Forest Fire 
संपादकीय

Western Europe Forest Fires: धरित्रीला अग्निझळा

पश्चिम युरोपमधील फ्रान्स आणि स्पेन हे दोन देश सध्या जंगलांमध्ये भडकलेल्या वणव्यांच्या समस्येशी झुंजत आहेत

पुढारी वृत्तसेवा

पश्चिम युरोपमधील फ्रान्स आणि स्पेन हे दोन देश सध्या जंगलांमध्ये भडकलेल्या वणव्यांच्या समस्येशी झुंजत आहेत. आग वेगाने पसरत चालल्यामुळे दोन्ही देशांमधील तीन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. स्पेनमधील माद्रिद, आविला आणि तोलेदो भागांमध्ये परिस्थिती बिकट असून, स्पेन सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्समध्येही कमी-अधिक फरकाने अशीच स्थिती आहे. जंगलांमध्ये पेट घेणारे वणवे आपल्याला नवे नाहीत. बहुतेकदा वणव्यांची कारणे मानवनिर्मित असतात. पण यामध्ये जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हेही एक प्रमुख कारण आहे.

जगभरातील जंगलांमध्ये आता वणव्यांचा हंगाम अधिक लवकर सुरू होतो आणि पूर्वीपेक्षा अधिक काळ टिकतो. यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे सातत्याने वाढणारे तापमान, विशेषतः रात्रीचे तापमान कमी न होणे. दुसरे म्हणजे पर्जन्यमानात होणारी घट आणि वाढती कोरडी परिस्थिती. तिसरे कारण म्हणजे हिमाच्छादित प्रदेशांमध्ये बर्फ अपेक्षेपेक्षा लवकर वितळणे. युरोप म्हटले की बर्फाची चादर पसरलेला निसर्ग, उणे तापमान, रंगबिरंगी पानांनी बहरलेली झाडे, पर्णवृष्टीच्या आच्छादनात झाकलेले रस्ते असा नितांतसुंदर निसर्ग आणि आल्हाददायक वातावरण डोळ्यांसमोर येते.

परंतु १९८० च्या दशकापासून युरोपचे तापमान जागतिक सरासरीच्या दुप्पट वेगाने वाढत चालले आहे. भारतातून जाणाऱ्या विविध पर्यटकांनीही याचा अनुभव घेतला आहे. १९५० ते १९९९ या ५० वर्षांत युरोपमध्ये केवळ पाच मोठ्या उष्णतेच्या लाटा आल्या होत्या; पण २००० ते २०२५ या पाच वर्षांत २० हून अधिक लाटा आल्या. चालू वर्षी पश्चिम युरोपने इतिहासातील सर्वाधिक उष्ण महिन्याचा अनुभव जून महिन्यात घेतला. जागतिक स्तरावर हा महिना विक्रमी उष्णतेच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहिला. कोपर्निकस हवामान बदल सेवा आणि जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात झालेली अभूतपूर्व वाढ, अल निनोचा प्रभाव यामुळे युरोप अभूतपूर्व उष्णतेच्या विळख्यात सापडला आहे.

तीव्र उष्णतेमुळे वनस्पतींमधील ओलावा नाहीसा होऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. मानवी क्रियाकलापांमुळे पृथ्वीचे तापमान वाढल्याने जंगले अधिक कोरडी होत आहेत. परिणामी जंगलांना आग लागण्याची तसेच ती वेगाने पसरण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे. वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या जंगलाचे क्षेत्रफळही २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे. पश्चिम युरोपमधील दुष्काळामुळे जंगलांमधील झाडे शुष्क होऊन जणू आगीसाठी सरपण बनली आहेत. चालू महिन्यामध्ये हवामानातील कोरडेपणा दर्शवणारा निर्देशांक उच्च पातळीवर पोहोचला आहे. वाऱ्यांची भूमिकाही वणवे पसरण्यात मोठी असते.

फ्रान्समधील जिरोंद येथील सर्वात मोठी आग वाऱ्यामुळेच पूर्वेकडील किनारपट्टीकडून पश्चिमेकडे पसरली. फ्रान्सच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेला कॅप फेरे द्वीपकल्प हा नैसर्गिक सौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी उन्हाळ्यात लाखो पर्यटक येथे सुट्ट्यांसाठी येतात. मात्र यावर्षी या परिसरातील रमणीय दृश्यांची जागा धुराच्या लोटांनी घेतली आहे. हवेत राखेचा दर्प पसरला असून अनेक भागांत सूर्यप्रकाशही धुराच्या पडद्याआड गेला आहे. आतापर्यंत ८७०० हेक्टरपेक्षा अधिक जंगल भस्मसात झाले असून ही आग वेगाने पुढे सरकत आहे.

वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर हरितगृह वायू उत्सर्जित होतात. वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढून पुन्हा जागतिक तापमानवाढीला हातभार लागतो. जळालेली जंगलं कार्बन शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता गमावतात. परिणामी हवामान बदल अधिक वेगाने घडू लागतो. म्हणजेच हे एक दुष्टचक्र बनले आहे. २०२४ हे वर्ष यादृष्टीने महाभयंकर ठरले. या एका वर्षामध्ये जगभरातील सुमारे १ कोटी ३५ लाख हेक्टर जंगल वणव्यांमुळे नष्ट झाले. पायरोक्युम्युलोनिंबस म्हणजे जंगलातील भीषण आगीमुळे तयार होणारे ढग. पूर्वी ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिकेच्या काही भागांपुरती मर्यादित असलेली ही घटना युरोपमध्येही दिसू लागल्याने शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.

पायरोक्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती भीषण वणव्यांमुळे होते. आगीनंतर प्रचंड उष्णता निर्माण होते. त्यामुळे गरम हवा, धूर, राख आणि सूक्ष्म कण वेगाने वरच्या वातावरणात झेपावतात. वातावरणातील आर्द्रतेशी त्यांचा संयोग झाल्यानंतर उंच, घनदाट आणि वादळी ढग तयार होतात. हे ढग इतके शक्तिशाली असतात की, ते स्वतःचे स्वतंत्र हवामान तयार करू शकतात. त्यामुळे एक साधा वणवा काही तासांतच महाविनाशकारी स्वरूप धारण करू शकतो. आगीच्या ढगांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच आगीला अधिक भडकवतात. ढगांच्या निर्मितीमुळे निर्माण होणारे जोरदार उर्ध्वगामी आणि अधोगामी वारे सतत दिशाबदल करत राहतात. या वाऱ्यांमुळे आगीला मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो आणि ज्वाळा अधिक वेगाने पसरतात. उडणाऱ्या ठिणग्या अनेक किलोमीटर दूर जाऊन नवीन ठिकाणी आग लावू शकतात. परिणामी, एका ठिकाणी सुरू झालेला वणवा काही तासांतच अनेक आघाड्यांवर पसरतो. अनेक वेळा आग नियंत्रणात आणण्याऐवजी नागरिकांचे प्राण वाचविणे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे हेच प्राधान्य ठरते.

जंगलांचे नुकसान, जैवविविधतेचा ऱ्हास, वन्य जीवांचे मृत्यू, वायुप्रदूषण आणि आर्थिक नुकसान यामुळे या संकटाची व्याप्ती अधिक गंभीर बनली आहे. डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आणि आयआयटी रुरकी यांच्या अभ्यासानुसार वार्षिक सरासरी तापमानात १ अंश सेल्सिअस वाढ झाल्यास जंगलातील आगींच्या घटनांमध्ये सुमारे ११२ ने वाढ होऊ शकते. उन्हाळ्यात सरासरी तापमानात १ अंश वाढ झाल्यास हा आकडा सुमारे १२८ अतिरिक्त आगींपर्यंत जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर युरोपचा विचार करता पूर्व औद्योगिक काळाच्या (१८५०-१९००) तुलनेत तेथील तापमान आज २.२ ते २.३ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही युरोपला वणव्यांचे संकट भेडसावण्याची शक्यता आहे.

हवामान बदलांचे इतके तडाखे बसूनही विकसित देश पर्यावरण रक्षणाबाबतचा दुटप्पीपणा सोडण्यास तयार नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. वस्तुतः ज्या औद्योगिक क्रांतीने युरोपला आर्थिकदृष्ट्या समृद्ध केले, तिनेच आज संपूर्ण जगासमोर अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे. गरीब राष्ट्रांना जागतिक तापमानवाढीबाबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना सोयीचे वाटत असले तरी या संकटाच्या झळांपासून त्यांचीही सुटका होणार नाही. तापमानाचा उच्चांक आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा या दुहेरी संकटांनंतर तरी युरोपसह पश्चिमी जग धडा घेईल का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT