पहिला चहा : हर हर नर्मदे..! 
संपादकीय

पहिला चहा : हर हर नर्मदे..!

पुढारी वृत्तसेवा

भक्त : (नर्मदा नदी काठावर) हर हर गंगे, हर हर नर्मदे, जय हो जय हो..! (नर्मदेस दुग्ध अभिषेक करत)

पर्यावरणप्रेमी : तुम्ही हे काय करत आहात. चक्क दूध ओतत आहात नर्मदेत?

भक्त : अभिषेक म्हणतात या क्रियेस!

पप्रे : या क्रियेमुळे कित्येक जलचरांची दशक्रिया विधी होतेय. जरा पाण्यात उतरून बघा.

भक्त : मूर्ख बालक! तुझे हे अपशब्द ऐकायला मी आलो नाही इथे. समजले?

पप्रे : तुम्हाला समज द्यायची गरज आहे. कधीही काहीही करता भक्तीच्या नावाखाली...

भक्त : हे बघ, तू जे कोणी असशील, शब्द मागे घे नाही, तर कोप होईल माझा.

पप्रे : कोप काय बरोबरच घेऊन फिरता काय? कोपर्‍यात नेऊन बदड बदड बदडेन. बंद करा ते अभिषेक प्रकरण. आधीच गंगेची शुद्धीकरण प्रक्रिया चालू असताना इकडे नर्मदेत काय उच्छाद मांडलाय तुम्ही लोकांनी!

भक्त : काल एवढे टँकर ओतले दुधाचे तेव्हा कुठे होतात?

पप्रे : वातावरणनिर्मिती करणारे तुम्ही आहात. (बकोटी धरत) भक्तिभावाने सांगतो. बंद कर हे!

भक्त : माजला आहात रे नास्तिक तुम्ही. सरळ अंगावर येता? असेच लोक खून, मारामारी करत असतील याची दाट शक्यता वाटते मला.

पप्रे : तू जलचर, प्राणी, पक्षी मारत असशील भोंदूगिरी करत, याचीही खात्री वाटते.

भक्त : वाटून घे. मला काय त्याच्याशी.

पप्रे : तुलाही काय वाटते, त्याचे मी काय करू?

भक्त : आम्ही निर्व्याज भक्ती करतो.

पप्रे : पूर, प्रदूषण हे व्याजासकट मिळते ना तुम्हाला, ते याच अडाणीपणामुळे. सुधरा भक्त हो! (कोपरापासून नमस्कार करतो.)

भक्त : आशीर्वाद देतो. शेवटी नतमस्तक झालाच ना. ही आमची दैवी शक्ती.

पप्रे : (पाय खेचून जमिनीवर पाडतो.) ही आमची शक्ती. खूप झालं रे तुझं. नर्मदेतली गोटी फेकून मारली, तरी नर्मदेचा आशीर्वाद समजणार एवढा निर्लज्जपणा आहे तुमच्यात.

भक्त : (उठत) ते शाळीग्राम असतात. कोणाकडेही जात नाहीत ते.

पप्रे : (शाळीग्राम हाती घेत) आता मी तुला आशीर्वाद देतो. (फेकण्याचा आविर्भाव).

भक्त : जातो जातो. काय वेडा आहे हा.

पप्रे : पळ, निघ. नर्मदा बचाव म्हणतो, तर यांचा भलताच आव. हर हर नर्मदे! (दगड पाण्यात प्रवाहित करत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT