पहिला चहा | घोड्यांची जत्रा..! 
संपादकीय

पहिला चहा | घोड्यांची जत्रा..!

पुढारी वृत्तसेवा

पुरातन काळात घोड्यांच्या बाजारात व्यापारी लोक सौदेबाजी करून हव्या त्या जातीचा घोडा पटकावायचे. आता हे चित्र सत्तेत दिसून येते म्हणे. आमदार-खासदार यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यात हवी ती रक्कम देऊन सौदा जिंकता येतो, असं काहीसं मुळे बाई गर्जून गर्जून सभागृहात बोलत होत्या. मनुष्य प्राणी असे मनुष्यास संबोधले जाते म्हणून काय त्याला जनावर म्हणून संबोधावे? शाही प्राणी असला तरी त्याच्या नावाने उच्चपदस्थांना संबोधावे इतके काय राजकारणी क्षूद्र आहेत का.

आता कोण समजवावे हिंहीन करत बोलणाऱ्या भगिनींना. ऐकून घ्यावे सोडून द्यावे शहाण्यांनी, हेच सत्तेच्या नशिबी. काही घोड्यांना आपली मतंही असतात, ते ठरवतात कोणत्या पक्षाच्या डर्बीत जावे. प्रत्येकवेळी कोणीतरी येऊन विकले जायची, विकत घेण्याची भाषा ही खऱ्या घोड्यांना लागू होते. राजकारणात घोडेबाजार असला, तरी तो प्रामाणिकपणे बाजूला होणाऱ्या घोड्यांना का लागू व्हावा. कोणीही यावे काहीही बोलावे, असे चालते का ताई? असं सभ्यपणे म्हटलं तरी ताईंना हिंहीनं वाटतं विरोधक्यांचं. आता हिंहीनून सांगायचा मुद्दा घोड्यानाच माहिती. पक्षी (नेते) कसे हीनहीनणार काय की बुवा!

ताईंना काहीच ऐकायचे नसते, जे सुचते ते त्यांचे, जे नाही सुचत ते त्यांना आधीच बोचलेले असते. कधीही काहीही सुचते. बंद करा, बंद करा, हा घोड्यांचा बाजार बंद करा, असं ओरडून डर्बीमध्ये उतरलेले घोडे मागे फिरणार नाहीत. हे आपलं ओरडणं आपण दिलेला उपमा खाऊन सकाळी सभेत येणाऱ्या पक्षांना कसे कळणार. सारखा उपमा खाऊन पक्षांना उबग आल्याने ते स्थलांतरित झाले, असे समजावे आणि विषय सोडून द्यावा. चेतक फेस्टिव्‍हलला नंदुरबारला गेलो, पाहूया घोडेबाजार काय असतो म्हटलं आणि तिथेही महाप्रसादात गोड उपमा खावयास मिळाला. आपण फार तिखट उपमा खायला देता, त्यामुळे तिथल्या घोड्यांना मुळे बाईंची आधीच धास्ती.

कृपया सत्तेतल्या उपमा आमच्यावर उलटपक्षी लादू नका, आम्ही खरेखुरे घोडे आहोत. कोणताही उपमा उपहास आमच्या नावे कोणाला बहाल नका करू. विनाकारण सत्ताधारी आमच्यावर बहिष्कार टाकतील. मी एक गरीब प्रामाणिक प्राणी. कृपा करावी. धोड्यांच्या जत्रेत आपण जरूर सहभागी व्हावे. उपमा नाही; पण महाप्रसादातला गोड शिरा घेऊन जावे, तोंड गोड करावे म्हणजे उपहास सुचणार नाहीत. असा काही घोड्यांनी निरोप पाठवला आहे. ताईंनी घोड्यांचा एवढा तिरस्कार करण्याआधी आपण किती घोडे विकत घेतले, हे तबेल्यात जाऊन पाहायला हरकत नव्हती. असो. चालायचेच! (आपलाच, एक डर्बीमध्ये नसलेला घोडा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT