राजकारणातले हेवेदावे आणि तंटे यांचा प्रचंड चिखल तुडवत महामहीम बंगमध्ये प्रवेशतात. तमाम कमळधारींवर अभिनंदनाचा वर्षाव करत, महामहीम कमळाप्रमाणे खुलत भाषण देण्यात गर्क. तेवढ्यात बंगातले तन लवलवत महामहिमांच्या नाकापाशी ममतेने येत (ममता बॅनर्जी).
महामहीम : हे गवताचे पांढरे फूल तेवढे बंगच्या मातीतून बाजूला करा. नवीन पीक येऊदे. खूप वर्षाची नापीक सत्ता इथे चालणार नाही. या सत्तेने महिला आरक्षण मुद्दा स्वकीय सत्तेला खत समजून मुद्दाम मातीत घातला. उगवणार तर तणच (तृणमूल). या काँग्रेसला मुळापासून उपटून बाजूला केले, याबद्दल नवीन नेतृत्वाचे आभार मानतो.
ममता बॅन : (इथे त्यांची अर्जी बॅन झाली म्हणून बॅन) मी माझी खुर्ची अजिबात देणार नाही. गवत उगवले म्हणून काय झाले. गायी चारा खातात. मी इथेच बसणार पुनः निवडून येईपर्यंत. हंबा हंबा... रुम्बा रंभा..!
महामहीम : महिला आरक्षणाला विरोध करणार्यांना धडा शिकवलाच पाहिजे. हंबा रुम्बा (तिरस्कारीत मुद्रेने)... या असल्या कृत्याने तमाम गायींचा चारा तर गिळलातच. आमचा हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय झाला आहे. तिकडे तामिळनाडूने पण शिट्टी वाजवली. विजय (थलपती) मिळवला.
ममता बॅन : आम्ही आमचे बॅनर हटवणार नाही. कोणी किती शिट्टी वाजवूदे.
महामहीम : आधी यांना बॅन करा. खूप बोलताहेत. भारत ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ म्हणून ओळखला जातो. इथे तुमची आणि तुमच्या पक्षाची घुसखोरी आणि दादागिरी चालू देणार नाही. जा ना बाई तू इकडून. बस कर. (ममता खुर्चीवर बसते) बस; पण बास कर म्हणालो मी. (कपाळावर हात ठेवत)
ममता बॅन : 15 वर्षे राज्य केलं इथे. इतके सोपं नाही हे. महागात पडेल कमळवाले बाबुमोश्याय.
महामहीम : अन्यायी, अत्याचारी भूमिका सोडा आणि लोकशाहीचा स्वीकार करा. आज बंगालची जनता विजयी झालीय. तुम्ही खुर्चीवर बसून तिकीट काढून पाहा हा शो. ही तुमची हार जनतेच्या जल्लोषात उठून दिसतेय. उठू नका बसा बसा.(छद्मी हसत)
ममता बॅन : हसा, आज आम्ही रडलो उद्या तुम्ही असाल या ठिकाणी.
महामहीम : आम्हीच आहे या ठिकाणी. आज गवताच्या ठिकाणी कमळ उगवले. हा हाऽऽऽ तुम्ही बोलताना पण कोलमडता. तुम्हाला खुर्चीची गरज आहे पण सत्तेच्या नाही. समजले? आता कमळ किती फुलते ते बघत बसा या ठिकाणी... खिक्क खिक्कऽऽऽ