उधमजी : मंत्री महोदय आमच्या आलिशान बंगल्याची शोभा मातिमोल ठरत चालली आहे. एकेक पक्षी पिंजर्यातून उडून जावेत त्याप्रमाणे नेते गट बदलून दुसर्या पक्षात शिरत आहेत.
मंत्री (दानवे) : जाऊदेत ज्यांना जायचयं ते जाऊदेत, पडूदेत, मरुदेत, वाट्टेल ते करुदेत, जे काय व्हायचंय ते होऊदेत. उडणारे पक्षीबक्षी, रडणाराहेत ओक्साबोक्शी...
उधमजी : यमक काय जुळवताय? पक्षाची काळजी घ्या. यमक जुळवण्यात डोके खूप चालते तुमचं आठवल्यांप्रमाणे. (उधमजी वार्याच्या दिशेने येरझार्या घालत).
मंत्री : साहेब उकडतंय का तुम्हाला? वारा घालणेस दास-दासी नियुक्त करूया खास उन्हाळा संपेपर्यंत.
उधमजी : वारा येतो आमच्याकडे. आम्ही वार्यासाठी का तरसावं? मोकळ्या व्हरांड्यात वाराही मोकळाच असतो ना? आत आहेत की एसी.
मंत्री : हो. विसरलोच. ते झुरळ आलं पाहा पायात. हुसकावू का? पाय पडेल त्यावर तुमचा.
उधमजी : मी झुरळाला पायाशी आणायचं म्हणतोय. तुम्ही त्याला घालवता कसले. अहो, जेन झींची मीटिंग बसवा मातोश्रीवर. आदू बाळ हाताळेल. बघेल काय तरी तो!
मंत्री : आदू बाळ रॅप साँगवर नाचताहेत आतमध्ये. बोलवू का?
उधमजी : अरे, हा जेन झी किडा आदूला कसा नाही सापडला आधी मग. तिकडे आमचे पक्षी आमदारकी मिळवून आमच्यावर प्रहार करताहेत. घात झाला आमचा आणि आमचा बाळ रॅपमध्ये गुंग? शेम ऑन हिम!
मंत्री : ते म्हणताहेत, ‘अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे, जे काही घडतंय ते घडूदे, मला नाही शिकवायचं!’
उधमजी : हे त्याचं आवडीचं रॅप साँग आहे. मला माहिती आहे. तुम्ही पण हे का गात होता मघाशी?
मंत्री : कानावर पडलं ते गायलं. वातावरण जरा कडू झाले बच्चू साहेबांच्या बातमीने म्हणून हलकंफुलकं गायलं. एवढंच!
उधमजी : आम्ही घरी बोलावून त्याला मंत्री केले हीच आमची चूक आम्हाला नडली. असो, शेवटी आमचेच सैनिक आहेत ते. आम्हाला जे बाळकडू मिळालं ते कडूनं पळवलं.
आदू बाळ (कानाला हेड फोन लावून बाहेर येतो) : पॉप्स, मग जे घडले ते घडूदे, हसणार्यांना हसूदे, असूदे. सगळं एकदम ओके. (उधमजी कोमात)