पहिला चहा | वाघाचे कातडे आणि बंगालचा वाघ! 
संपादकीय

पहिला चहा | वाघाचे कातडे आणि बंगालचा वाघ!

पुढारी वृत्तसेवा

सुवेंदूबाबूस बंगालच्या भूमिपुत्राचे पत्र.

नोमोषते बाबूमोशाय,

बंगालच्या भूमीवर कडक उन्हाळा आहे. राजकारणही तापल्याने आपणास हे पत्र वाचण्यास उसंत मिळेल की नाही माहिती नाही; पण लिहिले. वाचा अगर वाचू नका. यावेळी काटकसर म्हणून वहीचे पान फाडून पत्र लिहिण्यासाठी घेतले. पत्र लिहून लिहून कंटाळा आला; पण मेलपेक्षा बरे पडते. पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्र, तसेच वहीचे पान पत्रासाठी हाताळली की, तक्रारकर्त्याला एक वेगळीच खुमखुमी येते; पण माझी तक्रार ही तक्रारीविरुद्ध आहे.

आपणास जाहीर नाव ठेवणाऱ्या बंगालच्या भगिनी वाघिणीच्या वेशात इकडेतिकडे उगीचच फिरत आहेत. आपण त्यांना एकदा पकडलेही होते. गवतातून बाहेर काढले होते आणि मतदारयादीतून सुद्धा आपले नाव खोडू हे बजावलेही होते, तरीही त्या आता वाघिणीचे बेअरिंग सोडणार नाही म्हणतात.

आमचे आमदार फुटीर निघाले, बघून घेऊ म्हणतात. आम्ही खरे वाघाचे कातडे पांघरणारे आहोत. बनावट वाघाची कातडी पांघरत नाही बोलल्या. त्या आता नवीन कातडे आणण्यासाठी 'मातोश्री'वर प्रस्थान करत आहेत. माझे वाघाचे कातडे जीर्ण झाले म्हणत आहेत. आता काय करावे समजत नसल्याने आपणास ही चिठ्ठी लिहीत आहे. त्या कातडे घेऊन आल्या, तर खरा वाघही घाबरून सत्ता सोडेल असे म्हणाल्या. आता काय करावे? 'मातोश्री'वरच्या वाघानेही डरकाळी फोडली असे ऐकण्यात येते. खऱ्या कातड्यातले खोटे वाघ असलो, तरी आम्हाला सगळे वाघ समजतात. असे त्वेषाने एकमेकाचे सांत्वन करत आहेत. यावर तोडगा काढून खरे एक-दोन वाघ पाळून यांच्यासमोर ठेवावेत, असे सुचवावे वाटते.

वाघांनी निवांत न राहता देशासाठी काहीतरी करावे, असे एका वाघाने जंगलातून डरकाळी फोडून रागाने निरोप दिला. उगाच मला बदनाम का करता, हे बंगालच्या टायगरने विचारले आहे. त्यावर आता यांनी डरकाळी फोडून उत्तर दिले, तरच हे खरे वाघ समजू, असेही वाघाने जाहीर केले.

या वाघ समजणाऱ्या युतीने वाघांच्या टोळीलाच आव्हान दिले, असे जंगलच्या राजाचे म्हणणे आहे. आता हे खरे वाघ घुसले राजकारणात, तर कातडे पांघरणाऱ्यांचे कसे होणार, ही चिंता आम्हा बंगालवासीयांनी करावी की नको तुम्हीच सांगा! झुरळावरून वाद पेटला आता वाघावरून नको, असे जनतेस वाटते. यावर आपण काय तरी उपाय शोधावा.

तोमार बंगालवासी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT