म परंपरेतील प्रस्थानत्रयीमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. महाभारताच्या भीष्मपर्वात सातशे श्लोकांमध्ये सामावलेली ही गीता उपनिषदांसारख्या श्रुतीप्रस्थानाइतकेच महत्त्व मिळवलेली आहे, हे विशेष! भगवान श्रीकृष्ण हे स्वतः या गीतोपदेशाचे वक्ते आहेत आणि त्यांनी म्हटले होते की, ‘गीता मे हृदयं पार्थ’. हजारो वर्षांपासून सर्व भक्तांच्या हृदयात असेच अढळ स्थान मिळवलेला हा गीता ग्रंथ आहे. स्वतः श्रीकृष्णांनी गीता सांगितल्यानंतर काही काळाने अर्जुनाला पुन्हा ‘अनुगीता’ सांगितली. त्यावेळी या श्रीमद् भगवद्गीतेचा गौरव करताना त्यांनी म्हटले, ‘स हि धर्मः सुपर्याप्तो ब्रह्मणः पदवेदने’ (ब्रह्मच्या परमपदाला म्हणजेच मोक्षाला प्राप्त करण्यासाठी गीतेत सांगितलेला ज्ञाननिष्ठारूप धर्मच पुरेसा किंवा सुसमर्थ आहे.) केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलही असंख्य लोकांकडून प्रशंसा मिळालेला हा अजोड ज्ञानग्रंथ आहे. गीता ही उपनिषदांचे सारच आहे.
उपनिषदांमधील ब्रह्मविद्या गीतेत सोप्या भाषेत सांगून ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. ‘ब्रह्म’ म्हणजे सर्वव्यापी परमचैतन्य. तेच प्रत्येकाच्या हृदयात आत्मस्वरूपात विलसत आहे. या आत्म्याचे व पर्यायाने परमात्म्याचे नेमके वर्णन गीतेत पाहायला मिळते.
प्रत्येकाचा मन, बुद्धी व देहापलीकडे असलेला शुद्ध ‘मी’ म्हणजेच आत्मा. स्वतःमधील चेतना, जिवंतपणाची जाणीव, ‘मी आहे’ असे जे नित्य भान असते तेच आत्मा आहे. या देहाला चालवणारा जो कुणी अंतर्यामी ‘मी’ स्वरूपाने स्फुरत आहे, तोच आत्मा. बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे की, ‘यत्साक्षादपरोक्षाद्ब्ह्मय आत्मा सर्वान्तरः’ (जो साक्षात अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे, जो सर्वांच्या हृदयात व्याप्त आहे, तो आत्माच ब्रह्म आहे.) अर्थात, हा आत्मा देहापेक्षा अलिप्त, साक्षी असतो. बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत शरीर बदलत गेले तरी हा ‘मी’ कधीही बदलत नाही, तोच आत्मा. गीतेत दुसर्या अध्यायात हेच सांगितले आहे, ‘देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा। तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति॥’ (कुमारवस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था देहाला येते; पण आत्म्यावर परिणाम होत नाही.) याच अध्यायात पुढे म्हटले आहे की, हा आत्मा कधी जन्माला येत नाही की मरतही नाही (तो चिरंतन अस्तित्वात असतो.). हा अजन्मा, नित्य, सनातन (ज्याला आदि-अंत नाही) आणि पुरातन आहे. शरीर मृत झाले, तरी तो मरत नाही. त्याला शस्त्राने कापता येत नाही, आगीने जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही की, वार्याने सुकवता येत नाही.
कारण, तो अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य आणि निःसंदेह अशोष्य आहे. तो नित्य, सर्वव्यापी, अचल, नेहमी स्थिर राहणारा आहे. तो अव्यक्त, अचिन्त्य आणि अविकारी आहे. तिसर्या अध्यायात म्हटले आहे की, स्थूल शरीरापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षाही सूक्ष्म असलेला आत्मा अधिक श्रेष्ठ आहे. पाचव्या अध्यायात म्हटले आहे की, ‘योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः। स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति॥’ याचा अर्थ, जो अन्तरात्म्यातच सुखी होतो, आत्म्यातच रममाण होतो, जो आत्म्यातच ज्ञानरूपी ज्योती पाहतो, तो याच देहात असताना सर्वव्यापी ब्रह्माशी एकरूप होतो, त्याला मोक्ष मिळतो. सहाव्या अध्यायात म्हटले आहे की, योगसाधनेने निरुद्ध केलेले, चंचलतारहीत चित्त ज्यावेळी उपरती पावते, त्यावेळी समाधीद्वारे शुद्ध अंतःकरणात परमचैतन्य, ज्योतिस्वरूप आत्म्याचा साक्षात्कार करून परमतृप्ती लाभते.
याच अध्यायात पुढे म्हटले आहे की, ‘सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि। ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः॥’ याचा अर्थ, समाहित अंतःकरण असलेला, सर्वत्र समद़ृष्टी ठेवलेला योगी आत्मा आणि परमात्म्याच्या ऐक्याच्या ज्ञानाने परिपूर्ण असतो. तो सर्व प्राणीमात्रांमध्ये भेदद़ृष्टीरहित होतो. सर्व भुतांमध्ये तो स्वतःलाच आणि स्वतःमध्ये सर्व भुतांना पाहतो. याचा अर्थ ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे, तो नैसर्गिकरित्याच सर्वत्र समदृष्टी ठेवतो, ऐक्य पाहतो. त्यामुळे आधी स्वतःचा खरा ‘मी’ म्हणजेच आत्मा ओळखणे गरजेचे आहे, हे गीतेतून स्पष्ट समजते. असे ऐक्याचे ज्ञान देणार्या या ग्रंथाला व हे ज्ञान ज्यांच्या मुखातून प्रकट झाले त्या भगवान श्रीकृष्णांना शतशः नमन!