पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे
गणेशोत्सवातील विघ्ननिवारणाचा अर्थ बाहेरून येणारी विघ्ने दूर होण्यापुरता नाही. काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, निर्णयदौर्बल्य आणि अस्थिरता ही खरी 'विघ्ने' आहेत. विद्यार्थ्यांसाठी गणेश बुद्धीचा, गृहस्थांसाठी विवेकाचा, उद्योजकांसाठी योग्य आरंभाचा आणि साधकांसाठी अंतर्मुखतेचा अधिपती ठरतो.
भारतीय धर्म परंपरेत श्रीगणेश हा मंगलकार्याच्या आरंभी स्मरण केले जाणारे आराध्य दैवत. बुद्धी, विवेक, प्रज्ञा, आरंभशक्ती आणि विघ्नांचे रूपांतर साधनेत करण्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा तो अधिष्ठाता आहे. गणपती अथर्वशीर्षातील 'त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि| त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥' हे वचन गणेशोपासनेचे तत्त्वज्ञान एका वाक्यात उलगडते. बाह्य मूर्तीच्या पलीकडे जाऊन त्या रूपामध्ये व्यापलेले चैतन्य, ज्ञान आणि विश्वात्मकता अनुभवणे ही या उपासनेची दिशा. पुढे 'त्वं गुणत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्’ असे म्हणत गणेशाला योगमार्गातील मूलाधाराधिष्ठित शक्तीशी जोडले आहे. म्हणून गणेशोत्सव हा केवळ सामाजिक उत्सव राहत नाही, तर अंतःकरणातील अव्यवस्था शमवून विवेकाची प्रतिष्ठापना करणारा तो संस्कार ठरतो.
गणेशाचे रूपही तितकेच अर्थगर्भ आहे. अथर्वशीर्षात 'एकदन्तं चतुर्हस्तं पाशमम्कुशधारिणम्| रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं मूषकध्वजम्’ असे ध्यान दिले आहे. 'शूर्पकर्ण' म्हणजे सुपासारखे विशाल कान. सार आणि असार यांची निवड करणाऱ्या विवेकाचे प्रतीक. 'लम्बोदर’ हे विश्वाला सामावून घेणाऱ्या व्यापकतेचे द्योतक, तर मूषक हा चंचल आणि सूक्ष्म मार्गांनी धावणाऱ्या मनोवृत्तीचा संकेत मानला जातो. पाश आसक्तीवर संयम शिकवतो, अंकुश अनियंत्रित प्रवृत्तींवर नियंत्रण दर्शवतो आणि वरदमुद्रा धर्मयुक्त इच्छांच्या पूर्तीची आशा जागवते. गणेशमूर्तीसमोर बसणे म्हणजे अशा अर्थाने स्वतःच्या मन, बुद्धी आणि वृत्तींच्या शोधनाचा संकल्प करणे होय.
भारतीय उपासना पद्धतीत पंचायतन संकल्पनेलाही महत्त्व आहे. शंकराचार्यप्रणीत स्मार्त परंपरेत गणेश, विष्णू, शिव, सूर्य आणि देवी या पाच देवतांच्या माध्यमातून विश्वातील मूलभूत शक्तींची एकात्मता अनुभवली जाते. अथर्वशीर्षातील 'त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः’ हे वचन तर गणेशाला पंचमहाभूतस्वरूप मानते. म्हणूनच गणेशोपासनेचा आशय एका देवतेपुरता मर्यादित राहत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या संपूर्ण विश्वव्यवस्थेला अधिष्ठान देणाऱ्या तत्त्वाचे पूजन म्हणून त्याचा विस्तार होतो. या दृष्टीने पार्थिव मूर्तीला विशेष अर्थ प्राप्त होतो. मातीला आकार द्यायचा, त्यात देवभाव प्रतिष्ठित करायचा आणि अखेरीस पुन्हा तिचे तत्त्वात विलयन करायचे. सृष्टी, स्थिती आणि लय यांचा हा प्रत्यक्ष अनुभव.
प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मूर्ती 'देव' बनते, असे सरधोपटपणे म्हणण्यापेक्षा मंत्र, न्यास, आवाहन आणि संकल्प यांच्या साहाय्याने उपासक त्या मूर्तीत आपल्या आराध्यदेवतेची सन्निधी स्वीकारतो, असे म्हणणे अधिक अचूक ठरेल. 'त्वमेव केवलं कर्ताऽसि| त्वमेव केवलं धर्ताऽसि| त्वमेव केवलं हर्ताऽसि’ या अथर्वशीर्ष वचनातून सृष्टीची उत्पत्ती, धारण आणि लय या तिन्ही शक्ती गणेशतत्त्वात एकवटलेल्या आहेत, असा भाव व्यक्त होतो. प्रतिष्ठापनेच्या क्षणी म्हणूनच बाह्य विधीइतकीच अंतःकरणातील श्रद्धा शुचिता, एकाग्रता आवश्यक ठरते.
यंदाचा महत्त्वाचा पूजनकाल
श्रीगणेशाची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सूर्योदयापासून दुपारी १.४५ पर्यंत केव्हाही करता येईल. तथापि, गणेशच तुर्थीचे विशेष पूजन मध्यान्हकाली सकाळी ११.१५ ते दुपारी १.४५ या काळात करणे विशेष शास्त्रसंमत ठरेल. प्राणप्रतिष्ठेचा उपलब्ध काल आणि मुख्य चतुर्थीपूजेचा कर्मकाल हे दोन स्वतंत्र विषय आहेत.
