नाही मी झुरळ, मी जेंझी झुरळ,
कितीतरी झुरळे घेऊन मी तडक बॅलेटवर,
चप्पल, बूट, सँडेल आणि झाडू सगळ्यांनाच मी आता करेन सरळ...
मी आहे झुरळ! जनाची ना मनाची मी जेंझी झुरळ.
झाडूला चिकटून केले समाजकारण,
केजरीवालांनी केले माझ्याशी राजकारण,
नव्हे मी राजा न मी प्रजा; पण जेंझीचा माझ्यावर लय है लळा.
मी आहे खुळा, उडवीन वावटळ,
जनाची ना मनाची मी जेंझी झुरळ..!
बोस्टनला गेलो, शिकून घेऊ म्हटलो,
इंडियाच्या राजकारणात तरीही अडकलो,
न्यायाधीशांनी का काढावा चिमटा, जेंझी म्हणे झुरळांचा साठा?
तडक उठलो, माझे केले इन्स्टावर बारसे,
हर कोई अब मेरे दर्शन को तरसे
मी लोकांना पाडली भुरळ,
जनाची ना मनाची मी जेंझी झुरळ!
परदेशी गेला तो देशभक्त कसला,
वाजवत बाजा, जनसमुदाय हसला,
जो हुकला तो संपला म्हणून झुरळ बॅलेटवर लपला,
चिमटीत धरून इन्स्टावर टाकला,
सार्याच पक्ष्यांची माझ्या मागे धावपळ,
जनाची ना मनाची मी जेंझी झुरळ!
मिलियन ट्रिलियन फॉलोवर मी करणार,
बीजेपीच्या ताटात जाऊन बसणार,
आम (पक्ष) रस, पुरी खाऊन तृप्त झालो,
बीजेपीत जाऊन पुढे मी भाजीभाकर खाणार,
मला पाडू नका मेलोडीची भुरळ,
जनाची ना मनाची मी जेंझी झुरळ!
दिवसरात्र येड्या झुरळ्या पार्टीच्या बातम्या ऐकून, मीम्स बघून मेंदू रॅप साँग गायला लागला. स्वयंपाकघरात झुरळ, झाडावर, झाडूवर झुरळ, बेसिनमधून झुरळ, देशात, राजकारणात सगळीकडे झुरळ. जेंझी आणि झुरळांचे समीकरण म्हणजे जेंझी इज इक्वल टू झुरळ? यांचा म्होरक्या झुरळ गँग?
बायका जाम झुरळला घाबरतात. आता अशी शक्यता आहे, या पक्षात पुढाकार आळशी बायका, बेरोजगार बायका सतत मोबाईल चालवणार्या बायका लीड करतात की काय? आगळेच इन्स्पिरेशनल झुरळबुवा. झाडूने हाकलून पण देऊ शकत नाही. इतर झुरळ झाडूने मारायला गेलो, तरी मध्येच उठून पळत सुटतं. अमेरिकेपर्यंत पळत जाईल असं स्वप्नात आले नव्हते. निसटून पळताना जणू ‘कॉक्रोच अभी जिंदा है’ असं म्हणत असावं बहुतेक. तेच झुरळ अभी सीजेपी का म्होरक्या है शायद! शाब्बास जेन्झी झुरळ. तू हेच काम कर..!