शिर्डीत संरक्षण संकुल आणि तोफगोळे उत्पादन प्रकल्पाचे म्हणजेच डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन शनिवारी झाले, तेव्हा गणेश निबे या नावाची देशभरात चर्चा झाली. आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात उतरवून ग्रामीण भागात संरक्षण उत्पादन प्रकल्प साकारणारे अहिल्यानगरचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या कार्यकर्तृत्वाने देशाचीच मान अभिमानाने उंचावली असणार. निबे हे उद्योजक असून, निबे लिमिटेड या संरक्षण आणि अंतराळ उत्पादन कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
ग्रामीण भागात जन्म आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या गणेश यांनी व्यवसायाची सुरुवात उसाचा रस आणि इंधनाचे तेल विकण्यापासून केली होती. तिथेच खरे तर त्यांच्या भविष्यातील औद्योगिक वाटचालीचा पाया रचला गेला होता. पुण्यात निबे लिमिटेड या कंपनीची स्थापना त्यांनी केली. धोरणात्मक नियोजन आणि व्यवसाय वृद्धी यात हातखंडा असलेल्या निबे यांनी या व्यवसायाची रचना देशासाठी काहीतरी भरीव योगदान देणारी कंपनी अशी केली.
भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक उत्पादनांचे महत्त्व त्यांनी ओळखले आणि 2021 मध्ये त्यांनी आपले मुख्य लक्ष अवजड संरक्षण घटकांच्या निर्मितीकडे वळविले. पुढे भारतीय सशस्त्र दलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा संरक्षण प्रणाली, तोफगोळे आणि क्षेपणास्त्र संकुलांचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून त्यांच्या कंपनीचा नावलौकिक झाला. ही कंपनी 2025 मध्ये मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध झाली.
निबे ग्रुपने ‘निबे स्पेस’ या उपविभागाच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रातही विस्तार केला. याद्वारे धोरणात्मक संरक्षणासाठी उपयुक्त ठरू शकणार्या आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहांवर कंपनी लक्ष केंद्रित करते. जीआरएन इन्फ्रास्ट्रक्चर आणि निबे डिफेन्स अँड एररोस्पेस यांसारख्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये गणेश निबे संचालक आणि प्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय संरक्षण क्षेत्रात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा सहभाग वाढविण्यासाठी ते सक्रियपणे प्रयत्नशील असतात. विविध औद्योगिक कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांचा सहभाग असतो. भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनीही ‘निबे लिमिटेड’च्या उत्पादन प्रकल्पांना भेट देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
शिर्डी येथे शनिवारी डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन करताना म्हणूनच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निबे यांचे विशेष कौतुक केले. अगदी 365 दिवस सलग युद्धस्थिती उद्भवली, तरी सैन्याला सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खंड पडू न देता पुरविण्याची क्षमता या डिफेन्स क्लस्टरने निर्माण केल्याचे गौरवोद्गार दोन्ही नेत्यांनी काढले. इतकेच नाही, तर याच डिफेन्स क्लस्टरमुळे भारत भविष्यात सर्वांत मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश होईल, हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यातच ‘निबे लिमिटेड’ची कार्यक्षमता आणि गणेश निबे यांची दूरद़ृष्टी स्पष्ट होते. निबे यांच्यासारखे उद्योजक सर्वच क्षेत्रांतून पुढे आले, तर भारताचे शतप्रतिशत आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही आणि संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही.
दीपक रोकडे, अहिल्यानगर