यंदा हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी असल्याने ’आधी कोणते पूजन’ असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात या दोन्ही स्वतंत्र व्रतकर्मांचा अनिवार्य पूर्वापरक्रम शास्त्राने सांगितलेला नाही. हरतालिका विधीत 'तत्र प्रातः उमामहेश्वरमूर्तिं पीठे संस्थाप्य पूजयेत्’ असे स्पष्टपणे 'प्रातः' पूजन सांगितले आहे, तर गणेश व्रताचा मुख्य कर्मकाल मध्यान्ह आहे. म्हणून व्यवहारात सूर्योदयानंतर प्रातःकाळातील साधारण दोन तासांत हरतालिका पूजन करावे आणि त्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठा करावी, ही सुबोध व्यवस्था आहे. परिस्थितीनुसार गणेशप्रतिष्ठा आधी झाली, तरी हरतालिकाव्रताचा भंग होत नाही.
पूजेत आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, नमस्कार इत्यादी उपचारांनी देवतेचे सन्मानपूर्वक पूजन केले जाते. गणेशासाठी लाल पुष्प विशेषतः जास्वंद, तसेच दुर्वांना विशेष स्थान आहे. तुळस गणेशपूजेत सामान्यतः वर्ज्य मानली जाते. अथर्वशीर्षातील 'यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति' हे वचन दुर्वार्पणाचे महत्त्व अधोरेखित करते. परंपरेने २१ दुर्वांकुर अर्पण केले जातात. २१ ही संख्या गणेशोपासनेतील पूर्णत्वाची संख्या मानली जाते. दुर्वांची हिरवी, शीतल आणि पुनरुत्पादक वृत्ती साधकाला सहनशीलता, सातत्य आणि जीवनशक्तीचा संदेश देते.
गणेशपूजेत उपचारांची संख्या हे भक्तीचे मोजमाप नसले, तरी विधीची रचना अत्यंत विचारपूर्वक झालेली आहे. आवाहन म्हणजे मनाला देवाभिमुख करणे. आसन म्हणजे चित्ताला स्थैर्य देणे. स्नान आणि वस्त्रशुचितेचे, गंध-पुष्प सौंदर्य व सद्गुणांचे, दीप ज्ञानाचे आणि नैवेद्य कृतज्ञतेचे प्रतीक आहेत. षोडशोपचार पूजा म्हणूनच यांत्रिक न होता अर्थबोधपूर्वक झाली पाहिजे. पूजेच्या शेवटी प्रदक्षिणा, नमस्कार, आरती आणि मंत्रपुष्पांजली करताना 'मी'पणाचा आग्रह कमी करून सर्व कर्म ईश्वरार्पण करण्याची वृत्ती जागवणे हेच तिचे अंतरंग. गणेशोत्सवाच्या दिवशी गणपत्यथर्वशीर्ष, गणेशस्तोत्रे अथवा नामावलीचे पठण करणे ही या उपासनेची सहज आणि शास्त्रानुकूल वृद्धी ठरते.
गणेशोत्सवातील विघ्ननिवारणाचा अर्थ बाहेरून येणारी विघ्ने दूर होण्यापुरता नाही. काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, निर्णयदौर्बल्य आणि अस्थिरता ही खरी 'विघ्ने' आहेत. म्हणून अथर्वशीर्ष 'सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति' असे सांगते. गणेशाला प्रसन्न करणे म्हणजे बाह्य जग आपल्या इच्छेप्रमाणे घडावे अशी अपेक्षा नसून प्रसंग कोणताही असो, त्यात योग्य निर्णय घेणारी बुद्धी जागृत व्हावी, अशी ती प्रार्थना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणेश बुद्धीचा, गृहस्थांसाठी विवेकाचा, उद्योजकांसाठी योग्य आरंभाचा आणि साधकांसाठी अंतर्मुखतेचा अधिपती ठरतो.
पार्थिव गणेशमूर्तीचे विसर्जन हे त्यामागील तत्त्वज्ञानाची परिपूर्णता आहे. मातीपासून आलेले रूप काही दिवस भक्तिभावाने पूजले जाते आणि पुन्हा जलतत्त्वात विलीन होते. देवत्व नष्ट होत नाही. उपासनेचे साकार रूप निरोप घेते आणि त्यामागील तत्त्व अंतःकरणात राहते. विसर्जन म्हणूनच श्रद्धेने, पर्यावरणपूरक रीतीने आणि शक्यतो शुद्ध जलात करावे. गणेशोत्सवाचा अंतिम संदेश याहून वेगळा नाही. गणपतीला घरात प्रतिष्ठापित करण्यापेक्षा गणेशतत्त्वाला बुद्धीत प्रतिष्ठापित करणे श्रेष्ठ. विशाल कानांनी सद्विचार ऐकणे, शूर्पकर्णासारख्या विवेकाने सार-असार वेगळे करणे, पाशाने आसक्ती आवरणे, अंकुशाने प्रवृत्ती नियंत्रित करणे, दुर्वांसारखे पुन्हा उभे राहणे, नैवेद्याने कृतज्ञता शिकणे आणि विसर्जनातून अनित्यता स्वीकारणे हीच श्रीगणेशोपासनेची खरी फलश्रुती. अशी उपासना झाली, तर गणेशोत्सव हा संपूर्ण जीवनाला दिशा देणारा आध्यात्मिक संस्कार ठरतो.